Weltanschauung

Hi, These are my thoughts on things that matter to me..

Sunday, September 25, 2011

काही कविता(?)

रखमे, कटाळ आला; रमंना आता हितं मन
आजकाल दिसत बी न्हायी; मानुसपन
रयाच ग्येली बग सगळ्याची
जनी न्हाई तुक्या न्हाई; सोसवना सुनंपन

हाँत्तर; मांडला येवडा पसारा; आवरेला हायेच बायको
आत्ता म्हने का करमना; उचला तंबू. फिकर कायको?
आऽवो तुमी झागिरदार, पन लोकांले इसरु नगा
सुक्कंदुक्कंचिंता तुमच्या पायी; आजबी टाकत्यात बगा

द्येवाने द्येवासारकं र्‍हावं; ह्ये मी का सांगाय होवं?
मांडतानी इचारलतं का ; काय करु, काय न्हवं
अठ्ठाईस युगंलोटल्यावं; आता बायकुची आली याद
द्येवा द्येवा द्येवा; मले बी दिला किरपापरसाद

बगत होत्ये तुमचे कौतिक ;खोटं न्हाई बोलनार;
बरं बी वाटलं पर केवडं वो ते खटलं?
जीव दडपला की माजा, तुम्हाले हाक बी घातली,
पर तुम्ही होता कुटं; तुमी सोहळ्यात दंग
काडली अठ्ठाईस युगं डोयातील पाण्यासंग

+++
इठ्ठलराव नॉट फेअर, बडवे चार्जिंग अ लॉट
एकदोनरुप्यात खरं म्हणजे आली पायजेल होती कॉट
तुज्याच समुर टाकली असती, बसलो आस्तु तुला न्याहळीत
पानतमाखु द्येत घ्येत, सुकदुक्काचे गात गीत
+++
युगेअठ्ठाईस राह्यलात उभे; बाह्येर काय च्चाल्ले ते ठाव नाय तुमास्नी इठ्ठलराव
आवो, बंबात घाला ती ईट ; (आता बंब बी राह्यले न्हाईत बगा !)
वारकरी येत्यात जात्यात हरसाल, तुमी व्हता खुश
रुप्यामोत्यांच्या राशी, आता येईल जॉज बुश
+++
'अडगुलंमडगुलं'; म्हनायची सवय निस्ती
'बंबात घाल'; म्हनायची सवय निस्ती
बंबआनमडगुलं; युगेलोटली गायब व्हऊन;
हिथल्य्या वस्तुंमध्ये शोधू नये सोताची पहचान

आज हायेत उद्या न्हाईत
आपन आपनांस तिर्‍हाईत
हितल्ल्या चीजांध्ये गुंत्वू नये जीव
आपली आपुन करु नये कीव

मायाममताचीजवस्तु
अर्पावी इठ्ठ्लाचरनी
त्येलाच ठरवू द्यावी
आपली करनी

हाये ना तो उभा इटेवरी फक्त ?
करु द्ये तेला प्रयत्नांची शिकस्त
+++
इठ्ठलराव, किती पत्रे लिवली वो
वाचित काहुन न्हाई ?
मी म्हंलं का रागीवलात
तळतळुन बोल्ले कायीबायी

इठ्ठलराव, खुसाली कळवित र्‍हावा
तुमची लै येती याद
यमाची म्होरल्या टायमाला
येनार बगा साद

इठ्ठलराव, मी बी तैय्यार हाये
बांधून छोटं गठुडं
तुमी नीटर्‍हावा खावाप्यावा
एवडच घालत्ये साकडं

संदर्भ : http://www.maayboli.com/node/28562

Saturday, August 20, 2011

फुलों की घाटी, हेमकुंड- नमनाला घडाभर...!

*ट्रेकर लोकांनी वाचून चिडचिड करुन घेऊ नये कृपया. ज्यांना ऊन, पाऊस, थंडी यातील काहीही माफकच सोसवते अशांपैकी एका नमुन्याचे हे 'सिव्हिलियन' मनोगत आहे. आधीच सांगत्ये. मागाहून तक्रार करु नये.

*आणि हो यात काहीही ग्रेट नाही, लोकं बेसकॅम्पलाच काय, शिखरावरही जाऊन येतात. ही नम्र (आणि बोचरी) जाणीव लिहीताना साथसोबत करते आहेच.



गेली चार तरी वर्षे मी नित्यनेमाने घाटीच्या ट्रेक्सच्या जाहिराती चवीने पाहते. या(ही)वर्षी न जमण्याची काही ना काही तजवीज लहान मूल, पावसाळी आजारपण, नोकरी, तब्येत, सुट्ट्या, खर्च, कंटाळा, भीती, inertia यातील एक किंवा सर्व घटक आपसूक करतात. यावर्षी कसे कोण जाणे, बर्‍याच प्रापंचिक अडचणी येऊनही, जमलेच. हाच एक मोठ्ठा धक्का. तो पचवून तयारीला लागले. नवीन जोड्यांचा सराव तब्बल एक दिवस चालून केला. त्याला शंभराने गुणले की जमलाच ट्रेक, असल्या गणिताने नक्की किती त्रास होईल याचा अदमास बांधला. मर्फीच्या नियमांनुसार आदल्या आठवड्यात माश्या मारायची वेळ आली होती, तो जायच्या आठवड्यात बरोब्बर कामाचे रान पेटले. प्रातःस्मरणीय मालिनीकाकू राजूरकर आठवल्या. त्यांच्या मुलाखतीत एकदा बाई आली नाही, अडचणी आल्या म्हणजे हमखास कार्यक्रम चांगला होणार असे वाचल्याचे (नेहमीच) स्मरते.

तयारी म्हणजे काय सांगावे महाराजा! कपड्यांपासून रेनकोटापर्यंत सर्व घेतले. कापूर (हुंगायला) वगैरे सर्व टिपा मायबोलीकर मैत्रिणींनी आठवणीने दिल्या. तीन चेकलिस्ट करुनही शेवटी विसरायचे ते रीतसर विसरलेच. रकसॅक भरताना वैतागले. एकतर त्यात दिवसाप्रमाणे काहीही भरता येत नाही. चार बोचकी भरुन आत कोंबणे (आणि बाहेर काढू शकणे) याला कौशल्य लागते. हँडबॅग घ्यावी असा (सिव्हीलियन) मोह झाला. नवरा बोंब मारत होता की सॅकच घे, पण ऐकले तर एवढ्या वर्षांच्या संसाराची बूज कोण राखेल, आँ?
मग फालतू प्रश्न विचारायची लाज गिळून ट्रेकलिडरना फोन केला. तो तिकडे बेशुद्ध पडला नसावा कारण उत्तर लगेच आले. त्या सोबत एक उसासा ऐकल्याची दुष्ट शंका अजूनही येते. श्री. ट्रेकलिडर म्हणले की 'अहो, शक्य असेल तर सॅक आणा. आपण खेचरांवर सामान लादतो. बॅगांच्या पट्ट्यांवर वजन पडून ते तुटतात' वगैरे. नवर्याने 'तरी मी सांगत होतो' वगैरे म्हणलेच. ते ऐकून न ऐकल्यासारखे करण्याचा दांडगा सराव कामी आला. नेहमी(च) येतो. त्या नतद्रष्ट सॅकमध्ये ती बोचकी भरली एकदाची. डोंगराएवढे सामान झाले. नवर्याच्या मते, घेतलेय त्यापेक्षा अर्धे सामान कमी करायला हवे होते !!!!! ते मौलिक मत पुन्हा कानाआड केले.
त्याआधी एखाद आठवडा SLR दे म्हणून भांडण केले. तो SLR मिळाला नाहीच. 'आधी तू एकदा धड जाऊन नीट आलीस, काहीही न हरवता, तर पुढच्या वर्षी देईन. तुला तो पेलवणार नाही तसाही चढताना.' हे उत्तर आले. (उत्तरात अगदीच तथ्य नाही, असे म्हणता येणार नाहीच, पण कबूल कशाला करायचे ते!) 'बस मग त्या कॅमेर्‍याला कवटाळून. तू आणि तुझा SLR खड्ड्यात जा.' वगैरे प्रेमळ संवाद उभय बाजूने म्हटले. (तात्पर्य, हे फोटो अप्रतिम सुंदर नाहीत याचे कारण डबडा पॉईंट अँड शूट कॅमेरा. नाहीतर पाहत राहिला असता. काय समजलात!)
दरम्यान सहट्रेकर्स आणि मायबोलीकर मैत्रिणी शैलजा आणि स्वाती यांच्याशी आपत्कालीन संभाषण सुरु होतेच. आता फक्त कपडे, रेनकोट, बूट, सॅक, कापूर, हातरुमाल, लाडू, ओडोमॉस, प्लॅस्टिकपिशव्या, चपला, पैसे आणि... एवढेच घ्यायचे राहिलेय..आणि हो.. चालायला सुरवात करायचीय गं! - असले महान विनोदी संवाद वारंवार झडत होते.
आपल्याला जमेल ना नक्की? घरी मुलगी राहील ना नीट? आधीच स्वतःसाठी अशी एक आत्यंतिक गरजेची नसलेली सुट्टी घेणे, त्यात आणि लहान मुलीला घरी ठेवून, म्हणजे अपराधीपणाचे कडवट, मुरलेले, उग्र लोणचे. 'अँटी-हिरकणी सिंड्रोम' इथपावेतो येडचॅपपणाची आणि स्वनिर्भत्सनेची मजल जाऊन पोचली. 'तू गेली असतीस?' असे कोणाही बाईला विचारण्याइतपत घोळ घातला. 'मी नसते जाऊ शकले, पण तू जा' अशी उत्तरे येऊ लागली तसा Guilt Quotient चा पारा उपकरण फुटेस्तोवर चढू लागला. पारा चढला की त्रास नुसता. घालमेलडॉटकॉम. मग नवरा तापमान उतरवण्याचे काम 'पेप टॉक' देऊन इमानेइतबारे करी. शेवटी त्याचा 'कोणाला काहीही विचारायची गरज नाही' हा सल्ला मानला. 'बाळ माझ्याशिवाय राहील ना नीट' ही दुधारी तलवार असते. दोन्ही बाजूने वेदना.
भरीस भर एक मित्र भेटला जीटॉकवर. म्हणे लेह-लदाखला चाललोय. साधारण त्याच तारखा. आणि सगळा आमचा PGचा ग्रुप, दहा जणांचा. याच प्राण्यांबरोबर शेवटचा ट्रेक साधारण एका तपापूर्वी केला होता.' गाढव!!! मला का नाही सांगितलेस? मला न सांगता तुम्ही जाताच कसे' अशी उभयपक्षी घमासान वादावादी झाली. उत्तर दोघांचेही सारखे. तंतोतंत. Word for word ! 'मला वाटले तू फारच संसारी आहेस, मुलीला/मुलांना सोडून येणार नाहीस अजिबात.' घ्या आता! दोन्ही बाजूंने तेच आरोप, त्या च शब्दात, आणि 'संसारी' ही एकच शिवी. दोघांनीही कप्पाळाला हात मारला, संसारीपणाचे दाखले देऊन देऊन दांडग्या उखाळ्यापाखाळ्या काढल्या. फार हळहळलो. काहीही बदल करणे ऐनवेळी कोणालाच शक्य नव्हते. असो. पण तेवढ्यात ग्रुपमधल्या मुलीही मुलं घरी ठेवून निघाल्या होत्या ते समजून काहीसे बरे वाटले.
प्रापंचिक अडचणी वगैरे सर्व शंकाकुशंका होत्याच. लेकीची भूणभूण सुरु होतीच की 'मीपण येणार. मी चालेन पायीपायी. तुला कडेवर नाही घ्यायला लावणार. भ्यॉऽऽ, भ्यॉऽऽ'

त्याच जोडीला हापिसने षटकार मारला. एक 'HK कॉल आहे, महत्वाचा, सोमवारी तो घेशील ना?'
कुठून? हिमालयातून? तिथे फोन नसतात - असे मी बिनधास्त ठोकून दिले.
मी तिकडून ओरडूनओरडून 'हॅलो, ऐकू येतंय ना नीट? हेऽ पहा, अजिबात हलू नकोस. हाँ, काय म्हणालास.., जोरात बोल जरा' असे ज्या चिन्याशी बोलेन तो ठार वेडा होईल 'रेंज' प्रकरण ऐकून. 'एकच कॉल आहे, अगं. सोमवारी तर आहे.' कधी नव्हे ते स्पष्ट नाही सांगितले. ते बरेच झाले एकूणात, कारण दिल्लीत प्रवेश करताच नेटवर्कने प्रथेनुसार दगा दिलाच.

दरम्यान मायबोलीवर इतक्या जणींनी शुभेच्छांचा पाऊस पाडला की अतिशय कानकोंडे वाटले. अजून जायचा पत्ता नाही, कधीही रद्द होऊ शकते त्यातली गत, आणि कधी न पाहिलेल्या लोकांकडून इतक्या शुभेच्छा आणि एवढे करुन जमलेच नाही तर लोकं काय म्हणतील हेही एक प्रेमाचे ओझे मानगुटीवर येऊन अलगद बसले. शर्मिला आणि आउटडोअर्स यांनी ट्रेकर्सची छोटीछोटी महत्त्वाची ऐहिक गुपिते शेअर केली, आणि अनुदोनने 'मजा कर पण मन गुंतवून येऊ नकोस' असा भारी उपयोगी सल्ला दिला. सावली आणि मृण्मयीने 'ती राहील, तू तुझे पहा' हा अमूल्य सल्ला दिला. जाऊ शकु याची खात्री नव्हती, आस तर अजिबात लावायची नव्हती त्यामुळे निर्लेपपणाचा कळस साधत चक्कं एकही ओळ वाचली नाही पूर्वतयारी म्हणून.

घरुन निघताना मात्र बाळाचा चेहरा एवढाऽसा चिमणीएवढा झाला होता तो पाहून अक्षरश: गलबलून आले. पाय पुढे टाकवेना. नको जाऊयात असे दहाहज्जार वेळा तरी वाटले. काहीतरी महत्त्वाचे काम निघावे आणि रद्द करावे लागावे असेही वाटून गेले. म्हणजे निर्णयाचे शिवधनुष्यही पेलायला नको.

पुण्याहून या दोघी आधी बसणार होत्या, अर्धा तास आधी फोन, स्वाती अजून आली नाहीये. अरे देवा!!! मग ती सापडली. मग तिचा फोन की 'आता आम्ही बसलोय, तू नक्की बस आता ट्रेनमध्ये'... ताण वाढून खोकला यायला लागला. हापिसात लोकं वैतागले. 'अगं, काय युद्धावर चाललीयेस की काय, होईल सर्व व्यवस्थित' वगैरे म्हणून धीर दिला.

डायवरसाहेबांनी रीतसर रस्ता चुकवून एकदाचे स्टेशनावर सोडले. त्यात आणि मलाच पुन्हा ऐकवले की 'होता है, हर रस्ता कैसे मालूम होगा?'. रागात मला 'आपणांस कुठलाच रस्ता ठाऊक नसतो, अमात्य !!' याचे हिंदी भाषांतर सुचले नाही म्हणून तो वाचला. आता पुढील काही दिवस अजिबात एकमेकांची तोंडे पहायला नको याचे आम्हा दोघांनाही फार फार बरे वाटले. एकदाची ट्रेनमध्ये बसले आणि अर्ध्या तासात वैतरणेचे कॉफीरंगाचे कॉफीइतकेच दाट असावे असे वाटणारे पाणी भरभरून वाहताना पाहिले. दारात जाऊन उभे राहिले. वैतरणेत निळ्या रंगाची होडी. एकटीच. त्यात इग्रेट तालेवार बसलेला. जीव त्या जवळ नसलेल्या SLR साठी अस्सा तळमळला की क्या बताऊं! दार उघडून तिथे उभं राहून हवा खाल्ली. अधिकृत प्रवास सुरू झाला म्हणायचा! राजधानीच्या सेवकाशी पंढरीची वारी, वैतरणेचे पाणी आणि राजधानी वेळेवर कशी पोचते यावर गप्पा कुटल्या. सहप्रवासी मुलगी आणि तिची कथाही फार मस्त होती. तिच्याशी सगळ्या अलम दुनियेच्या गप्पा मारल्या. बोलता बोलता तिने सहज 'लग्न करु की नको, तुला काय वाटते' असे विचारले. कोणी मत विचारले की पंचाईत होते. खरे बोलावे तर लोकं बिचकतात. खोटं बोलवत नाही. 'नरो वा कुंजरो वा' सल्ल्यांची स्क्रिप्ट तयार असते तशी हल्ली वयानुरूप, पण वापरत नाही सहसा. पण मग उत्तर काय द्यावे? हल्ली असे वाटते की खरेच उत्तर द्यावे, लोकांना समजत नाहीच. लोकांनाच का? मलाही समजले नसतेच. सांगूनही समजत नाही अशा अनेक गोष्टींपैकी ही एक महत्त्वाची.

रात्री बराच वेळ 'हिंदू' वाचली. डोके दुखायला लागले. ती घेऊन जाणे हा महामूर्खपणा क्रमांक २ होता, कारण ती हार्डबाऊंड आहे. जागा व्यापते. (वजनी आणि आशयानेही)जड आहे आणि ती वाचायला डोके बर्‍यापैकी ठिकाणावर लागते. म्हणजे प्रवासात कटाप. पण एवढी अक्कल मला असती तर सामान कमी झाले नसते का? मध्येच लेकीची आठवण यायला लागली. तेवढ्यात एका मित्राचा SMS. 'आपल्या वर्गातील आम्ही चौघं भेटतोय, जेवायला येणारेस का उद्या? अमकीतमकीलाही विचार' मी उलट टपाली येऊ शकत नसल्याचे कळवले. उत्तर आले. 'Gr8. Try not to stomp on the flowers'. लै हसले. मग त्या अमकीतमकीचे उत्तर, 'कोण कोण येणारे?' 'माहित नाही.. त्यालाच विचार.' 'त्याचा नंबर दे. मग हिचा दे, मग तिचा दे..' काय नमुने आहेत रे देवा एकेक! महिनोन्महिने भेटत नाहीत गधडे आणि मी नसतानाच नेमके यांना भेटायचे असते. गाडीत रात्री उशीरापर्यंत एक माणूस सतत फोनवर खोटे बोलत होता पैसे उकळायला. मी दिल्लीत आहे असे सांगून. त्याचे संभाषण फारच उद्बोधक आणि संतापजनक होते. तसेच पाचेक वर्षाचा एक छोटा अतरंगी मुलगा भोकाड पसरुन रडत बसला चांगला साडेबारापर्यंत. उगाचच. त्याच्या बापाने संयम सुटून त्याला बखोटीला मारले आणि आता तुला गाडीतून खालीच टाकतो म्हणाला. बराच तमाशा सुरु होता.

सकाळी दिल्लीत उतरले. नेटवर्क गायब. मग रिक्षावाल्याने रीतसर जास्त पैसे घेऊन वगैरे दिल्लीची योग्य चुणूक दाखवून योग्य जागी पोचते केले. छोट्या सॅकच्या चेन तुटल्या तेवढ्यात, तिने आऽऽ वासला. म्हणजे एवढ्या घाईत ते घेणे आले आता. चडफडडॉटकॉम. मायबोलीकर अल्पना आणि कुटुंबियांनी खूप अगत्याने स्वागत केले. त्यांचे आभार मानावे तितके थोडे आहे. फार छान वाटले. त्यांच्या घरात आम्ही हाऽऽ एवढा पसाऽरा केला सामान रचून. आयाम भलताच गोड आहे. अल्पनाने सॅकच्या चेन्स लावून आणवायचे खूप मोठ्ठे काम केले. पहिलाच दिवस. आंघोळ करायला मिळाली. त्यामुळे सिव्हीलियन जीव सुखावला. पोटभर गप्पा मारल्या, खाल्ले आणि स्टेशनवर जिथे भेटायचे ठरले होते तिथे अल्पनाकृपेने पोचलो. पब्लिकने आम्हाला आणि आम्ही पब्लिकला पाहून घेतले. एकेक जण येत होता, धपाधप सॅकची पोती येउन आदळत होती. नुसत्या सामानावरून कोण नवखे ते लगेच ओळखायला येत होते. प्रत्येकाच्या हातातील कॅमेरे पाहत होते. एखाददोनच SLR दिसले. हुश्श्य!! औपचारिक ओळख झाली. बहुतेकांचा पहिलाच हिमालय ट्रेक होता. लीडरसाह्येबांनी 'पाणी विकत घ्यायची गरज नाही, गंगेचे पाणी थंडगार सुरेख असते, ते प्या आणि प्लॅस्टिक वाचवा' असे सांगितले, ते ऐकूनच मी मनातल्या मनात त्याला फुल्ल मार्क दिले आणि निदान छान ग्रुप निवडला याचे हुश्श्य केले !

मग वरात सामान घेऊन पल्याड असलेल्या स्टेशनापात्तुर निघाली. सात मिनिटांच्या रस्त्यात जिने चढून, सामान वाहून दम निघाला. हरिद्वारला जाणार्या गाडीची वाट पाहत होतो. समोरून दरभंगा एक्सप्रेस गेली. त्यातली जनता पाहून आणि दोन डब्यांमधील खबदाडात प्रवास करणारे जय-वीरू पाहून पुन्हा एकदा स्वदेशाची जाणीव असोशीने झाली. निळ्या डब्यांमधील काळपट बेदरकार चेहरे, मातकट पिवळसर कपडे, पगड्या, फेटे, लालपिवळेहिरवेनिळे घुंघट, लगबग, लगबग आणि कमालीची दाटीवाटीने कोंबलेली माणसे. Grotesque meets beautiful असे नेहमी वाटते. व्हॅन गॉफने ही मानवी सूर्यफुलांची शेते पहायला हवी होती. सगळे रंग सुटे विलग फर्र डोळ्यासमोरून गेले....

दिल्ली ते हरिद्वार लहलहाती शेते पाहून गारगार वाटले. हिरवेपिवळे माळ, त्यावर निवांत चरणार्‍या गायीम्हशी, त्यांच्या भोवती पिंगा घालणारे पांढरट पिवळे कॅटल इग्रेटस, विजेच्या तारांवर काळेभोर ड्रोंगो आणि नेहमी दिसणारे इतर पक्षी दिसले भरपूर. शहराची पुटे निवळू लागली.

हरिद्वार स्टेशनाबाहेर पथार्‍या पसरलेले निदान शंभरदीडशे यात्रेकरू. दोन बायका मिळून हाताने भडक्क रंगाच्या साड्या वाळवणे सुरू होते. खाली ते रंगाचे फलकारे काहीश्या अंधारातही दिसत होते आणि वर स्टेशनाच्या इमारतीच्या टॉवरसदृश घुमटात दिवे लागले होते. कितीही मुशाफिरी आव आणला तरी मी असे स्टेशनावर कधी आयुष्य वाळवू शकेन असे वाटत नाही.
तिथून छोट्या बसमधून हृषिकेश. रस्त्यात गंगेचे घाट दिसले दुरून. I thought I did'nt have a religious bone in my body. I was wrong. Unfortunate, but true ! नदीत तरंगते फडफडते नाजूक दिवे, भजनांच्या ललकार्‍या, घंटानाद,खळाळत्या गंगेची अद्भूत गाज, तुंबलेली वाहतूक, प्रचंड उकाडा. राजाजी राष्ट्रीय उद्यान आणि ‘जंगली हत्तींच्या कळपापासून सावध रहा’चे फलक. जंगलाचा वास यायला लागला. माहौल चढायला लागला. शेवटी एका मोठ्ठा चौक आत असलेल्या जागी आम्ही राहिलो. किती मोठा चौक होता माहितीये? 'ये गलियाँ ये चौबारा' मधल्या चौकाएवढा. कोणाची तरी कोठी असणार ती नक्की. तिथे गढवालचा नकाशा भिंतीवर लावला होता. फुलोंकी घाटी नकाशावर पाहिले आणि तिथे फुलदाणीत ठेवलेल्या गावठी फुलांचा वास असे एकत्रित मळमळायला लागले. पाऽर दुसरे टोक होते फुलोंकी घाटी. कुठलाही नकाशा पाहिला की आपण नक्की कुठे आहोत हेच शोधायला फार वेळ लागतो. नेहमीचे आहे. आणि मग तो नकाशा मोठ्ठ्या नकाशात (आणि मग पृथ्वीत) कुठे बसतो हेही..



(साभार: आंतरजाल)

जेवणे आटपली. हसत खेळत ओळखी वाढवत. जेवणाची गंमतच झाली. 'छे! अजिबात भूक नाही, भूक नाही' अशी सुरवात करत, शेवटपर्यंत ज्या काय ऑर्डरी सटासट जात होत्या त्याने वेटरसाहेब वैतागले. त्याच्या चेहर्यावर 'अजून हवंच आहे का?' असले भाव तरळायला लागले. इथपासून जे हसणे खिदळणे सुरु झाले ते शेवटपर्यंत. ग्रुप छान असल्याची खात्री पटली. मनावरचा ताण हलका झाला.

दुसर्‍या दिवशी सकाळी ६ ला निघायचे (म्हणजे साडेचार-पाचला उठायचे. तिघींचे आवरायला तेवढा वेळ लागतोच) अशी सूचना मिळाली. सगळी विद्युतउपकरणे चार्ज करणे हे महाकंटाळवाणे काम आठवणीने केले आळीपाळीने. नळातून येणारे गरम पाणी तिथे मिळाले ते शेवटचे.

पहिले दोन दिवस लांबलचक वाटले.

मुशोसाठी आभार : ललिता_प्रीति

क्रमश:

Friday, January 21, 2011

सकाळ

इरीटीरी उठते आणि
रोज पसरते भोंगा
आज शाळेत नक्को जाऊ?
म्हणते आत्ता सांगा

इरीटीरीची आई हताश
पाहुनी तो दंगा
होते हापिसात पसार
घेईल कोणाशी पंगा ?

इरीटीरीचा बाबा मग
रोजचे करी उपाय
चिऊकाऊमैनावाघ
कित्ती गोष्टी ऐकशील माय?

इरीटीरीचा बाबा शेवटी
हलकेच देतो फटका
मोजतो शाळेत जाईस्तोवर
पळे अन घटका

Friday, April 17, 2009

The Music Room – Namita Devidayal

द म्युझिक रुम- नमिता देविदयाल

नमिता देविदयाल- यांचे द म्युझिक रुम वाचले. मला आवडले. कथानकासाठी ही लिंक वाचा-
http://www.telegraphindia.com/1070928/asp/opinion/story_8367570.asp

केसरबाईंवरील माहितीसाठी
http://www.underscorerecords.com/artists/details.php?art_id=40

अनेक वर्ष काही प्रश्नांची उत्तरं शोधत होते ती काहीशी सापडल्यासारखी वाटली. हा नमिता यांचा संगीतशिक्षण प्रवास, त्यांच्या गुरु जयपूर घराण्याच्या धोंडूताई कुलकर्णी (केसरबाई केरकर आणि भूर्जीखाँ साहेब यांच्या शिष्या) यांच्याकडे २ तपांहून अधिक काळ चाललेले संगीत आणि जीवनमुल्ये शिक्षणाचा प्रवास, रागदारी, घराणे आणि भारतीय संगीत परंपरेवरील चिंतन, गुरूकॄपेने लाभलेली संगीतानुभूती आणि आत्मानूभूती, त्यात पत्रकरितेची आणि विवेकवादाची जीवनानुभुती, आणि या सगळ्याची सांगड घालायची धडपड. तीळातीळानी, रियाजाने घटवत जाणारा षड्ज. " My "sa" is improving, a few sesame seeds at a time". {हे Diaspora लेखकांचे खटकतं तरी याजागी दुसरी काय बरं उपमा देता येईल? आणि ह्याच उपमा पाश्चात्यांना विलायती म्हणून मोहून टाकत असाव्यात हे बुकरच्या वाढत्या पुरस्कारप्राप्त यादीतले लेखक वाचून वाटतं. तरीही फक्त त्यासाठीच तर लिहीले नसावे , ईतकी शंका घेण्याइतपत लेखक आपण सगळ्यांनीच वाचले आहेत आणि मनात निषेध व्यक्त केला आहे. :-)

केसरबाई केरकरांचे व्यक्तिचित्र बहूतेकांनी तरी पुलंच्या मैत्र मध्येच वाचले असेल. मी स्वतः त्यांचे ध्वनिमुद्रण फक्त राजन पारिकरांच्या पानावर ऐकले आहे. त्या व्यक्तिचित्रणाला पूर्ण छेद देत, आडपडदा न ठेवता, आणि तरीही सीमारेषा पार न करता विवेकनिष्ठ चित्रण या पुस्तकात वाचले. "बाई", त्यांचे सूर, त्यांची साधना आणि बेसूर रंगढंग आणि निव्वळ संगीत परंपरा चालू रहावी म्हणून घराण्याबाहेरच्या केसरबाईंना, जुल्माचा रामराम स्वीकारून तालीम देणारे ते अल्लादिया खाँ साहेब.
गुरु धोंडूताईंचे ध्यासनिष्ठ जीवन आणि संगीत विषयक चिंतन, ईश्वरभक्ति, सोसलेले आघात, आर्थिक कोंडमारा, आयुष्यभर न सुटलेला तोल,, जयपुर घराण्याच्या सर्वेसर्वांच्या कडून मिळालेली तालीम, प्रतिभा आणि तरिही सगळं अनुरुप असताना कूठेतरी शिंकलेली ती नशीब नामक माशी-योग्य प्रमाणात न मिळालेलं ते दुमदुमतं यश/प्रसिद्धी - याबाबतीत ही पूर्ण नियंत्रीत /समतोल विचार नमितानी नोंदवलेले आहेत. भारतीय संगीत परंपरेतील "गुरु " आणि त्यांची मर्जी सांभाळतांना आपल्या गुरुबाबत असे लिहीणे आणि टोकाच्या उदात्तीकरणापासून दूर राहणे, आणि तरीही गुरुमधील अलौकिकाची जाण ठेवून लिहीणे सोप्पे नाही.

हिंदू / मुस्लिम सांगीतीक विचारधारा आणि त्यांची घट्ट वीण हाही एक महत्वाचा धागा. त्यातले अल्लादिया खाँ खरं म्हणजे हिंदू होते वगैरे मिथकं. केसरबाई आणि त्या प्रतिस्पर्धी मालू (? ह्या कोण हे मात्र कळले नाही), धोंडूताई आणि त्यांचे प्रतिस्पर्धी (ह्या कोण ह्याचा मात्र अंदाज लागला), हेवेदावे आणि कपट- हे ही, काही सांगीतीक दंतकथा तानसेन आणि स्वामी हरिदास/ अल्लाह, घराण्याची प्राणपणाने जपण्याची गुपिते, ग्रांट रोड मधल्या शारिरव्यापाराच्या भांगेतली ती अभिजात आणि पिढीजात शास्त्रीय संगीताची तुळस, रागांग आणि श्रुती यावरील गुरुभाष्य सगळेच सुरेख लिहीले आहे. तेवढीच (मला)महत्वाची वाटते ती नमिताबाईंची डोळस वाटचाल, त्यांना पडणारे प्रश्न आणि कित्ती नाही म्हणले, विद्रोही सिगरेटींच्या धुम्रवलयात सोडली तरी सूरात आणि कैवल्यात लीन होऊ पहाणारी त्यांची सापडलेली आणि न सापडलेली उत्तरं- वाचाच !!

राहता राहिला एक प्रश्न-
धोंडूताईंचे गाणं किंवा नमिताचं खरं कसं होतं /आहे ? पुस्तकाला साजेसं आहे का? हा माझ्या डोक्यात वळवळणारा किडा. पण त्यानी काय फरक पडतो ? (हाही एक किडाच). शब्दात तरी त्यानी मूर्त रुप घेतलय ना ? पण मग पाय मातीचे निघाले तर ?

आपल्याला काय वाटतं ?

Tuesday, June 10, 2008

वाचू आनंदे

"वाचू आनंदे " ही चार पुस्तकांची मालिका अप्रतिम आहे !!! बाल गट -१ & २ आणि कुमार गट १ & २ असे चार भाग. प्रत्येक भागाचे मूल्य ७५ रु (फक्त)- ज्योत्सना प्रकाशन आणि राज्य मराठी विकास संस्था यांचे संयुक्त प्रकाशन. संपादन: माधुरी पुरंदरे आणि साहाय्य: नंदिता वागळे. चित्रांचे मुद्रण सुरेख! कृष्णधवल असून सुद्धा जराही रसग्रहणात बाधा येत नाही. कविता, गद्य साहित्यातील उता-यांची निवड वादातीत आहे. प्रत्येकाने संग्रही ठेवावाच आणि मुख्य म्हणजे मुलांना वाचून दाखवावेच.ह्या मालिकेने मुलांना (आणि आपल्याला )रसग्रहणाची दृष्टि विकसीत करता येईल.

बाल गटाच्या भागाच्या blurb वरचा हा मजकूर : पुस्तकं आपल्याला कल्पनेच्या जगात घेऊन जातात, स्वप्न दाखवतात ; पण त्याच बरोबर आपण पहात असलेलं, ज्यामध्ये आपण जगत असतो ते जगही समजून घ्यायला शिकवतात. शब्दांमधून जसं जग दिसतं, जाणवतं तसच रंगरेषांमधूनही जाणवतं आणि तेही तितकंच मनोहारी असतं. शब्द आणि रेषांचं जग बरोबरीनं अनुभवता आलं तर आपलं जगाकडे पाहणं अधिक सुंदर होतं. म्हणूनच 'वाचू आनंदे'...

विषयवार सुद्धा ईतकी सुंदर निवड केली आहे- उदा- बालगट एक मधील Themes- निसर्ग, प्राणिसृष्टी , बालपण, कुटुंब , बालगट २ मधील Themes - घर-गाव-प्रदेश, रस्ते-प्रवास, शिक्षण, व्यवसाय/समाजजीवन, कला, भाषा, कुमारगट १ & २ मधील Themes त्याच परंतू उतारे अजून समृद्ध - at a more abstract level of understanding. उदा- बाग २- घर- ईरावती कर्वे- 'वेड लागलेलं घर', कुग २- 'घर'- महेश एलकुंचवार- 'वाडा'...Anthology च्या मर्यादा सांभाळून सुद्धा कविता आणि उतारे अचूक निवडले आहेत, क्वचित गरज लागेल तेव्हा एक दोन ओ़ळीत कथेचा/कादंबरीचा/काय घडुन गेले ह्याचा संदर्भ दिला आहे..
मराठीतील निर्विवाद मानदंड !! इतकं सर्वसमावेशक काम आधी पाहिलं नव्हतं.पुन्हा पुन्हा वाचावी अशी ही मालिका.. Hats off to Madhuri Purandare and Nandita Wagle. This is not a hotch potch of weirdly and prejudicially selected passages or paintings. Its a superb collection .. well chosen !! The painstaking details lend unerring accuracy to the volumes- eg- each painting has a one liner below it, eg- जहांगीर सबावाला. धबधबा. तैलरंग.
Simply Awesome ! Must Read & a Keepsake !!

कुठे मिळेल ?- कुठेही.. पुस्तक प्रदर्शनात, Crossword मधेही.
साधारण किती वयाच्या मुलांना समजेल?- बाल गट- मला वाटतं, किती वाचनाची आवड आहे त्यावर हे अवलंबून आहे. शिवाय मराठी माध्यमानेही फरक पडेल असं वाटतं..

Labels:

Sunday, March 11, 2007

Homecoming and more...

एकदाचं घरी internet connection आलं. ते मिळवायला किती रक्त आटलं आणि मिळवलेलं पाहिजे तेव्हा किती वापरता आलं, हा एका स्वतंत्र postचा विषय आहे. (Thanks to Hathway, the ISP company, whose downtime is more than their uptime,one spends more than what it costs for the connection, for phone calls to their so-called 24*7 call center, where the engineers take vacation on all weekends, and all public holidays. So if you feel like blogging on weekends etc.. Hathway ensures, that you can't.) असो. कनेक्शन सद्दृश काहीतरी आल्यामूळे आता माणसात (किंबहूना virtual माणसात परत येते आहे.) सध्या भारतात नवे राज्य, नवा डाव, नवे घर, नवीन कार्यालय, अद्भूत आणि अलौकिक मुंबई लोकल प्रवास असे सर्व पुनश्च हरिऊँम सुरु आहे. हे सर्व करताना दमछाक होते हे म्हणणे जबरदस्त understatement आहे."आता कसं वाटतय" किंवा "तुम्ही कसेकाय परत आलात ?" हा प्रश्न मित्र-मैत्रिणी, सध्या परदेशात असलेले आणि मनातून झूरत असलेले भारतीय सहकारी, मित्रमैत्रिणी, स्नेही, सुहृद, तसेच आसपासच्या सर्वांनी विचारला आहे. त्याचे उत्तर शोधण्याची ताकद आणि मुभा सध्यातरी आमच्यात नाही. "आपण परत का आलो" याची अनेक उत्तरं असली तरी at an abstract level आमच्यापुरते तरी उत्तर बरेचसे, "आपण कोण आहोत" आणि "आपल्याला आयुष्यात काय हवे आहे" ह्या प्रश्नांशी निगडीत आहेत असे वाटते. वाटते ह्या साठी की मुंबईत व्यक्तिश: माझा अनुभव हा अतीव थकव्याचा (extreme fatigue)चाच जास्त आहे. त्या रोजमर्रा जिंदगी च्या धकाधकीत विचार करायला मेंदूला ताण द्यायलासुद्धा वेळ आणि उर्जा नाही.

Now, catching up with thoughts online, as and when and if Hathway permits !Many Thanks to everyone who has been visiting my blog from time to time and sending me messages as to when I will start blogging again.

Monday, December 11, 2006

बाई बास करा आता !

शनिवारी 'नक्षत्रांचे देणे" ह्या कार्यक्रमाचा (२७ वा) आणि शेवटचा भाग पाहिला. आणि पुन्हा एकदा अनुराधा मराठेंचे गायन ऐकून वाईट वाटले.
बाईंचा आवाज पाSSSर गेलाय. नव्या को-या भांड्यांवर बोट फिरवल्यावर जसा च्यय्य्य्य्क आवाज येतो- तसा कानावर ओरखडे आणि अंगावर शहारे आणणारा आवाज झालाय. तो एकवेळ परवडला अशी सुरांची दुर्दशा झालीये. आवाज गेलाय हे (एक वेळ) मान्य केले तरी सूर कुठे गेले? बेसूर झालेल्या किती जागा दाखवाव्या? -हास , -हास म्हणतात तो हाच, याची पुन्हा एकदा खात्री पटली. ते भीषण "परवशता पाश दैवे" तर जन्मात विसरणार नाही. अगदी त्यांचे पेटंट "लटपट लटपट"- पण आपटलं. बाई- खरंच कळकळून विनंती आहे- स्वरयंत्र जिथे वयानुरुप दस्तुरखुद्द लताबाईंचे झिजले आहे तिथे तुमची काय कथा? बास करा आता!! आणि हे आत्ताचे नाहीये. सुधीर फडक्यांवरील नक्षत्रांचे देणेच्या भागातही त्या अनेक वेळा बेसूर झाल्यात. उदा-"मनोरथा चल त्या नगरीला".

ह्या कार्यक्रमात त्या कमी म्हणून की काय रविंद्र साठ्यांनी ही पाटी टाकली- आधीच तो सचिन करंबळेकर नावाचा ईसम उसनं अवसान आणुन लोकगीत म्हणत होता- साठ्यांनी जागा तर चुकवलीच पण तेही बे-सू-र झाले एका क्षणी.

चंद्रकांत काळे,नीना कुलकर्णी आणि विभावरी आपटेनी अब्रु सांभाळली. विभावरी आपटेनी ओम नमोजिआद्या, याला जीवन ऐसे नाव, आणि निळ्या आभाळी अप्रतिम सादर केलं. अनुराधा बाईंच्या पुढे तिचा आवाज कानात अमृत ओतल्यासारखा.
चंद्रकांत काळे मस्त!

कार्यक्रम संपल्यावर टाळ्या वाजवावश्या वाटल्या त्या "हुश्श!! संपला एकदाचा !" यासाठी. रविवारचा दुसरा भाग पाहण्याची हिम्मत केली नाही.

Wednesday, November 22, 2006

शरदोत्सव जपान २००६

सेन्दाईत दाखल झालो. वाटेत शरदाच्या लाल पिवळ्या खुणा सगळीकडे भेटत होत्या. पण ऐन बहर ओसरुन आता भकास लाल, केशरी छटा दिसत होत्या. हे म्हणजे चांगल्या नाकी-डोळी निटस असणा-या नववधूचा, हळदकुंकवाच्या मळवटानी अंबाबाई अवतार झालेला असावा तसे. ऐन बहरातले फॉल कलर्स कसे लालचुटुक, किंवा पिवळेजर्द दिसतात ईथे- मग चढत्या भाजणीने भकास दिसायला सुरवात होते.

दाखल झालो तो चांगली कडाडुन थंडी होती. त्या पिसाट थंडीत सामानासकट वणवणत दुस-या दिवशीच्या guided टुरचा थांबा आधी बघावा, मग हॉटेल शोधून त्यात सामान टाकावे आणि मग मार्गस्थ व्हावे असा (आमच्या मते) सरळ साधा सोपा ईरादा होता. पण "अडचणींशिवाय होईल त्याला प्रवास म्हणू नये" हा बहिणाबाईंच्या "कशाले काय म्हणू नये" यातील एक clause राहून गेला असावा… त्याला अजून एक corollary आहे- सुरवातीलाच अडचणी आल्या की नंतरचा प्रवास सुखाचा होतो (किंवा अडचणींची सवय होते)! त्या न्यायाने, वाट चुकलो, थंडीत डोकं बधीर होईस्तोवर वणवणलो, त्या टुर कंपनीच्या हापिसच्या बरोब्बर उलट्या दिशेला जाऊन आलो, तिथल्या जपान्यानी कधी जन्मात आपण असला टुर-बिर ऐकला नाही हा अविर्भाव केल्यावर तत्क्षणी हाय न खाता, जपानी भाषेच्या चिंध्या करत- शेवटी एकदाचे ईष्टस्थळी कडमडलो ! दुस-या दिवशीच्या सहलीत नाव नोन्दवले आणि हॉटेलात सामान टाकून, फिरायला निघालो. वाटेत, रस्त्याच्या मधोमध असणा-या तिन पिवळ्याजर्द झाडांनी शारदोत्सवाची सलामी दिली आणि आतापर्यंतच्या शापाला उ:शाप मिळाला.


सेन्दाईहून ट्रेननी मात्सुशिमाला दाखल झालो. नुसती पायपीट करणे हा उद्देश होता. उद्याच्या टूर मध्ये तसा हाही परिसर दाखवणार होते,पण असल्या सहलीत फराफरा ओढत नेतात म्हणुन आपल्याआपण जरा रमतगमत परिसर फिरावा, फोटो काढावे आणि रात्रीची खास fall colors साठी केलेली रोषणाई पहावी असा कार्यक्रम होता.


आता पावलोपावली दिसणा-या लालपिवळ्या बहराने हृदयाचा ठाव घेतला होता.


मात्सुशिमा हा परिसर म्हणजे जपानमधील सर्वाधिक सुंदर ३ ठिकाणांपैकी. 260 छोट्या छोट्या बेटांचा नयनरम्य परिसर- बे ऐरियाची सहल उद्याच्या टूर मध्ये होती म्हणुन नुसतेच किना-यावर फिरत होतो. जरासे ऊन पडले होते, त्यात थंडी सुसह्य वाटत होती. आसपासच्या शेकड्यांनी असलेल्या पर्यटकात एकही भारतीय उपखंडातला चेहरा दिसत नव्हता. परिसर फारच देखणा. हळूहळू उन खात, फिरत,फोटो काढत चाललो होतो.

दुरवर एक सुंदर लाल रंगाचा पादचारी पूल दिसत होता. तो शोधत शोधत २ कि.मी पुढे चालत गेलो- मग एका माऊलीने सांगितले की तो तर मागेच गेला. पुन्हा मागे येऊन तो पूल शोधला, पैसे भरले आणि फुकुरुजिमा नावाच्या छोट्या बेटावर दाखल झालो. "गर्द सभोवती रान साजणी" होते, "पाय टाकून जळात बसला असला औदंबर" नव्हता तरी दुस्ररीच झाडं पाण्यात पाय टाकून बसली होती. अशा ठिकाणी मनावार दाटते, ती शांततेची साय अनुभवत होतो.

तेवढ्यात समोर एक वृक्षकविता अवतरली.. पिवळ्या, लाल रंगाच्या अद्भूत पिसा-यातल्या काळसर फांद्या तर हातावरच्या नाजूक धमन्यांच्या जाळ्यासारख्या दिसत होत्या. त्या एका झाडात fall colors चे सर्व सौंदर्य एकवटलं होतं. ईथून पुढे बरीच वर्ष ते झाड माझ्या मन:पटलावर राहिल.

पुढे एका वळणावर एक “तानुकी” (raccoon) आला. त्यानी एका जपानी बाईच्या जीन्सची चव चाखून पाहीली.. ती बाई पण धन्य होती.. शांतपणे कुत्र्याशी खेळावं तसे त्याला बाजूला करायला पहात होती. आसपासच्या साताठ लोकांनी लगेच मोबाईलच्या कॅमेरात ते दृष्यब्द्ध केले. ( हे एक जपानी लोकांचे वैशिष्ट्य आहे, यम जरी आला समोर ,तरी त्याला आधी मोबाईलमध्ल्या कॅमे-यात टिपून घेतील (रेड्यासकट)!)
मला तर साध्या कुत्र्याची सुद्धा भिती वाटते, तो तानूकी बघून माझं निसर्गप्रेम एकदम आटलं- आणि पुढे काय झालं ते पहायला न थांबता आम्ही शुरपणे पळ काढला.

परत पादचारी पुलावर येईस्तोवर दुपारच्या पावणेचार वाजता सुर्यास्त झाला.
बे जवळच्या वेटिंग रुम मध्ये पोचलो - आता ५.३० वाजायची वाट पहायची होती. रात्रीच्या रोषणाईसाठी. आतापर्यंत ६ एक तास अव्याहतपणे थंडीत फिरत होतो.जरा टेकलो तसे बरेच अवयव दुखायला लागल्याची जाणीव झाली.त्या अवस्थेत Hot Chocolate पण अमृततुल्य लागलं.

५.३० ला त्या उबदार Waiting Room मधून पाय ओढत, बाहेरच्या ३-५ डिग्री तापामानात. सेदारच्या जंगलात, झुईगांजी मंदिराच्या परिसरात कलात्मरित्या केलेली हिरवी रोषणाई पहात होतो. नवरा ट्रायपॉड लावून फोटो काढत होता. तिथेच तास गेला- आम्हाला येवढ्या थंडीत (तडफडत) फोटो काढताना पहायला एक जपानी आजी-आजोबा आले. आज्जी म्हणाली “तुम्ही एन्त्सुईन ला जा , तिथली रोषणाई इथल्यापेक्षा सुंदर आहे. तिथे काढा फोटो” एवढं म्हणुन आमच्या हातात १००० येन ची तिकीटं कोंबून ते गेले सुद्धा. मी ईतकी गोंधळले होते की तिचे आभार मानावे, पैसे विचारावे वगैरे काही सुचलं नाही. सुचलं तोपर्यंत ते लुप्त झाले होते.
आत एन्त्सुईन मध्ये गर्दीच गर्दी. Fall Colors ला उठाव यावा म्हणून जी रोषणाई केली होती ती केवळ अद्भूत होती. स्वर्ग कदाचीत असाच असावा असे भासवणारी- त्यात त्या डोळ्यातून पाणी काढणा-या बोच-या थंडीचाही सहभाग होता. तिच्या शिवाय, ईतके गूढ धुक्याचे वातावरण तयार झाले नसते. थंडीत फोटो काढून हात गारठले, दात वाजायला लागले, खालच्या जमीनीतली थंडी आता पादत्राण भेदून पायात शिरत होती,पण हौस नावाची गोष्टच अजब असते.

त्या लाल, हिरव्या, पिवळ्या रोषणाईत भूल पडल्यासारखं झालं होतं.त्यातच एक माणूस त्यांनी, संपूर्ण पारंपारिक पोषाखात पावा वाजवायला ठेवला होता. पाईड्पाईपर च्या मागे मुलं जावीत तसे सगळे चालले होते.त्यातच नव-याच्या ट्रायपोडच काहीतरी पडलं, कॅमेरा पडला नाही हे बघून जीवात जीव आला.

शेवटचा टप्पा आला होता, आणि एकदम जे समोर आलं त्यानी विस्फारलेले डोळे पुढची १५ मिनीट तसेच होते. तळ्याकाठ्च्या झाडांवर प्रकाशझोत आणि खाली पडलेलं तळ्यातलं प्रतिबिंब- वर आकाशात एकही चांदणी दिसत नव्हती, दिक्काल धुक्यात हरवलेले काही क्षण ! दिव्यांचा प्रकाश ईतक्या खुबीने टाकला होता की- ३ झाडांची तिन प्रतिबिंब , तळ्यात अप्रतिम दिसत होती. एक हिरव्या पानांचं झाड डावीकडे, मधला विशाल वठलेला,एकही पान नसलेला भुताटकीचा वृक्ष आणि उजवीकडे शारदोत्सवाचे प्रतिक असलेले पिवळ्या लाल पानांचे झाड.. तिथेच तळ्याकाठी पावा वाजवणारा तो पूर्ण पारंपारिक पोषाखातला वादक-.. त्याक्षणी काय वाटले ते शब्दातीत आहे. ते तळ्यातलं प्रतिबिंब पाहून “प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर" असल्याची साक्ष पटत होती. दुर्दैवाने ट्रायपॉडने दगा दिल्याने पुढचे फोटो रात्रीच्या अंधारात येणे अशक्य होते.

५ वेळा तरी आम्ही exit पाशी येऊन, परत एकदा ते पहायला मागे गेलो. बाहेर पडलो ते गोठूनच, आणि ट्रेनची वेळ साधायलाच.. ट्रेनमधल्या उबेत विसावल्यावर Defrost होतोयसं वाटल.

पहिला दिवस सुफळ संपूर्ण.

Sunday, November 12, 2006

The Story of Barefoot Gen ह्या जपानी anti-war/anti-nuke story चा अनुवाद (भाग ४-६)

(4)

एक दिवस एक पोलिस बाबांकडे आला आणि म्हणाला " तुमची चौकशी करायची आहे. ताबडतोब पोलीसचौकीवर हजर व्हा". बाबांना हातकड्या अडकवून, त्यांना तो पोलिसचौकीवर घेऊन गेला. बाबांना गार फरशीवर ओणवं केल्या गेलं आणि सोट्यानी मारहाण केली गेली. ते बेशुद्ध पडले तसे, त्यांच्या तोंडावर बादलीभर पाणि मारून, कातड्याच्या मजबूत बुटांनी पेकाटात लाथ घालून, पुन्हा बेशुद्ध पडेस्तोवर मारल्या गेलं. पण कितीही छळ झाला तरी त्यांचे युद्धविषयक विचार बदलू शकले नाहीत.
गेन आणि उर्वरित कुटूंब घरी हताश होऊन बसले. कोणाची कमाई नाही म्हणून त्यांच्याकडे अन्न विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. शिन्जी रडू लागला-"मला भूक लागली. मी आता उपाशीपोटी मरणार".
"बाबा घरी परत येईपर्यंत धीर धर बाळा" आई म्हणाली.
त्या काळात तांदूळ विकत घेता येणे हे खूप अवघड होते. हि-यांईतकाच महाग आणि दुर्मिळ असायचा तांदूळ तेव्हा!लोकांना भाता ऐवजी धान्याचा कोंडा किंवा भोपळ्याच्या वेली किंवा जे काही खाण्यासारख असेल ते खावं लागायचं. तांदूळ विकणा-यांना नाकाओका कुटुंबासारख्या "गद्दारां"बरोबर व्यवहार करायला मनाई होती. म्हणून आता घरात कुठलंही अन्न शिल्लक नव्हतं
मग गेनच्या सुपीक डोक्यात एक नवी कल्पना आली." आई आपण नाकतोडे पकडून रात्रीच्या जेवणात ते खाऊ."
गेन आणि शिन्जी शस्त्रात्रांच्या टप्प्याकडे धावले, आणि आई आणि ऐको पिशवी घेऊन त्यांच्या मागे धावल्या. काही नाकतोडे पकडुन ते भाजण्यासाठी घरी घेऊन जाताना वाटेतच त्यांना बाबा भेटले. अटकेनंतर २ आठवड्यांनी त्यांची अखेर सुटका केली गेली होती. आनंदानी गेन आणि शिन्जी त्यांना बिलगले.बाबांनी त्यांना घट्ट मिठी मारली आणि ते म्हणाले" सगळं ठीक होईल आता. मी आता तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही"..... जखमांनी आणि व्रणांनी त्यांचे सगळं शरीर भरलं होतं आणि होते त्यापेक्षा खूप बारिक होऊन ते परत आले होते.
भाजलेल्या नाकतोड्यांच्या जेवणानी त्यांनी बाबांचे सुखरुप पुनरागमन साजरं केलं.

(5)
राजाधिराज हा जपानचा ईश्वर आहे आणि सर्व मुलं त्या राजाची मुलं आहेत असे त्या काळी शाळेत शिकवले जायचे. गेनचे शिक्षक म्हणाले" मुलांनो, चांगले मोठे व्हा, राजाधिराजांच्या आज्ञेनुसार कुठेही जाणारी आणि प्रसंगी त्याच्यासाठी स्वप्राणाची आहूती द्यायला तयार असणारी जपानची शक्तिशाली मुलं व्हा"!
एक दिवस गेनच्या वर्गातील मुलांना, दुरदुरच्या समरभुमीत लढत असलेल्या सैनिकांना उद्देशून पत्र लिहायला सांगीतलं गेलं. सैनिकांना पाठवण्याआधी मुलांना आपले पत्र सगळ्या वर्गासमोर जोरात वाचून दाखवायला सांगितले.
एका मुलानी लिहीलं " Dear Soldiers , आशा आहे की तुम्ही बरे आहात. मोठा झाल्यावर मी सुद्धा तुमच्यासारखा सैनिक होईन आणि खूप अमेरिकन सैनिकांना मारेन. Please keep up the good work.
दुस-या एका मुलीनी लिहीलं " आम्हीही जपान युद्ध जिंकेपर्यंत कसलेही हाल सहन करु. राजासाठी आणि देशासाठी आम्ही कधीही प्राण द्यायला तयार आहोत."
मास्तरांनी या मुलांच कौतूक केलं आणि त्यांची पाठ थोपटली.
आता गेनला त्याचे पत्र वाचून दाखवण्यास सांगितले गेले. गेन वाचू लागला" Dear Soldiers . माझे बाबा म्हणतात की जपानने ह्या युद्धात भाग घेऊ नये. युद्धात अगणित जीव जातात आणि युद्ध विनाश करते. मलाही तसेच वाटते. Please don't die, soldiers . तुमच्या आईवडिलांना दु:ख होईल."
"मुर्खा हे लिहून तु स्वत:ला खरा जपानी मुलगा म्हणवतोस? पुन्हा लिही ते नीट" मास्तर ओरडले.

गेननी पुन्हा पत्र लिहायला नकार दिला, तेव्हा मास्तरांनी त्याच्या कानफटात मारुन, त्याला दोन्ही हातात बादलीभर पाणी घेऊन बाहेर उभं रहायला सांगीतलं. तास संपल्यानंतर त्याला शिक्षकांच्या खोलीत नेण्यात आलं. आत शिरताच ऐको ला (बहिणीला) अर्ध्या कपड्यात पाहून गेनला धक्काच बसला. गेनला पाहताच ती मुसमुसत सांगू लागली " वर्गातले काही पैसे चोरिला गेले आहेत आणि माझे मास्तर म्हणतात की ते मी घेतले आहेत. मी खरच पैसे घेतले नाहीत, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही." मास्तरांनी तिचे कपडे काढून, तिची झडती घेतली, पण त्यांना पैसे कुठेच सापडले नाही. त्यांना वाटलं तिने पैसे दुसरीकडे कुठेतरी लपवले, आणि त्यांनी तिला कबूल करेपर्यंत तसच उभं राहण्याची शिक्षा केली.
"माझी बहीण खोटं बोलत नाही तिच्यावर अरेरावी करु नका" गेन म्हणाला. आपली बहिण निष्पाप असल्याचे गेन वारंवार मास्तरांना पटवायचा प्रयत्न करत होता, पण मास्तर विश्वास ठेवायला तयार नव्हते.
जपानच्या दुर्दैवाने, युद्धाच्या काळात शिक्षकांना युध्दकार्याला मदत करणे अनिवार्य होते- त्यांना आवडो किंवा न आवडो.शाळेच्या अधिका-यांची आणि इतर महत्वाच्या व्यक्तिंची त्यांच्यावर सतत देखरेख असायची. विरोध करणा-या विद्यार्थ्यांना शाळेत ठेवायची मनाई होती. खरं बोलतं असले तरी गद्दार आणि त्याच्या मुलांवर विश्वास ठेवला जात नसे.
"खी खी खी"''रयुकीची (अध्यक्षांचा मुलगा) खिडकीतून बाहेर पाहून दात विचकू लागला.
"त्या नाकाओका मुलीला चांगली अद्दल घडली. मीच तिची कागाळी केली होती."
दुस-या दिवशी सकाळी शाळेची वेळ होऊनसुद्धा ऐको ऊठली नाही. आई तिच्या गादीपाशी जाऊन म्हणाली- "ऐको, काय झालय तुला?" ऐको काही उत्तर देईना, नुसतं हमसून हमसून रडत होती. मग गेन म्हणाला" तिला शाळेत जायचे नाही कारण मास्तरांनी तिच्यावर चोरीचा आळ घेतला आणि तिचे कपडे काढून झडती घेतली."
हे ऐकून बाबांनी कंबर कसली. ते शाळेत गेले आणि शिक्षकांच्या खोलीत शिरले. गेन सांगतोय ते खरं आहे का याची त्यांनी मास्तरांकडे शहानिशा केली आणि त्यांना ऐकोला पैसे चोरताना पाहणा-या मुलाला आणायला सांगीतलं. रयुकिचीला बोलवण्यात आलं आणि लवकरच त्यानी आपण खरतर तिला पाहिलं नसल्याचं कबूल केलं. "मी खोटं बोललो, कारण मला तिला त्रास द्यायचा होता" तो म्हणाला.
हे ऐकून बाबांनी रयुकिची आणि मास्तरांना चांगलच फैलावर घेतलं.

(6)
बाब घरी आले तोच त्यांनी कोज़ी समोर(गेनचा सर्वात मोठाभावासमोर) आईला रडताना पाहिलं. तो खरंतर दूर दारुगोळ्याच्या कारखान्यात असायचा, पण आता तो आपण नौदलात जातोय हे आईवडिलांना सांगायला आला होता. आईनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो काहीच ऐकत नव्हता. बाबांनी कोजीला त्याच्या नौदलातून हात-पाय गमावून आलेल्या चुलतभावाचा विचार करायला सांगीतलं.
"कोज़ी, माझ ऐक!" बाबा म्हणाले " युद्धात सहभागी व्हायला शौर्य लागतं हे फक्त मुर्खाला वाटत, पण खरं शौर्य लागतं ते स्वत:च्या आणि दुस-याच्या आयुष्याची पर्वा करायला. ह्या निरर्थक युद्धात मी तुझा बळी जाऊ देणार नाही".
"नाही. मी नौदलात भरती होणारच. मला आता "पळपुटा", "गद्दार" हे ऐकून घेणं सहन होत नाहीये." मग त्यानी आईवडिलांना सांगीतलं की त्याने नौदलात जायचं का ठरवलं. त्याच्या कारखान्यात एक स्फोट झाला होता आणि त्याच्यावर संशयित असल्याचा आरोप करण्यात आला. एका पोलिसाने त्याला अटक केली आणि त्याच्याकडून कबूलीजवाब मिळवायला त्याला बेदम मारहाण केली.
"तुझा बाप देशद्रोही आहे आणि तुझ्यात तेच गद्दाराचं रक्त आहे. तूच हा दारुगोळ्याचा कारखाना बंद पाडायचा प्रयत्न केलास."- पोलीस कोजीला म्हणाला.

नंतर त्यांना कळलं की short circuit मुळे तो स्फोट झाला होता.पण आपल्या निर्दोष असण्याचा हा पुरावाही, कोजीचा नौदलात जाण्याचा निर्णय बदलू शकला नाही. त्यानी लोकांना आपण देशद्रोही नसल्याचे शाबीत करुन दाखवायचे ठरवलं होतं. युद्धाच्या खाईतून मेडलांनी विभुषित होऊन परत येण्याचा त्याचा मानस होता. मग त्याच्या भावांना गावात ताठ मानेनं चालता आलं असतं.
कोजीचा नौदलात जायचा दिवस आला. आई, ऐको आणि दोन्ही भाऊ त्याला निरोप द्यायला स्टेशनवर गेले, पण शेजारपाजारुन कोणीही गेले नाही. बाबा घरी थांबले होते तरी आपलं काळीज फाटतयसं दु:ख त्यांना झालं होतं.
"हुर्रे! Three cheers for Koji "" त्याचे भाऊ ओरडले. आई आणि ऐको हुंदके देत होत्या.
हळुहळु त्यांचे आवाज मागे ठेऊन गाडी पुढे निघून गेली. आगगाडी स्टेशनपासून जरा दूर गेली, तसे कोजीने बाहेर पाहिले. Track च्या बाजूला बाबांना उभे पाहून कोजीला आश्चर्य वाटलं. आगगाडी पुढे जाऊ लागली तसं बाबांनी हात वर करुन आरोळी ठोकली. " Three Cheers. Hurrah for Koji Nakaoka . जिवंत परत ये बाळा".
"धन्यवाद बाबा"- कोजी म्हणाला.
गाडी दिसेनाशी होईपर्यंत बाबा पहात राहिले. त्यांचे डोळे पाण्यानी भरले होते.
क्रमश:

Thursday, November 02, 2006

The Story of Barefoot Gen ह्या जपानी anti-war/anti-nuke story चा अनुवाद

हादाशी नो गेन- The Story of Barefoot Gen ह्या जपानी anti-war/anti-nuke story चा अनुवाद.

(1)
गेन नाकाओका- आपल्या गोष्टीचा नायक, हिरोशिमात जन्मला आणि वाढला. तो प्राथमिक शाळेत जाऊ लागला त्या सुमारास, जपानची ब्रिटन आणि अमेरिकेविरुद्ध लढाई चालू होती.
जपानच्या युद्धातील पराभवाच्या जरा आधीच्या काळात ह्या कहाणीची सुरवात होते.

गेन हा ७ वर्षाचा खट्याळ,आनंदी मुलगा. नवनवीन खोड्या शोधून काढण्यात वाकबगार. त्यासाठी,धाकट्या भावाला-शिन्जीला त्याच्याबद्दल खूप आदर होता. रोज शाळेतून गेन घरी आल्यावर, दोघजणं एकमेकांशी अंधार पडेस्तोवर खेळायचे. त्यांचे वडील लाखेच्या कामातील कुशल कारागीर होते. स्वत:च्या घरातील छोट्याशा workshop मध्ये लाकडावर लाखेची चित्र काढून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असत. आई घरकामात, कुटुंबाची काळजी घेण्यात आणि वडिलांना मदत करण्यात व्यग्र असे. मोठा भाऊ -कोजी माध्यमिक शाळेत शिकत असे. शाळेत जाण्याऐवजी तो आणि त्याचे मित्र आताशा, घरापसून लांबच्या, हिरोशिमाच्या जवळच्या दुस-या गावात, एका दारुगोळा बनवायच्या फॅक्ट्रीत काम करत असत. सरकारी धोरणानुसार, जपानला युद्ध जिंकायला मदत म्हणुन, विद्यार्थ्यांना अशा कारखान्यात काम करावं लागत असे- त्यांची ईच्छा असो वा नसो! शाळेच्या ईतर विद्यार्थ्यांसोबत अकिराला (२ नंबरच्या भावाला), जिथे बॉम्बहल्ल्याची कमी शक्यता होती अशा दूरच्या गावात जाऊन रहावं लागलं. निघताना, भरलेल्या डोळ्यांनी, अकिरा आईला "मला जायचे नाही" म्हणत होता.तिस-या ईयत्तेतल्या मुलांपासून evacuation ची सुरवात झाली होती आणि अकिरा तिस-या ईयत्तेत होता. एकुलती एक बहिण 'ऐको', ५व्या ईयत्तेत असली, तरी तब्येतीने अशक्त असल्यामुळे घरी आईवडिलांकडे थांबू शकली होती. गेनचं कुटुंब ह्या सात जणांच होतं. युद्धाच्या सगळ्या समस्यांना, होता होईल तो एकमेकांना सांभाळुन हे कुंटुंब तोंड देत होतं- पण युद्ध संपेपर्यंत कुटुंबातले सगळेच काही जिवंत राहिले नाहीत...

एक दिवस, आईने गेनला तिच्या पोटाला कान लावून ऐकायला सांगितलं. आईच्या पोटात काहीतरी जोरदार हालचाल होत होती. "आपल्या घरी लवकरच नवीन बाळ येणार आहे आता "- आई हसत हसत म्हणाली.
“माझं छोटा भाऊ किंवा छोटी बहीण- “ गेन किंचाळत म्हणाला.
"आणि बाळ लाथ मारतय.."
दोन मोठ्या मुलांच्या वियोगामुळे तसं सगळं घर उदास असायच. पण आता गेनच्या आनंदातिशयानी आख्ख्या घरात धीर आणला, आशा आणली.

गेन आणि शिन साठी अगदी आनंदाची गोष्ट म्हणजे- कुटुंबाच्या गव्हाच्या शेतात जाऊन बाबांना मदत करणे.गव्हाच्या कापणीची ते दोघं अगदी आतुरतेने वाट बघायचे कारण त्यांना खात्री होती की आपण ह्यापासून नुडल्स किंवा ब्रेड बनवू शकू. त्यांची एकच ईच्छा होती , एका दिवसासाठी का होईना, पण पोट तुडुंब भरलेलं असावं! रोजच्या जेवणात, अक्षरश: भाताची शित मोजता येतील एवढी पाणीदार कांजी असायची. त्या काळ्या दिवसात जपानातील ईतर लोकांप्रमाणेच, ते नेहमीच भुकेले असायचे.

(2)
बाबा कधी कधी निराश व्हायचे, कारण त्यांना कळत होतं की जपान एक दुस्तर युद्ध लढत आहे. सुदूर दक्षिणेकडिल बेटांवर तैनात केले गेलेले शिपाई तण, उंदीर, साप आणि जे मिळेल ते खात होते. तरिही उपासमारीने मरत होते. काही आजारी पडले, तर काहींच्या बॉम्बहल्ल्यात ठिक-या ऊडाल्या. आपल्या कुटुंबाला सुखसमाधानात रहायला मिळावं म्हणुन बाबा आतुरतेने युद्ध संपायची वाट बघत होते. त्यांच्या तीव्र ईच्छेला न जुमानता, युद्धाची धुमश्चक्रि दिवसेंदिवस वाढतच होती.

१९४५ मधील एप्रिलच्या पहिल्या दिवशी, अमेरिकेची फौज ओकिनावात(जपानच्या सर्वात दूरच्या तटबंदीवर) डेरेदखल झाली. घनघोर लढाईने ओकिनावाच्या रहिवास्यांना घेरलं आणि जवजवळ विध्वंसाच्या टोकांपर्यंत नेउन ठेवलं.ओकिनावाची हिरवीगार धरती आणि निळ्याशार समुद्र ,रक्ताच्या लाल रंगाने माखले. दुष्मनांचे हवाई दलं जवळजवळ रोज mainland जपानकडे जाऊ लागले. शहरांवर बॉम्ब टाकून, आगीचे डोंब उसळ्वू लागले आणि रातोरात शहरं बेचिराख करु लागले. आगीच्या लोळात अगणित लोकं जळुन मेले. रेडिओ आणि वर्तमानपत्र मात्र, जपान सगळ्या लढाया जिंकत असल्याचे खोटे वृत्तांत देत हो्ते. ज्या नेत्यांनी युद्धात लढ्ण्याचा निर्णय घेतला होता ते ठासून सांगत होते " जपान हा पवित्र देश आहे. आपण युद्ध जिंकणारच ". नेतेमंडळी धादांत खोटं बोलत होती आणि युद्ध थांबवायला नकार देत होती. वृत्तांत ऐकणा-यांचा मात्र, शेवटी जपान युद्ध जिंकणारच, असा समज होत होता. लोकं रोज तकलादू बांबूच्या काठ्याकामट्यांनी शत्रूला कसं मारायच- हे शिकायसाठी कवायती करत होते. शेवट्च्या माणसापर्यंत लढण्याचे संकल्प सोडत होते.
एक दिवस, बाबा जरा जास्तच साके पिऊन या भाला कवायतीत गेले. त्याचा, त्या कवायतीच्या प्रमुखाला खूप राग आला. तो स्थानिक समितीचा अध्यक्ष होता. " तुम्हाला आपल्या अतिमहत्वाच्या युद्धाबाबत गांभिर्य नाही. दारु पिऊन कवायतीला यायची तुमची हिम्मतच कशी झाली ? अशा पवित्राने तुम्ही अमेरीकेच्या शिपायांचा पराभव कसा करणार? तुमच्यात योग्य ती भावना नाही. "
"अध्यक्षसाहेब, अशा माणसाला काढूनच टाकलं पाहिजे.. असा माणुस म्हणजे गद्दारासारखाच- "असे भाला हाताळायला शिकवणारा एक निवृत्त म्हातारा शिपाईगडि म्हणाला. "अगदी बरोबर"- अध्यक्षाने मान डोलवली..

आता बाबांनाही राग आला.. ते म्हणाले "गप्प बसा. मी निव्व्ळ दारु पिऊन आलो म्हणुन मी गद्दार ठरत नाही. शिवाय ह्या बांबूच्या भाल्यांनी अमेरिकनांचा पराभव करायची आशा बाळगणे हे मुर्खपणाचे आहे. सुरवातीपासून अंतापर्यंत हे युद्ध ही एक चुक आहे."
मग बाबांनी भाला फेकून दिला आणि ते घरी गेले. अध्यक्ष आणि त्याचे गडि, सगळे त्यांच्यामागून "गद्दार, गद्दार "च्या आरोळ्या देत होते. युद्धाला विरोध करणा-यांना सरसकट गद्दार म्हणलं जायच. त्यांची अट्टल गुन्हेगारांहून जरा कमी अवहेलना केली जायची.

(3)
गेन्- ऐक मी काय सांगतोय ते"- बाबा म्हणाले. "यूद्धानी माणसं, प्राणी, झाडं आणि घरं सगळच उद्ध्वस्त होतं. दु:ख आणि यातना या शिवाय युद्ध आपल्यासाठी काहीही मागे ठेवत नाही.जपाननी युद्ध थांबवून शांतीचा मार्ग अनुसरला पाहिजे."

ते काय म्हणत होते ते गेनला समजणे अवघड होतं. तरीपण बाबांच बरोबर आहे याची गेनला खात्री होती.
पण शेजारपाजारचे मात्र रस्त्यावरुन जाता येता गेन आणि त्याच्या भावाकडे तुछ्चतेने बघत आपल्या मुलांना कुजबुजत सांगत:" त्यांचे वडिल गद्दार आहेत. मुलं ही बापाच्याच वळणावर जाणार. त्यांच्यापासून दूर रहा."

एक दिवस गेन, ऐको आणि शिनजी वडिलांनी लाखेच्या गिलावा दिलेल्या लाकडी वस्तू ठेल्यावर टाकून, ठेला खेचत घाऊकविक्रेत्याकडे नेत होते. मिळालेल्या पैशातून, काळ्याबाजारातून तांदूळ विकत घ्यायचा होता. नदीकाठच्या रस्त्याला लागले, तसे त्यांच्यावर दगडफेक होऊ लागली. दगडफेक करणारी मुलं म्हणजे अध्यक्षांचे चिरंजीव ( ryukichI )र्युकिची आणि त्याचे टारगट मित्र. त्यांनी ह्या तिन मुलांचा रस्ता अडवला आणि म्हणाले "गद्दार कुठले! तुम्हाला पुढे जाऊच देणार नाही आता". मग त्यांनी ठेला हिसकावून घेतला आणि नदीत ढकलून दिला. तो माल नदीत भिजला आणि वाया गेला.

गेनच्या तळपायाची आग मस्तकात गेली . "बाबा गद्दार नाही. तू खोटारडा आहेस" क्षणार्धात, तो र्युकिचीच्या अंगावर धाऊन गेला आणि त्याच्या बोटाला कडकडुन चावला- डोक्यात धोंडा बसूनही तो बोट सोडेचना.
र्युकिचीने भोकाड पसरलं आणि रक्त ठिबकणारे आपले बोट घेऊन तो पळून गेला. गेन ती मारामारी जिंकला खरा, पण त्याला त्या यशाचा आनंद घेता आला नाही. ऐको आणि शिन्जी अपमानाचे अश्रू ढाळत होते.
अचानक, गेनला बाबांचा नेहमीचा उपदेश आठवला- "ग़ेन- धिर धर बाळा. तू गव्हाच्या ओंब्यांसारखं सशक्त असलं पाहीजेस. गहू किती वेळा पायदळी तुडवला जातो म्हणून पुन्हा पुन्हा ऊठुन उभा राहू शकतो."

मुलांनी, भिजून तरंगत असलेला सगळा माल नदीतून गोळा केला आणि घरी घेऊन आले. पण आईबाबांना त्यांनी घडलेली घटना पूर्ण सांगीतली नाही. फक्त माल नदीत पडल्याचं सांगीतलं.

क्रमश:

Tuesday, October 03, 2006

तोक्योतला गणेशोत्सव वंदना गुप्ते आणि राणी वर्मांबरोबर

काही क्षणचित्रे
Link to the official report on Tokyo Marathi Mandal's website.
http://www.sutra.co.jp/marathi/newSite/main.html

उत्सवमुर्ती.

वंदना गुप्ते आणि राणी वर्मा "ती" हा कार्यक्रम सादर करताना
३५ वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत असलेल्या वंदनाताईंची एक भावमुद्रा
"ती"चा प्रवास गीतातून मांडणा-या राणीताई
प्रेक्षकांशी सुहास्य वदने मारलेल्या दिलखूलास गप्पा.
कामाकुरातील बुद्धमुर्तीसमोर
Vandana Gupte and Rani Varma at Kamakura

Wednesday, September 06, 2006

भुकंपासाठी (प्रयत्नपूर्वक) सुसज्ज जपान


मागच्याच आठवड्यात एक भुकंप झाला. तसे नेहमीच होतात- पण हा जरा विशेष जाणवण्यासारखा होता. त्याच्या दुस-याच दिवशी- १ सप्टेंबर ला- १९२३ च्या Great Kanto Earthquake च्या anniversary निमीत्ताने जपानमध्ये मोठी Earthquake Drill होती. त्याची ही क्षणचित्रे.
http://news.bbc.co.uk/2/hi/in_pictures/5305932.stm
http://news.bbc.co.uk/2/hi/asia-pacific/5304562.stm


भुकंपाची पुर्वतयारी करायलाच हवी असे जपान मध्ये इतके बिंबवले जाते की शिशूविहारापासून सगळीकडे ह्याचे प्रशिक्षण सुरु होते. सर्वात महत्वाचे म्हणजे emergency earthquake kit तयार करणे. यात पाणी, थोडे खायचे सामान, काही महत्वाची औषधे, अतिमहत्वाची कागदपत्रे, पैसे, रेडियो, टॉर्च, काड्यापेटी अशा वस्तू एकत्रित ठेवाव्या.
इथे अजुन एक शिकवले जाते ते म्हणजे भुकंप होत असताना, सर्वप्रथम गॅस बंद करायचा, दार किंवा खिडकी उघडायची (म्हणजे अडकलो तर बाहेर पडायला) आणि पहिले जाउन टेबलाखाली बसायचे. कारण असे की, भुकंपात सर्वात जास्ती इजा ही धडाधडा पडणा-या वस्तूंनी होते- त्यापासून वाचण्यासाठी. सगळी theory माहीती आहे पण भुकंप होत असताना मात्र बाहेर पळुन जायचीच उर्मी दाटून येते. इकडे ते कानीकपाळी ओरडुन सांगत असतात, की अजिबात बाहेर पळुन जायची घाई करु नका. तसे केले तर डोक्यात दगड विटा पडण्याची शक्यता फार. टेबलाखाली बसा आणि भुकंप संपल्यावर (जगला-वाचला तर) त्वरित जवळच्या earthquake designated safe areas/ evacuation ground मध्ये आपली emergency kit घेउन जा. इथे असे शिकवतात की भुकंपात सर्वात जास्ती मनुष्यहानी ही अंगावर वस्तु पडुन किंवा त्याहुन जास्ती आग लागुन होते. आग लागली की संपले. म्हणुन भुकंपात कधीही elevator वापरायचा नाही. भुकंप सुरु झाला की त्वरीत गॅस बंद करावा. प्रत्येक मजल्यावर fire extinguisher असतेच. ( तो हाताळायच्या सर्व Instructions अर्थातच फक्त जपानीत असतात.)

टेबलाखाली जा- हे हज्जार वेळा ऐकले आहे- पण केले नाही कधी. या मे महिन्याच्या सुरुवातीला एक भुकंप झाला तेव्हा आम्ही Costco त होतो. त्यावेळेला ह्या शिकवणुकीचे महत्व पटले. त्या अवाढाव्य Costco त वस्तु पडायला लागल्याकी! नशीब खूप मोठा भुकंप नव्हता- नाहीतर ५ किलोचे Tide टाळक्यात बसले असते तर त्या भुकंपानी नाही तरी Tide नी नक्कीच इजा झाली असती.
ऑफीसात पण तेच- भुकंप होत असताना, मोठा आहेसं वाटलं, की जपानी लोकं सटासट टेबलाखाली आणि समस्त परदेशी जनता घाबरत एकमेकांच्या तोंडाकडे पाहत उभे असतात. माझं आधीच कार्यालय १४व्या मजल्यावर होत. तर ब-याच जपानी बाया आपल्या cube मध्ये spare flat (बिनटाचेच्या) चपलांचा जोड ठेवायच्या. म्हणजे भुकंपात पळायला लागले तर उपयोगी होतील. कारण जपानी बाया झाडुन सगळ्या उंच टाचांच्या चपला घालतात. नव-याचं आधीच office ४४व्या मजल्यावर होतं. त्यांची disaster drill असायची ६ महिन्यातुन एकदा. ४४ मजले जिन्याने उतरत येणे म्हणजे- १ तास लागतो.. इतका वैतागायचा.. पण वेळ कधी सांगून येत नाही- म्हणून पूर्वतयारीच्या होता होईल तो सर्व सुचना अमलात आणाव्याच.
इथे असेही खूप सांगतात की- घरच्या लोकांनी अशा संकटकाळी नक्की कुठे भेटायचे ते आधी ठरवून ठेवायचे . कारण फोन बंद होणार, कदाचीत ट्रेन ही. बायको घरी, नवरा कार्यालयात आणि मुलं शाळेत असतील. अशा प्रसंगी आधी ठरवलेले बरे.
जवळचे evacuation areas सर्वांनी जाउन आधी पाहुन यावे- असेही म्हणतात.

तोक्योत म्हणे दर ७०/८० वर्षांनी का काय एक जोरदार मोठठा भुकंप होतो. तर असा ह्या दशकात अपेक्षीत आहे वगैरे. त्यामुळे जोरदार तयारी सुरु असते सगळीकडे. असे म्हणतात की सरकारची सर्व आकडेवारी तयार आहे.की अमुक एक strength चा भुकंप झाला तर किती जिवीतहानीची शक्यता आहे -वगैरे.

खुद्द भुकंप तर अनेक प्रकारचे. काही अमीर खा साहेबांच्या आलापीसारखे धिम्या गतीत सुरु होउन मग धडाधड जोरात हलायला लागते. बिलडिंगा एक तर आडव्या (म्हणजे Pendulum सारख्या ) नाहीतर पुढे मागे हलतात... मग या ताना झाल्या की परत विलंबीत लयीत हलुन हळुहळु थांबतात. दुस्-या प्रकाराची मला जास्ती भिती वाटते.. जमिनीतुन खालुन असा [ढुप्प SSS] आवाज येउन,बॉम्ब पडलाय की काय- असे वाटावे असा आवाज आणि जमिनीखालुन हलतय असे वाटते...
असा एक भुकंप मागच्या वर्षी जाणवला. त्यावेळेला आम्ही खरोखर घाबरुन खाली पळालो (पहिल्यांदा). संपल्यावर वर आलो तर- पेपरवाला एवढ्या परिस्थितीत शांतपणे elevator नी वर येउन स्थितप्रज्ञाप्रमाणे पेपर टाकुन गेला होता.
अजुन एक भिती म्हणजे त्सुनामी ची. भुकंप झाल्याच्या २-या मिनिटाला टी.व्ही वर माहिती यायला सुरुवात होते. त्सुनामी नो शिंपाई वा अरीमासेन... म्हणजे त्सुनामी होण्याची शक्यता नाही. क्वचित कधीतरी गल्लीतुन ग़ाड्या कर्णे घेउन तीच त्सुनामी ची घोषणा करत असतात. आम्ही तर bay area त राहतो. ती त्सुनामी ची warning पाहील्याशिवाय जिवात जीव येत नाही.

मला भिडणारी गोष्ट म्हणजे- भौगोलिकद्ष्ट्या अस्थिर जमीन हा जपानला शाप असेल- तर त्यांची पूर्वतयारी म्हणजे खरोखर उशा:प आहे असे म्हणायला हरकत नाही. In Japan, in an earthquake, if you die- it will not be for lack of trying.

Tuesday, September 05, 2006

भावनेला येवू दे गा....

झोपेनी असहकार पुकारला होता. म्हणून ८ * २ फुटांच्या, खास जपानी घरांच्याच असू शकतील अशा छोट्याशा गॅलरीत आम्ही दोघं बसलो होतो. ती गॅलरी ईतकी अरुंद आहे, की मी थोडी जाड झाले तर मला तिरकं होऊन कपडे वाळत घालायला लागेल. असो. तर त्या एवंगुणविशीष्ट गॅलरीत आम्ही रात्रीच्या २ वाजता बसून होतो. कधी नव्हे ते, ऐन उन्हाळ्यातली ती एक थंड रात्र होती. कुठल्याही कंपन्यांचे वातानुकुलीत यंत्र झक मारेल अशी हवा सुटली होती. अशा वेळेला, बालपणी रात्री गच्चीत झोपण्याच्या कार्यक्रमाची आठवण येणे अपरिहार्यच. नवरा विदर्भातला असल्यामुळे त्यांच्याकडे दर उन्हाळ्यात हा कार्यक्रम असायचा. आम्ही पुण्यात फार क्वचित कधीतरी गच्चीवर झोपलो असू- पण नागपूरला मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत गच्चीवर झोपल्याच्या आठवणी माझ्यादेखील आहेत. असो.
तर इथले आकाश काही आपल्यासारखे नाही, आणि इथला कावळा मेला कावळ्याच्या जातीला शोभेलसा ओरडत नाही ही माझी लाडकी तक्रार... आता, इथले आकाश आपल्याईथल्यासारखे नाही- हे मला प्रामाणिकपणे वाटायचे- कारण (औषधाला ही) चांदणे दिसत नाही. तर हे नेहमीचे पेटंट वाक्य मी टाकले- तेव्हा नवरा म्हणाला- तुझे डोळे खराब आहेत- चष्मा लाउन ये जा.. अगं चांदण्या आहेत- पण अस्पष्ट दिसतात. नीट पाहिल्यास की दिसतील..

खरं आहे- आयुष्यात ब-याच गोष्टींना हे तत्व लागू पडते. त्यांच अस्तित्व असतंच, आपलेच डोळे खराब, किंवा पुर्वग्रहांची झापडं जबरदस्त- जे आहे आणि जसं आहे तसं पाहता येईल असा चष्मा हवाच. कधी स्पष्ट दिसावं म्हणून चष्मा लावावा आणि कधी चष्म्याचे झापड झालेलं असलं, तर तो उतरवून पहावा- चांदणे जरुर दिसेल !

कधी फार पराकोटिचा वैताग आला- आणि विशेषत: आपण इथे कुठे येऊन पडलो असे वाटायला लागले- की परत एकदा आपल्या irritants कडे डोळसपणे पहायला शिकायला हवे. हे शहाणपण सहजी येत नाहीच.. स्वत:ला अतोनात त्रास करुन घेतल्यानंतरच ही सदबुद्धी लाभते. कधी आपलंच मडकं कच्च असावं आणि धग लागल्याशिवाय त्त्यातून पक्क मडकं तयार होऊच नये हे विधीलिखीत असू शकतं.परदेशात राहताना विशेषत: हे तत्व आचरणात आणावे. त्यानी सगळे प्रश्न सुटतात असे नाही- पण ब-याचदा Kalidioscope फिरवला की जसे नवीन design दिसते, तसे होते. आपल्याला त्रास देणा-या गोष्टींकडे पाहण्याचा द्ष्टीकोण बदलत जातो- वादळ शमतेच असे नाही, पण काही प्रमाणात निश्चीत निवळते.
"भावनेला येवू दे गा
शास्त्रकाट्याची कसोटी "

Sunday, August 20, 2006

तोंडओळख..

गंमत आहे- जपानला पर्यटक म्हणून/ किंवा कामानिमीत्त थोडे दिवस आलात तर जपानच्या शिस्तबद्धतेने आणि सौंदर्याने मोहीत व्हाल, क्वचितप्रसंगी स्तिमीत व्हाल! पण काही कामानिमीत्त ४-५ महिने किंवा वर्ष रहायला आलात तर मात्र अगदी सुरवातीला न-वैतागलेला-माणूस विरळाच. जपानला येऊन जपानी न येणे हे म्हणजे इंग्रजी न येता व-हाड घेउन लंडनला जाण्यासारखं. जपान मध्ये (नवीन)आलेल्याला आणि जपानी न येणा-याला "आपण निरक्षर आहोत" हे ठायी ठायी जाणवते. त्यातून शाकाहारी म्हणजे तर काय वर्णावे... सगळं अभक्ष्य काढून उरलेल खायला द्याल का ? हे जपानीत विचारायला माणूस शिकला, की निरक्षराचा धुळपाटीवर श्रीगणेशा गिरवून झाला म्हणून निश्वास टाकावा. पुढे तो निरक्षर, शिकून बालिष्टर होणार, की ढकलपास होऊन जेमतेम कुठलीतरी पदवी पदरात पाडुन कुठेतरी चिकटणार, हे कोणी सांगावे ?
हा देश आणि ही संस्कृती melting pot किंवा salad bowl नाहीये. इथे तुम्ही वेगळे आहात आणि वेगळेच राहणार आहात हे लपवायचा अभिनवेश ही नाही.. हे मुलभूत का काय ते तत्व एकदा मान्य केलंत तर प्रवास सुखकर होईल. आणि तरीही वंशभेदाची जाळपोळ ईथे नाही.. असूया/भेदभाव किंवा अन्याय नाहीच असे कसे म्हणू? आणि तरीही एकीकडे liberty, equality, fraternity च्या गप्पा मारणा-या आणि दुसरीकडे केवळ वंशभेदामुळे वित्त आणि जिवीत हानी होत असणा-या देशांसारखा हा देश नाही.
ते तुम्हाला तोंड भरुन "या बसा" म्हणणार नाहीत की घरी येण्याचं आमंत्रण सहजी देणार नाहीत- पण तुमच्या जीवावर उठणार नाहीत. अंधूक, जाणवेल - न जाणवेल इतपत वंशभेद जगात कुठेही आढळेलच- पण जपान मध्ये त्याचे स्वरुप "सबवेत जर अनेक जागा रिकाम्या असतील तर तुमच्याच शेजारची रिकामी जागा सर्वात शेवटी भरेल" इतपत! "गायजीन" (foreigner) हा शब्द तुम्ही या भूमीवर पाय ठेवल्यापासून तुमची सतत निष्ठेने सोबत करेल..
देशाबाहेर परदेशी म्हणून गणलं जाणे आणि देशात अमुक तमुक जातीचा, अमुक पोटजातीचा, तमुक धर्माचा, अ आर्थिक परिस्थितीचा, ब शैक्षणीक पातळीचा म्हणुन- पाहता क्षणीच गणले जाणे.. ! एकुण एकच.
वरलिया रंगा भुललासी !

Tuesday, August 01, 2006

वडिलधा-या पायांना शताधिकांचे हात स्पर्शती

"माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही "
आज दुपारी, ऑफिस जवळच्या सिग्नलवर एका सायकलीवरची म्हातारी माझ्याकडे पाहून तोंड भरुन बोळकं पसरुन हसत होती.तिला ओळखायला जरा वेळच लागला- मग लक्षात आलं की- ही तर आमच्या हापिसची Cleaning Lady.ही आज्जी किती वर्षाची असेल ह्यावर आमच्या पैजा लागायच्या. शेवटी सगळ्यांचे "पासष्टीच्या आसपास नक्की आहे" हयावर एकमत झालं. एक दिवस एका सहका-याला तिचा खाली पडलेला रेल्वे पास सापडला- त्यावर तिचे वय होते- ७५ वर्ष ! आम्ही अवाक !७५ वर्षाची ही म्हातारी काय खुटखुटीत होती- सुबक खाशी ठेंगणी अशी ही खास जपानी म्हातारी- केसांचा सुरेख बॉब, कडक युनिफार्मात धाड धाड Vaccum Cleaner आपटत सफाई करत असते, आणि येणा-याजाणा-याशी गप्पा मारत असते. माझ्या मनातली ती "चल रे भोपळ्या टुणुक टुणुक" म्हणणारी बेरकी आज्जी तंतोतंत अशीच.

हापिसातल्या काही लोकांना ती खूप आपटत काम करते, म्हणुन तिचा राग येतो- मला मात्र ही म्हातारी जाम आवडते. तिच्या बोळकं पसरुन हसण्यामुळे तिच्या चेह-यावरच्या सुरकुत्या तर झळाळुन उठतातच पण आमच्या ही दिवसाला झिलई चढते.
या वयात ही बाई येवढं कष्टाचे काम लिलया करते. त्याचं वाईट तर वाटतच पण तिच्या विजिगीषेचे कौतुक ही वाटते.
ह्या जरठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस जपानमध्ये वाढतेच आहे. जवळजवळ २५% लोक पासष्टीच्या वरचे आहेत जपानमध्ये सध्या.
पुरुष सरासरी ७८ वर्ष आणि बायका सरासरी ८५ वर्षापर्यंत जगतात. सध्या जपानमध्ये शंभरी पार केलेले २३००० लोकं आहेत-सर्वात वयोवृद्ध ११४ वर्षांचा. ६०व्या वर्षी हे सेवानिवृत्त होतात आणि त्यानंतर सरासरी २० वर्ष जगतात. मग चरितार्थ चालवायला अशी कामं धरतात. सुरवातीला जपानमध्ये आले तर धक्का बसला होता- ईतके जख्ख म्हणावे असे म्हातारे अंगमेहनतीची कामं उपसताना बघून.

ट्रेनमध्येही तीच गोष्ट.पाठीचा कणा पूर्ण बाकदार होवून गुढघ्यापर्यंत वाकलेली म्हातारी, जेव्हा सबवेत भेटते तेव्हा ही आज्जी या वयात उभं राहून, एकटी ट्रेनमधुन प्रवास करते, ह्या दृष्यानी हेलावल्या शिवाय रहात नाही. जपानी लोकांना फारसं काही नसतं-कधी कधी जागा देतात उठून पण कधी कधी समोर अशी जर्राजर्जर झालेली, अस्थिपंजर झालेली म्हातारी उभी असताना देखील स्वत: खुशाल “युसेनसेकी” ( Priority Seats) वर बसून राहिलेली लोकं पाहिली की संताप येतो.
नव-याचा ट्रेनमधील-बसण्याची-जागा-योग जबरदस्त आहे. कुठुनही दमुन येत असताना ह्याला बसायला जागा मिळणे आणि समोर कुठलीही ७-८ दशकं पार केलेली आज्जीबाई त्याच्याच समोर येणे- हे नेहमीचे. मग उठुन जागा देणे अपरिहार्यच !

आसपासच्या अशा कित्ती पिकल्या पानांबद्दल सांगू ? उपनिर्दीष्ट cleaning lady , आमच्या बिल्डींगचा Caretaker बुढा, (देवा ! त्याच्या येण्यावरुन सकाळचे आठ वाजलेत, म्हणून खुशाल घड्याळ लावून घ्यावे !), पेपरवाला, शेजारपाजारच्या म्हाता-या आज्ज्या, जपानी सहका-यांचे आई-वडील किंवा सासूसासरे (माझी एक मैत्रिण होती.. तिची उमर अबतक ५६ आणि तिची आई ९० वर्षांची, कोबेचा भयानक भुकंप अनुभवलेली !),डिशवॉशर बसवून द्यायला आलेला फिटर, भाजीवाले! एक ना दोन. टॅक्सीचालक तर ईतके वृद्ध असतात कधी कधी की पोचेपर्यंत धास्ती वाटत राहते.

आमच्या शेजारची "मायेदा" आज्जी- ८५ तरी वर्षाची नक्की असेल. आताशा आज्जी खूप थकत चालल्याचे जाणवते. आत्ता आत्ता तिचे केस कापसासारखे पांढरे दिसतात- नाहीतर काही महिन्यांपुर्वीपर्यंत काळे कुळकुळीत डाय करायची. तिला त्या ११६ पाय-यांचा जिना चढता उतरताना पाहिलं की माझ्या पोटात तुटतं. होता होईल तो तिचं सामान उचलणे एवढेच मी करु शकते. एकटीच असते बिचारी- कधी लिफ्ट मध्ये, कधी त्या जिन्यावर, कधी कचरा टाकताना भेटते. मला वेळ असला की गप्पा मारते हवा पाण्याच्या.. आणि कधी मी सकाळच्या घाईत जिवाच्या आकांताने पळत ट्रेन गाठायला चाललेली असते, तेव्हा भेटली की न चुकता- “तु पुढे जा बाई, तुला घाई आहे” “इत्तेराश्शाई” म्हणणारी.. तिला “इत्तेकीमास” म्हणताना क्षणभर मला मी माझ्याच आज्जीला “येते गं” म्हणते आहे असे वाटते !
आमच्याकडे भाच्च्यांनी आल्यावर घर डोक्यावर घेतले मस्तीने. आम्ही मुकाट्याने शेजारच्या आज्जीला आणि खालच्या चिनी बाईला जाउन ‘ओमियागे” (भेट) देउन आलो- "थोडे दिवस आवाज होईल जास्त- मुलं लहान आहेत- मस्ती करतात, उड्या मारतात-जरा आवाजाचा त्रास होईल तुम्हाला" म्हणुन सांगून आलो. आमच्या बरोबर भाची पण होती. तिला बघून आज्जी अगदी खुलली-खेळायला ये म्हणाली.. मग नणंदेला म्हणाली “ह्या तुझ्या वहिनीच्या मागे भलती घाई असते. बिच्चारी कायम भेटते ती घाईघाईतच. “ तिच्याशी जरा शिळोप्याचा गप्पा मारल्या आणि घरी आलो.

अशा ह्या एकेक आज्ज्या ! काही ओळखीच्या काही सर्वस्वी अनोळखी. पाहिल्या की वाटते- ह्यांना दीर्घायुष्याचा वर आहे की अभिशाप ? त्या अश्वत्थामाच्या भळभळणा-या चिरवेदनेचा शाप आहे की भीष्माचार्यांचे अटळ भोग आहेत आणि उत्तरायणाचा इंतजार ? म्हातारपण येते म्हणजे ते रुपेरी, तृप्त संध्याराग आळवायसाठी, पैलतटीची आस लागली म्हणुन, जीवनाचा चहु अन्गानी आस्वाद घेउन झाला म्हणून, कालचक्राच्या न्यायाने- आले तर चांगले.. पण अतृप्त , एकाकी, विकारयुक्त, आणि विखारयुक्त परावलम्बी आणि अकाली, दीनवाणे म्हातारपणही येतेच. काही म्हातारे कोतारे प्रेमळ आणि आपुलकीची साय चेह-यावरुन सांडणारे..( ह्या जपानी लहान मुलांचे मिचमिचे डोळे जितके लोभस असतात, तेव्हढेच ह्या म्हाता-यांचे मिचमिचे डोळे लोभस असतात.) आणि काही म्हातारे तितकेच विक्षिप्त, दुसरं बालपण अनुभवताना अतोनात हट्टी आणि हेकेखोर झालेले. कधी भ्रमिष्ट, कधी जगभ्रराचा कडवटपणा अंगोपांगातून मिरवणारे, दिसेल त्यावर खेकसणारे("नंदा प्रधान" मधील एरंडेल डोक्यावर थापणारा म्हातारा उभा राहतो डोळ्यासमोर). आणि काही सर्वस्वी उदासीन- बोरकरांच्या "सुखा नाही चव, लव वठलेली आहे, दु:खा नाही भार, धार बोथटली आहे" ची आठवण करुन देणारे. व्यक्ती तितक्या प्रकृती हे तर खरेच पण आयुष्याचे भोग हे कुठेतरी खुणा ठेवतातच.. नाही का ?..........

Saturday, July 22, 2006

इजिप्तायन


पूर्वी १ (च) नविन पुस्तक हातात पडलं की वाटायचं " इससे मेरा क्या होगा"- पुस्तकं ही वाचण्यासाठी नसून खाण्यासाठी असतात ही सखराम गटण्या प्रमाणेच माझीही समजूत- फक्त अस्ताव्यस्त स्वभावामुळे गटण्याप्रमाणे प्रत्येक पुस्तकाचा पंचनामा करण्याइतकी शिस्त माझ्या अंगी नव्हती/ नाही..
आता जपान मध्ये वास्तव्याला असल्यापासून पुस्तकांचा भस्म्या रोग आटोक्यात येउन बिच्चारे वाचन डायेटवर आहे.. चांगलेच हडकलय.. दर भारतवारीत निवडक ३-४च पुस्तकं मावतील एवढीच २० किलो च्या कमाल सामान मर्यादेत जागा असते.. जयललिता बाईंच्या साड्यांपेक्षा जास्त पुस्तकं भारतात असताना होती. जयललिता बाईना कसा, इतक्या साड्या असल्यामुळे वर्षातले ३६५ दिवसात तीच साडी दुस-यांदा नेसायचा योग येत नसणार- तसेच मला कधी पुस्तकं कमी पडत आहेत, म्हणून आहेत तीच पुस्तकं पुरवून पुरवून वाचायची वेळ कधी आली नव्हती- ती वेळ जपानात आल्यावर आली.
तर इथे जेव्हा आमच्याकडे जेवायला आलेल्या स्नेहींनी मीना प्रभूंचे "इजिप्तायन" भेट दिलं तेव्हा इतकं छान वाटलं. एव्हाना पूर्वीचा "१ से मेरा क्या होगा ?" हा माज जाउन, पुस्तकं काटकसरीने पूरवून पुरवून वाचायची सवय लागली होती.
खरचं इथे सगळ्याच वाचनप्रेमींची कमाल-सामान-मर्यादेने आबाळ होते.. त्यात मैत्रिणीने खास आठवण ठेवून आपल्याकडचे पुस्तक भेट दिल्याचा आनंद अवर्णनीय..
आता रोजचा त्याच "कशासाठी- पोटासाठी" चा ट्रेनप्रवास एकदम सुसह्य झाला.. पुस्तकाचे मुखपृष्ठ एकदम आकर्षक..खरं सांगायचे तर मराठी पुस्तकाला न शोभण्याइतकं.. आतली रंगीत चित्र ही सुरेख.. त्या चित्रांविना आणि मुखपृष्ठाविना पुस्तक खचितच एवढं आकर्षक दिसलं नसतं.हि-याला कोंदण शोभून दिसत होतं पण नाकापेक्षा मोती जड नव्हता.
आतला मजकूर निश्चितच त्या चित्रांना न्याय देत होता.

या आधी ब-याच वर्षांपूर्वी मीना प्रभूंचे "माझं लंडन" वाचलं होतं. त्यापेक्षा "इजिप्तायन" मधील लेखन जास्त रसाळ वाटलं. लेखनातला नवखेपणा आणि माहीतीवजा रुक्ष वर्णनं जाउन त्या "इजिप्तायन" मधल्या लेखनाला जास्त आपुलकीचा स्पर्श आणि ओघवता मोकळेपणा वाटला.. पानापानातून त्यांचा प्रवास तर अद्भुत वाटत होताच- पण त्या प्रवासतल्या "त्या" ही जागोजागी भेटत होत्या.
बाई ग्रेटच ! ३ महिने इस्राईल, जॉर्डन , इजिप्त मध्ये एकट्या भटकत होत्या. ही नुस्ती भटकंती नसून अभ्यासपूर्ण भटकंती होती.. त्यांचा बराच अभ्यास जाणवतो. म्हणुनच पुस्तकातला खरेपणा जाणवतो, आणि हा "आखो देखा हाल" भिडतो. इस्राईलच्या इग्लंड मधील दूतावासातल्या अजब अनुभवापासून पुस्तक सुरु होते- ते ईजिप्त मधल्या त्यांच्या वास्तव्याच्या शेवटच्या संध्याकाळी पाहिलेल्या एका Light and Sound Show नी इजिप्तायन ची सांगता होते. शेवट जरा तुटकच वाटला.
बाईंच्या वर्णनशैलीचे एक वैशिष्टय जाणवले ते -सगळीकडे दोन क्रियापदांचा जोडुन वापर- उदा- "बघतोयेसं वाटलं"..
त्यांचे अनुभव मनाला भिडतात- इस्राईल मधील दहशतीचे वाटावरण- बॉम्ब नी उध्वस्त झालेली पॅलस्टिनची सीमारेषा..ओस पडलेले जेरुसलेम आणि बेथेलहेम, इस्लाम/ख्रिश्चन/ज्यू धर्माची गुंफण, जॉर्डन मधील भव्य रोमन ऍम्फी थियेटर, पेट्राची सफर- जॉर्डन चे अश्मस्वप्न, मृत समुद्र, अकाबातील जलसृष्टी, इजिप्त- सायनाय,दाहाब, सुएझ कालवा,नाईलची सफर, लुक्सार, ऍलेक्झांड्रिया,ओऍसिस,कैरो, कैरोतला रमजान चा उत्सव, पिरॅमिडस, वस्तूसंग्रहालय..
त्यांनी जितका इजिप्त भरभरुन पाहिला त्याचे हे रसाळ वर्णन..
काळाच्या संकल्पनेइतक्याच जुन्या, ५००० वर्षांपासूनच्या पुरातन इजिप्त मधील ही मीना प्रभूंची भटकंती. बाई काय खमक्या असतील याचा प्रत्यय त्यांच्या सर्व ब-या वाईट अनुभवांमधून येतो.

वाचण्याजोगे "इजिप्तायन" !

ता.क. त्यांची एकंदरीतच वैश्विक भ्रमंती बघीतली की मला दर वेळेस वाटते- यांची सर्व पृथ्वी पाहून संपली तर काय करतील ? पुढलं पुस्तक लिहायला मग त्या कुठला देश निवडतील ?

Tuesday, July 18, 2006

रजनील ओकिनावा- माहेरची झाडं आणि जनजीवन



रिसॉर्टच्या बागेत आता उतरुन खाली आलो तर एकदम धक्का बसला…चक्क चाफ्याचे झाड दिसलं- बावचळल्यासारखी बघत राहीले- माहेरचे माणूस भेटल्यासारखे वाटले. इकडे तोक्योत असली घमघमणारी चाफ्याबिफ्याची झाडं दिसणं तर सोडाच, गुलाबाला सुद्धा फारसा वास म्हणून नाही.. आपल्याकडे किती सुगंध असतात- सौम्य जाईजुईसायली ते मोहक मोगरा ते उग्र मादक वासाच्या सोनचाफ्या पर्यंत !! जपानातले गुलाब बरेचसे बिनवासाचे असले तरी दिसतात टप्पोरे- पण वास नाही म्हणजे नुसतेच आवाज बंद करुन सिनेमा पाहावा तसे.. अपूर्ण…
खाली पडलेलं एक चाफ्याच फूल उचललं आणि वास घेतला तेव्हा धन्य वाटलं- पुढे ४ दिवस फिरताना सगळीच आपली झाडं दिसत होती… जास्वंद, त-हेत-हेचे (वासाचे) गुलाब, तगर, लाल चाफा, मोग-या सदृश फुलं , आंब्याची झाडं, केळीचे घड आणि….. गुलमोहोर….
गुलमोहोर दिसला आणि दिवसभर ओल्या कपड्यांनी अक्षरश: वादळात फिरण्याचा शीण विसरले… समोर छत्रीला टिकु म्हणुन न देणारा पाऊस - पण मनात मात्र मायदेशातले वैशाख वणव्यात आकंठ पेटल्यासारखे दिसणारे गुलमोहोराचे डवरलेले झाड आणि खाली पडलेला लाल गालीचा …. मी आणि नवरा दोघेही डोळे भरून पाहात राहीलो…
तर सर्वत्र असे जाणवले की ईकडे सगळी उष्णकटीबंधातील वनराई पहायला मिळत होती… तोक्योच्या आणि इथल्या झाडाझुडपात विलक्षण फरक…
गंमत म्हणजे- मी अरे हा पहा चाफा , म्हणुन ओरडते आहे तोच निकोलस वा! फ़्रांजीपानी म्हणून झाड बघायला धावला… मनात आलं -आम्ही तिन देशांचे चार लोकं तर खरेच… पण चाफ्याचा घमघमाट आम्हाला सारखाच भिडला होता की..


नंतरचे दोन दिवस पावसाची संततधार होती तरी खूप फिरलो…
Glass Bottom Boat मधली सैर केवळ अविस्मरणीय…. समुद्राचा तळ -तळ म्हणजे काय हे लख्ख दिसत होते… बोटीचा चालक भरपूर खाद्य टाकत होता म्हणुन माशांचे लोटच्या लोट येत होते- ते स्पष्ट दिसत होते.. बोटीतली इतर जपानी चिल्ली पिल्ली चिवचिवत होती.. जपानी पोरं अचाट असतात - कुठल्याही मत्सालयात जपानी पोरांनी कधी माशाला सुंदर म्हंटलय? छे… कार्टी नेहमी मासे पाहून “ओईशी” (tasty.. रुचकर!!) असे ओरडतात… इतकी गंमत वाटते त्यांची … त्यांना मासे पाहीले म्हणजे आपसूक खाद्यपदार्थच आठवत असणार…. इथेही मुलं अगदी डोळे विस्फारून बघत होती.. तोंडाने मात्र.. “ओईशी” चालू….

मग एका Underwater Observatory त गेलो.. Cylindrical आकाराची Observatory. त्यात जिन्यानी उतरुन खाली जायचं आणि खाली पोचल्यावर सगळीकडे पोर्टहोल मधून मासे पहायचे…. मासामीचीला Claustrophobia! तो गळपटला! येत नाही म्हणाला.. त्याला पटवून, काSSही होत नाही- ये तर खरं, असं म्हणून खाली नेलं… वरती धोधो पाऊस .. शांतपणे उभं पण राह्ता येत नव्हतं. छत्री उघडणं तर सोडाच, स्वत:च उडून जाण्याएवढा सोसाट्याचा वारा…. शेवटी बिचारा आमच्या बरोबर खाली आला… किती वेळ त्या पोर्टहोल्सच्या काचांना नाकं लावत मासे पहात होतो…
उभ राहून बघताना पाय दुखायला लागले पण मन भरत नव्हतं…. पाय ओढतच बाहेर आलो आणि पावसात गाडीपर्यंत धावत गेलो…

मग रिसॉर्ट वर परत येउन पावसातच समुद्राकाठी बसलो… हे तिघं जण पोहायला गेले समुद्रात…. नव-याला पोहायला आवडत असलं तरी तो बेतानेच आत जात होता हे पाहून हायसं वाटलं. निकोलस एकटाच फारंच दूरपर्यत गेला… तिकडे साधारण किलोमीटर वर निळया जाड फ़्लोटर्स नी एक कुंपण केलं होतं… त्याला ती सीमारेषा पार करुन आणखी पुढे पोहत जायचे होते… पण वारंवार ती सुरक्षा जाळी त्याला पुढे जाउ देत नव्हती…
आम्ही पण सगळॆ जण त्याला " लई झालं आता ! परत ये.. "अशा खाणाखुणा करत होतो… शेवटी आला एकदाचा…
आणि म्हणाला" बायकोनी दम दिलाय म्हणुन त्या जाळीच्या पलीकडे गेलो नाही… तिचे वडील ओकीनावात पोहताना वाहून गेले होते… म्हणुन ती ओकीनावातल्या समुद्राला धसकून असते… "" ऐकुन पोटात गोळा आला….


मग तो आम्हाला त्याच्या बायकोच्या ओकीनावातल्या नातेवाईकांबद्दल सांगत होता… त्याच्या बायकोचे काही दूरचे नातेवाईक ओकीनावाच्या असंख्य छोट्या बेटांपैकी एका बेटावर रहात होते… जेमतेम ५० घरांचे गाव.. एक शाळा- त्यात ५ छोटी मुलं आणि तिन शिक्षक. त्या गावात बायकोच्या आजीकडे हे दोघं काही दिवस राहीले होते.. ती आजी ७० वर्षी स्वता:ची नाव घेऊन Squid fishing ला जाते… (ओकीनावात जगातले सर्वात जास्त शंभरी पार केलेले लोकं राहतात… कष्टाचे जीवन, सुंदर निसर्गरम्य ठिकाण…. औद्योगीक वसाहत फार कमी… जेवण म्हणजे विवीध प्रकारचे स्वत: पकडलेले मासे…. मन:शांती, माफक आणि पोषक आहार आणि आनंदी जगणे हे ह्या दीर्घायूष्याचे रहस्य असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे…
मग वाटले… ट्रेनमधील गर्दी , रस्त्यावरील रहदारी, रोजचे तणावपूर्ण काम… ह्या सर्वांनी आपण पैसे मिळवतो की क्षणाक्षणाने आपलं आयुष्य व्याधीग्रस्त करत असतो… ? असो.)
तर ही आज्जी रोज रात्री Squid Fishing जाते- एका रात्री नातीला आणि फिरंगी नातजावयाला बरोबर घेउन गेली…. आज्जी सर्राईतपणे सरसर गळ टाकून मासे पकडत होती.. Squid पकडला की तो एक द्रव/शाई बाहेर टाकतो.. ती शाई घालून इकडे स्पगेटी करतात… ती "इकासुमी" Squid Ink Spaghetti इकडे भलतीच लोकप्रिय आहे… तर दुस-या दिवशी आज्जीने न्याहरीला नातजावयाला इकासुमी सूप दिले… आम्ही विचारले- कसे लागले? निकोलस म्हणाला… ""It looked and tasted like motor oil. ""पुढचे आठही दिवस न्याहरीला तेच Motor Oil सारखे लागणारे सूप होते..

सुर्यास्त बघावा म्हणुन कधीचे रेतीत बसलो होतो… जोडिला कमीअधिक पाउस होताच…शेवटी लक्षात आले की इतक्या भरुन आलेल्या आभाळात काय डोंबल सुर्यास्त दिसणार ? आता खोलीत परत गेलेलं बरं…. खोलीत जाउन अंधार पडेस्तोवर ते कातळ पहात बसलॊ शांतपणे…

Tuesday, July 11, 2006

रजनील ओकीनावा: चित्रवृत्तांत


असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे उन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी



निळ्याशार मंदार पाऊलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा
तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य देऊ
निळ्या अस्तकालीन नारायणा




किती खोल अन किती ओल वक्षी
तुझा सूर्य अन तुझे चांदणे
प्राणातले उन प्राणात गेले
तुझ्या सागराची निळी तोरणे

कवी ग्रेस {चंद्रमाधवीचे प्रदेश मधल्या काही ओळी)

Friday, July 07, 2006

रजनील ओकिनावा- भाग २


ओकिनावातल्या रिसॉर्टमधल्या खोलीतून सतत दिसणारे कातळ. सुंदर हरिणमणी रंगाचा नितळ समुद्र,क्षितीजी आलेले भरते, आणि कुणीतरी मुद्दाम ठेवल्यासारखे ते दोन कातळ..



हॉटेलात जाताना रस्त्यावर गंमत बघत होतो- रस्त्यावर चक्क सुसाट धावणा-या गाड्यांची भाउगर्दी पाहिली आणि वाटलं- हे- हे ओकिनावा आहे? गाड्याच पाहायच्या होत्या तर तोक्योत काय वाईट होत?
निकोलस म्हणाला- अगबाई हे विमानतळाभोवतीचे नाहा शहर आहे.. आत्ता आपण नाहाच्या बाहेर पडलो की बघत राहशील ओकिनावाचे सौंदर्य.
वाटेत सर्व जण जेवायला थांबलो. हॉटेल अगदी जपानी. परत एकदा माझ्या वेगळ्या शाकाहारी ऑर्डरची शहानिशा झाली- मासे चालतील का? एबि (Shrimp) चालेल का- अमुक आणि तमुक.... जपानात शाकाहारी जेवण मागवताना नेहमी जी फरफट होते तीच ईथेही.. नव-याने अगोदरच तंबी दिली होती- तिथे तरी जे मिळेल ते खा.. नेहमीची नाटकं नकोत..आता त्यानी खांदे उडवत "का SSSही -खरं- नाही- तुझं type चेहरा केला.."
समोर आलेलं ते रक्त आटवुन मागवलेलं अन्न आलं एकदाचं - मासे बिसे काढुन टाकलेला "सोबा" त्या बाईनी आणला.. तिच्या चेह-यावरचं कुतुहुल हे इथे सगळीकडेच बघायला मिळत असल्यामुळे सवयीचे होते. जपानमध्ये उपहारगृहात जेवताना माझा चेहरा नेहमीच फुकटात वारावर जेवत असल्यासारखा अपराधी होतो.. (वट्ट पैसे टिकवून सुद्धा) याचं कारण तोंडाची भयंकर वाफ दवडुन शाकाहारी म्हणजे काय हे सांगत जेवण मागवायला लागते.. लोकांकडे जेवायला गेल्यावर मीठ जरी हवं असलं तरी न मागण्याचा भिडस्त स्वभाव- आणि हे असले मिनतवारिने मागवलेलं शाकाहरी जेवण.'सुमिमासेन" (माफ करा) असं म्हणल्यावरच (ते खास मागवलेलं राजेशाही थाटाचे) सर्व काढलेलं जेवण माझ्या घशाखाली उतरतं.

जेवण झाल्यावर परत हॉटेलच्या पथाला लागलो. नाहा शहर सोडेपर्यंत ठायी ठायी इंग्रजी पाट्या पाहुन डोळे ठेचकाळायला होत होतं. नेहमी अगम्य कांज्या पहायची सवय डोळयांना- ती मोडल्यासारखी झाली..
अमेरिकेच्या पाउलखुणा जाणवत होत्या. २ महायुद्धाच्या वेळेस १९४५ मध्ये अमेरिकेने ओकिनावा व्यापले होते ते १९७२ मध्ये जपानला परत मिळाले- पण अजुनही ओकिनावात अमेरिकेचे Naval base आहेच.
गाडीतही अमेरीकेचे Armed Forces Radio Station ऐकायला मिळत होते.

नाहा सोडलं आणि जी हिरवीनिळाई दिसायला लागली ती अद्भुत होती. डोळे निवले- ओकीनावा पावलं - असे वाटायला लागले.. हॉटेल ही अगदी सुरेख होते. जुन्या Spanish Villa सारखे बांधले होते- तोक्योत कधीही न दिसणारं ऐसपैस बांधकाम... खोलीत सामान टाकलं आणि बाल्कनितून आयुष्यात आधी कधीही न पाहिलेला रजनील समुद्र दिसला. वरचं आकाश राखाडी आणि कधीही द्रवेल असं वाटणारं आणि खाली मात्र नितळ, सुंदर, पाचुला लाजवणा-या रंगाचा स्वयंप्रकाशीत समुद्र. असं वाटत होतं की आता ह्या समुद्राचीच आभा उलट आकाशाचा राखाडी रंग पळवुन लावेल. डोळे भरुन पाहिस्तोवर घन घन माला नभी दाटल्या कोसळल्या धारा......

Monday, July 03, 2006

रजनील ओकिनावा


हा आमच्या गाडीतून दिसणारा , धो-धो पावसाचा मनोहर (?) देखावा. ओकिनावात पाउल ठेवल्यापासून , जायच्या क्षणापर्यंत सतत सोबत करणारा पाउस..




सुदूर पूर्वेच्या ह्या मनोहर देशाच्या नै‌ऋत्येला हजारो बेटांचा द्विपसमुह आहे- त्याचे नाव ओकीनावा.
जपानचे ४७वे राज्य. पूर्वी हे एक स्वतंत्र राज्य होते- Ryukyu Kingdom. ताईवान आणि जपान च्या मधोमध नकाशावरील छोटीशी बेटांची द्विपमाळ. हवाई , बहामा वगैरे जगप्रसिद्ध पर्यटकांची पंढरी असलेल्या बेटांच्याच अक्षांशावर असल्याकारणाने- हवामान ही तसेच. पाऊस तर पाचवीलाच पुजलेला. तोक्योत पाउस पडत नाही, नुसताच झिमझिमतो, त्याचे आता मी पाउसुल्लु ( पावसाचे पिल्लु) असे नामकरण केले आहे.
ओकीनावातला पाउस धोधो.. म्हणजे मुंबईच्या पावसानी लाजून मान खाली घालावी असा, कधी कधी लोणावळ्याच्या परिघात पायपीटीत भेटतो तसा! मुळशीतल्या वांद्र्यात मी आयुष्यात पहिल्यांदा मुसळधार का काय म्हणतात तसा पाउस अनुभवला(देवा ! इतका पाउस की खुशाल तलवारीनी कापावा)- तो असा सुमारे ७ वर्षांनी उराउरी ओकीनावात भेटला.
खरतर तोक्योहून ओकीनावा हा सुमारे २ तासांचा विमानप्रवास. फार काही लांब नाही.. तरी ओकीनावाच्या सहलीच्या किमतीत खुशाल एक सिंगापूर मलेशिया सहल पदरात पडू शकते म्हणून बरेच दिवस जायच मनात असूनही गेलो मात्र नाही कधी. ओकीनावा म्हणलं की लगोलग खर्चाचा आकडा डोळ्यासमोर यायचा- आणि दरवेळेस राहून जायच.
आत्ता योग आला आहे तर जायचेच.. असे ठरवले होते. ३ रात्री, ४ दिवसांचे टुर नेहमीप्रमाणेच २-३ महिने आधी आरक्षीत करायला लागले. अदमासे हवामानाची अटकळ बांधुन दिवस ठरवले.

एक आठवडा आधी हवामान, महाजालावर पाहीले तर काय- पुढचे २ आठवडे धोधो पावसाची सरासरी ८०% शक्यता. टुरवाले रद्द करु देईनात. पैसे ही परत देईनात. शेवटी काय होईल ते होवो म्हणून हानेदा विमानतळावर थडकलो. आमचे हे आन आम्ही आणि, एक न्युज़ीलंड चा सहकारी- निकोलस आणि एक जपानी सहकारी मासामीची. जपान एअरवेजचे विमान शीगोशीग भरले होते. आपल्या सारखे अनेक मजबूर लोकं बघून बरं वाटलं- चला ! हे ही पावसात ओकीनावाला चालले आहेत तर ! आख्ख्या विमानात आम्हीच दोघे भारतीय , तुरळक ५-६ गौरवर्णिय पर्यटक, आणि बाकी सारे जपानी किंवा जपानी दिसणारे.. जपान एअरवेजचे लॅन्डिग लय भारी होते, खाली येताना एकदम धाडकन विमान परत उंचावर आणलेन आणि मग वाईट्टदाणकन खाली आणले . खाली सर्व धुकं. माझ्या विमानभयाला हसणा-या निकोलस आणि मासामीची ची पण त्या लॅन्डिग पायी बोलती बंद झाली होती . खाली आलो तर Hotel ची शटल बस कुठुन सुटते ते जाम सापडायला तयार नाही. तरी बरं मासामीचि असल्यामुळे भाषेचा जटिल प्रश्न नव्हता. मग कार (गाडी) भाड्याने घ्यायची टुम निघाली, निकोलसच्या भरवशावर ती घेतली( त्याचा एकट्याचाच Driving Licence चालत होता), मासामीचीच्या लायसन्सची मुदत संपली होती, आणि आम्हाला ४ चाकी गाडी चालवता येत नाही. त्या गाडीत बसून Hotel चा दूरध्वनी क्रमांक Navigation System मध्ये टाकला एकदाचा आणि त्या रस्त्याला लागलॊ. आता पावसाची रिपरिप सुरु झाली होती, आलापी चालू होती ती पुढील ४ दिवसात वक्री तानेपर्यंत जाउन पोचली, रिपरिप, झिमझिम, प्रोक्षण केल्यासारखा ४ थेंब ते धो-धो, मुसळधार , भसाभसा, प्रलयंकारी महारुद्राभिषेक -वगैरे सर्व प्रकारे पाउस बरसतच होता.


अपूर्ण......

Tuesday, June 20, 2006

अनुदिनी अनुतापे तापलो रामराया

मागच्या आठवद्यात पुन्हा एकदा ट्रेन ला उशीर झाला होता. सकाळची लवकरची एक मिटीन्ग होती म्हणुन स्टेशनवर सकाळी लवकर (पावसात तड्फडत) पोचले तर हीSSS गर्दि… नुस्त्या छत्रया आणि निथळणा-या माणसांचा उसळलेला समुद्र ! तशी रोजच गर्दी असते- पण गाडीही उशीरा येणार आणि येवढेच नाही तर तोक्योच्या दिशेने जाणा-या सर्व गाड्यांचे वेळापत्रक बोंबलले आहे हे कळल्यावर वैताग/चिडचिड व्ह्यायच्या ऐवजी, आधी काळजात धस्स झाले. ! माझे भय कधि खोटे बोलत नाही.
लवकरच त्या सगळ्या गोंधळातुन अपेक्षित घोषणा कानावर पडली आणि खात्री पटली.
जे बर-याचदा होते इथे, तेच झाले होते ! कोणीतरी सकाळी ७:०६ वाजता गाडीसमोर उडी मारुन आत्महत्या केली होती आणि तोक्यो कडे जाणा-या सर्व गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. ह्याला जपानीत "जिनशिनजिकौ " म्हणतात ! (जपानित literal शब्दार्थ- human-body-accident)

हे -आताशा फार व्हायला लागले आहे का ? सरासरी आठवड्यातून १दा हा प्रकार होऊ लागला आहे…… इतके कसले ह्र्दयद्रावक प्रसंग घडले असतील या अभागी माणसांच्या आयुष्यात, की त्यांनी हा मरणाचा अतिशय भीषण आणि वेदनादायक प्रकार स्वीकारावा ? “स्वेच्छामरणाला” सुद्धा माझा खरंतर तात्विक विरोध नाही, पण ह्या अशा हिंसात्मक मरणाचं ऐकुन माझ्या तरी जिवाचा नुसता थरकाप होतो. जीवनात शांतता नाही, म्हणुन मरण पत्करावे, तर मरण देखील शांतपणे येऊ नये ही कसली दैवगति ? हा कुठला ऊफराटा न्याय? एक वेळ असे जरि मान्य केले, की जिवनसंघर्षाला कंटाळुन , एखाद्यानी हा आततायी निर्णय घेतला असेल- तरी मरणाची ही कसली त-हा? मरणच मागायचे तर शांत , मुक्त करणारे का नाही? मग ह्या नरकयातना देणा-च्या, देह छिन्नविछीन्नं करणा-या मरणाची मनिषा या लोकांनी का करावी?

जिने की वजह तो कोई नही, मरने का बहाना ढुंढता है !
मरने का ऐसा कौनसा जायज बहाना मिल गया ? हा प्रश्न मला नेहमी पडतो.

जपान मध्ये असा गाड्यांना उशीर झाला की स्टेशनवर (साहेबाला दाखवण्यासाठी ) एक चिठ्टी देतात ज्यावर लिहीले असते की आज गाडीला उशीर झाला वगैरे आणि जपानी कंपन्यात काम करणारे लोकं ती चिठ्ठी आवर्जुन घेतात. जे प्रवासी पैसे परत मागतील, त्यांना जपान रेल्वे तिकिटाच्या काही टक्के , ठराविक रक्कम परत करते. आणि असे ऐकले आहे की अशी आत्महत्या करणा-या म्रृत व्यक्तिच्या कुटुंबालाच जपान रेल्वेला नुकसान भरपाई द्यावी लागते. हे खरे असेल- तर मला अजुनच अचंबा वाटतो. आपल्याच कुटुंबियांना अजुनच त्रास (मानसिक आणि आर्थिक) होणार, हे निश्चित असताना ही हे असे का करत असावेत ?

माझा साहेब फिरंगी आहे, तो पुर्वाश्रमी बरीच वर्ष राणीच्या देशात पोलीस खात्यात होता, आणि त्याची बायको जपानी आहे. हे एवढ्याच साठी सांगीतले की त्याला गुन्हेगाराच्या मानसिकतेची जाण आहे आणि बायको जपानी असल्याकारणाने त्याचे जपानी लोकांबद्दलचे अनुभव जास्ती आहेत, जपानी संस्कृतीशी त्याचा घनिष्ठ परिचय आहे. तर त्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण असे आहे की - “”These people have not been able to create an impact in their life, at least in death, they get noticed, and are able to create an impact (even if negative), and affect so many people. “”

ही सगळी मानसिकता वगैरे खरी असली तरी, बेरोजगारी, अठरा विश्वे दारिद्र्य, स्वेच्छेने स्वीकारलेला भयंकर अगदि चिरुन टाकणारा एकटेपणा, कामाचा डोंगर, तीव्र महागाई ( तोक्यो हे जगातील सर्वात महाग शहर आहे), भावनिक आधारसंस्थांचा अभाव आणि एकंदरीतच, भावनांचा सह्जासहजी निचरा न करु देणारी संस्कृती- ही प्रमुख कारणे आहेत. २००५ मध्ये आत्महत्या करणा-यांपैकी ७२% पुरुष होते आणि जवळजवळ अर्धे बेरोजगार!

माझ्या एका सहकार्याने तर अशा एका माणसाला प्रत्यक्ष पाहिले. तो गाडीची वाट पहात स्टेशनवर थांबला होता. गाडी जवळ आली तशी क्षणार्धात त्याच्या पासुन १० फ़ुटावर असणा-या एका माणसाने , काही कळायच्या आत गाडीसमोर उडी घेतली !
मला तर नेहमी प्रश्न पडतो की ज्या गाडीसमोर अशी घटना घडत असेल त्या बिच्चा-या चालकांना काय वाटत असेल? (रेल्वे प्रशासनाच्या पदरी अशी नोकरदार माणसे आहेत की जे ह्या छिन्नविछीन्न झालेल्या देहाची योग्य विल्हेवाट लावण्यात तरबेज असतात! )
आणि सर्वात वाईट वाटते ते अशा लोकांच्या कुटुंबियांसाठी , जाणारा तर आपल्या कर्मानी गेला, पण उरलेल्यांनी कशाच्या बळावर हा आयुष्याचा प्रपंच चालु ठेवायचा?

पु.ल.देशपांड्यांच्या पुर्वरंग मध्येही “हाराकीरी” चा उल्लेख आहे. अतामी चा टॅक्सी एक चालक, त्यांना एक कडा दाखवून सांगतो, की पुर्वी इथून खूप लोकं आत्महत्या करायचे. जपानात एकंदरीतच आत्महत्येचे प्रमाण फार! असे म्हणतात की २००५ साली जितके लोकं रस्त्यावरच्या अपघातात गेले, त्याहून जास्त लोकांनी आत्महत्या केली.

गेली आठ वर्ष सातत्याने ३०,००० हुन जास्ती लोकं दरवर्षी आत्महत्या करतात. प्रगत औद्योगिक राष्ट्रांमधील माणशी सर्वाधिक आत्महत्या करणा-यांचे प्रमाण जपान मध्ये सर्वात जास्त आहे.
Group Suicides म्हणजे २-३ जणांनी मिळुन, ठरवून केलेली आत्महत्या ! ही लोकं कुठे कुठे महाजालावर संपर्क साधून मग ठरवतात की कुठे , कशी , कधी, कोणाबरोबर आत्महत्या करायची. ह्या असल्या भलत्या गोष्टीसाठी, एकमेका साह्य करणारी माणसे, आत्महत्येचा कुठला पर्याय जास्ती चांगला ह्यावर वेळ घालवण्यापेक्षा जीवनसंघर्षात एकमेकांना मदत का करत नाहीत ?

सरकारदरबारी ह्याची नोंद आणि उपाययोजना वाढत आहेत. Group Suicides साठी उचकावणा-या संकेतस्थळांवर पोलीस गस्त घालत आहेत. NGO’s ही कारणमिमांसा करण्यात आघाडीवर काम करत आहेत. सरकार, कंपन्यांसाठी नवनवे Employee Mental Health साठीचे उपक्रम राबवायला फतवे काढते आहे. जपान मध्ये, खुप सार्वजनिक सुट्ट्या आहेत त्या यासाठीच, की लोकांनी जरा सक्तीची विश्रांती घ्यावी- कारण काही लोक अक्षरश: अति कामामुळे ही जीव द्यायला राजी होतात.

अनुदिनी अनुतापे तापलो रामराया म्हणत, एकदम हे जग सोडून जाणा-या ह्या लोकांबद्द्ल काय करावे, त्यांना कसा आधार द्यावा आणि त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन, हा सरकारसमोर यक्षप्रश्न आहे.

अधिक माहीतीसाठी वाचा-

http://www.atimes.com/atimes/Japan/FG28Dh01.html
http://www.wsws.org/articles/2004/oct2004/japa-o20.shtml
http://search.japantimes.co.jp/cgi-bin/ed20060619a1.html
http://news.bbc.co.uk/2/hi/asia-pacific/5082616.stm


संपुर्ण.

Monday, June 05, 2006

मराटी पाउल पडते पुढे

जपानला आल्यावर जे अनेक धक्के बसतात (भुकंपासकट) त्यातिल एक म्हणजे “चालणे” अर्थात “पदयात्रा”. होतं काय, की पुण्यात कायम बुडाखाली दुचाकीवाहनं नाहीतर तिनचाकी रिक्षा- शिवाय आणि दुचाकी वाहन हे हत्यार चालवणे या अर्थि. आणि रिक्षावाल्यांशी हुज्जत घातली नाही- तर पिंडाला कावळा शिवायची मारमार. तर असो.


जपानात आल्यावर एकाएकी आपल्याला पाय हे अवयवद्व्य आहेत आणि ते वाप्रावे लागतात- स्वयंचलित वाहनांशिवाय ही भाजी उचलुन आणता येते हा साक्षात्कार होतो. आणि मग असे अनेक साक्षात्कार क्षणोक्षणी होत राहतात.

आपल्याकडे रस्ता ही दोन खड्ड्यांमधील उरलि सुरली जागा- आणि वाहने चुकवत, पथारीवाल्यांच्या शिव्या खात, बखोटीला कशीबशी मारुन मुट्कुन पकडुन आणलेली, नाहीतर सैरावैरा धावणारी कार्टी घेउन जाणा-या माउल्या.. मध्येच गायी, म्हशी, कुत्र, मांजरी, झालंच तर मेंढरं, किंवा मदार-याचे माकड/ किंवा दरवेशाचे अस्वल- हे सर्व प्राणिमात्र- अशी सर्व स्थिरचर सृष्टी मौजुद असते.

म्हणुनच, इथे आल्यावर “पदपथ” (Footpath) ह्या शब्दाचा अर्थ पुरेपुर कळ्ला ! जपान मधे, कुठे चालवं लागत या प्रश्नाचे उत्तर "सगळीकडे" इतकं साध आहे. म्हणजे ठेस्ना पासुन घराकडे, फलाटावर (काही मोठ्या ठेसनांच्या फलाटांवर तर अक्षरश: १-१ कि.मी. चालायला लागते- इप्सितस्थळी पोचण्यासाठी. त्यातून जर भिडु नविन असला आणि जपानिच्या नावाने बोंब असली, तर मग विचारायलाच नको. तोक्यो स्टेशन वर तर १५ लोकन्ना (इंग्रजीत) पत्ता विचारला की १६ वा मनुष्य पत्ता सांगतो(त्याला इंग्रजी येत असेल तर) नाहीतर बिचारा वाट वाकडी करुन हाताला धरुन रस्ता दाखवायला येतो. सगळ्या, म्हणजे झाडुन सगळ्या Tourist Points वर जबरद्स्त चालायला लागते. मग तुम्ही तुमच्या गाडीने जा नाहितर बस/ट्रेन ने जा- कुठंलही वाहन तुम्हाला फक्त २-३ कि. मि दुर, (त्यांच्या मते) अगदी पाय्थ्याशी नेउन सोडते. मग पुढे तुम्ही आणि तुमचे पाय ! आणि लहान मुलं आणि त्यांच्या बाबागाड्या बरोबर असल्या तर हर हर महादेव !. बर एवढचं नाही, तर प्रत्येक मंदिर/शिंतो Shrine मधे असंख्य पाय-या असतात. मुकाट्याने चढायच्या !

म्हणुन सगळ्या मह्त्वाच्या पर्यट्न स्थळांना भेट दिली तर सर्वात (चालुन चालुन आणि जपानि बोलण्याच्या प्रयत्नाने जेरीला येउन) हैराण झालेले पर्यटक हे एक तर भारतीय नाहीतर सामान्य अमेरिकन असतात. (जाडजुड आणि कायम गाडी ची सवय असलेले)! माझ्या एका जपानी सहकार्याचे असे प्रामाणिक (आणि काहीसे आत्यंतिक) मत आहे, की अमेरिकन लोकं तर कायम गाडि चालवून दमतात आणि श्रमपरिहारासाठी मग McDonald’s वगैरे मधे जाऊन चीज/Beef वगैरे पौष्टिक गोष्टींनी युक्त असा माफक अल्पोपहार करतात. म्हणुनच त्यांचा सरासरी बांधा एवढा मेदयुक्त असतो. म्हणुनच जपान मधे पर्यटकांच्या शारिरिक उद्धारासाटी भरपुर चालायला लावतात. तात्पर्य- चालणे हे येथे, वैकल्पिक नसून अनिवार्य आहे.

पादचारी हा जपान मधे “बिच्चारा” नसून , पादचा-याचा इथे भलताच रुबाब असतो. पादचा-यांसाठीचे signal तोडुन आपले घोडे (खरं म्हणजे गाडी)पुढे दामटवू पाहणारा एकही माई का लाल मला ३ वर्षात दिसला नाहि. जपानी गाड्या गल्लोगल्ली अक्षरश: पादचारी सुखरुप जाइपर्यंत थांबतात. उगीचच “डोळे फुटले का “? “मरायला काय आमचीच गाडी मिळाली का “ वगैरे प्रेमसंवाद येता जाता कानावर पडत नाही, शिवाय आणि हा॔र्न वरचा हात न काढता - त्या मंजुळ आवाजावर आपण आवाज काढुन भांडणार- मायदेशात आणि विशेषत: पुण्यात वाहने फक्त गुरुत्वाकर्षणाचे नियम पाळ्तात(ते सुद्धा नाइलाजास्तवं !)त्यामुळे पुणेरी पादचा-याला, जपानी पादचा-याला मिळ्णा-या ऋजू वागणुकिची सवय होणे अंमळ कठिणचं जाते.

सरतेशेवटी, चालणे ह्याविषयीच्या आपल्या आणि त्यांच्या द्रुष्टीको्णातिल फरक स्पष्ट करायला एक ऊदाहरण वानगीदाखल सांगते-
जपानीच्या तासाला आम्ही सर्वजण”त्सुराइ” म्हणजे- खुप त्रास होणारं/ कट्कटीचं- या अर्थाचा शब्दप्रयोग शिकत होतो. कोणी कोणी काय काय शब्द जुळवून महत्प्रयासानेचं वाक्य तयार केली. तर मी- आमच्या घरासमोर एक ११६ पाय-यांचा जिना आहे- तो रोज चढुन जाणे किती कट्कटीचे आहे- वगैरे वाक्य जुळवली (जपानित)- त्यावर समस्त “गाईजिन” म्हणजे गोरे विदेशी लोकं हळहळले… तु हातात आटवडयाचं जड सामान वगैरे घेउन कशी काय चढतेस बाई ?? ते अपार्ट्मेंट बदल आधी - वगैरे सहानुभुतिदर्शक उद्गार आले.(लक्षात घ्या ते सर्व अमेरिकन, क॔नेडियन वगैरे होते). यावर माझ्या जपानी गुरुमाउलीची प्रतिक्रिया मार्मिक होती. ती म्हणाली “त्सुराइ” काय आहे त्यात ? उलट किती “केंकोतेकी” आहे (म्हणजे तब्येतीला चांगले आहे ! रोज सकाळ- दुपार संध्याकाळ जिना चढतेस/ उतरतेस सामान/ बिमान घेउन म्हण्जे- तब्येत चांगली राहील अगदी- पाठीचे / पायाचे विकार होत नाहीत- etc etc…

हे ऐकुन आम्ही सर्वजण पुरते हबकलो !
तात्पर्य “पाउले चालती तोकियोचि वाट”- चांगली बिकट वाट वहिवाट आहे !!

Thursday, April 20, 2006

Karuizawa


Why is it that the stillness of time shocks me?
Is�nt time supposed to be fluid
and slipping out of one�s fingers all the time ?
Am I not supposed to lament the lack of time, all the time.
What would you call the feeling,
of wonder that engulfs you,
when you see a tree in a metropolis.
God ! Whoever has trees anymore. ?
Whoever cares for trees and insects anymore ?
What kind of infernal life forms are these?
You mean that leaf of grass is actually alive? Porous?
It lives and it feels?
It grows and it wilts?
It has a scent and music? It rustles and sways?
In the name of science,
What would anyone achieve by discovering life forms on Mars.
When there is actual life on this planet that so few notice and revere

Random

When I was younger, happiness meant
The rainbow, the scented flower picked from the plant
When I was still younger than that
Happiness meant a full belly, calm sleep, gurgling joy of talking to oneself and letting the cooing world go to hell
Since then, something seems to be the matter with the world
Can�t remember how happiness came to be a bitch
A stolen glance, a stolen thought, gentle breeze through recalcitrant hair, the feeling of suddenly possessing a body that the wind could caress, of the raindrops paving their way in the labyrinth of the newly acquired body parts giving rise to heretofore inexperienced dance of the senses, of the five elements.
There was no yearning for happiness then, the youth sat glumly smug chewing their misery and slowly building up toxic waste in the system
It was an awakening to join the force of evil, of love, lust and longing, of envy and sullen pride and anger.
In those days anger meant happiness, an expression of giving the world the finger.
It was fashionable to harbour ill-feelings of being victimized and wallow in self-pity or intoxication.
With your progenitors paying for the education to enable you to express your anger and keep it hopefully channelized, it was easier to vent off your frustrations and opinions on the world.
What stopped us then from seeking joys in killing and blood and gore was the fact that we were well fed and therefore had ardent opinions in college canteens.
Once in a while, happiness was wondering about one�s rightful place in the universe and questioning the galaxy in its entirety
Happiness definitely meant a song, a dance in the rain, a cup of tea and endless thoughts and unbridled sentiments, changing the world and all that.

These days commuting to and fro to the concrete horrors and drilling away into the time,
Losing the sense of possession of one�s limbs while going through the motions the most that happiness means is buying more luxury to work harder.
What has the world come to- when happiness is supposed to mean plastic cards.
Those were the days-when I could not count the zeroes.
The day zero stopped being nothing and started meaning millions, a note went off- key.

There are still times when I gift myself a song, a poem, empty words

Tuesday, July 20, 2004

Experiencing "Othello"

Latest: 29th April 2004,
Happened to see Royal Shakespeare Company's "Othello" in Tokyo (of all the places). Looking at the price of the ticket- an emotion that felt somewhat like a mini-cardiac arrest overcame me. ;-)But watching the play.... Felt like one of those things that make you feel eternally indebted to the Almighty for living, existing, comprehending, thinking. (Like listening to Lata Mangeshkar of the yore for example). Experiencing the Experience..Amazing ! Even with my limited knowledge (??) of theatre and that of the works of poet laureate- the play was truly OUTSTANDING.. Amazing, how the words of Shakespeare came alive. Amazing, how contemporary the play felt. Do we all not encounter Iago's of the world in the corporations that work in? Do we not experience how during campus days, people we knew turned into Othello and Desdemona from Romeo and Juliet. As for the quality of the performance of the play, this is called performance, perfection and professionalism. Amazing how one person wrote 37 plays 400 years ago- and after that there is nothing much left to say..What else is posterity?Amazing how a group of professionals bring alive the bard's words 4 centuries later to an audience that is so typically inflicted with the symptoms of post-modern times, to an audience that realises its alive and can still take some time off from earning for a living, to actually live,think,feel and appreciate and experience...

Tuesday, July 01, 2003

Homesickness

one does get
homesick- especially after the novelty of being in the foreign country and
finding everything hip, hop,clean to a fault and technologically superior to
our motherland wears off. . And then one starts remembering the sights and
smells and sounds and the feel of India.... and actually pining for things
as trivial as mangoes or bhel or the Amrutatulya chai / tapris for that
matter or the dirty trains of Mumbai and typical nasal tones of Punekars and
their extremely parochial attitudes...(the thought of pining for which in
India would have seemed ludicrous). And all this, excluding the people who
have been an indelible part of our lives till now- missing parents, friends,
relatives and general junta.... That itself is killing.
So in other words, these days sometimes I keep having withdrawal symptoms
for home and India and all the good and bad things that go with it..
People say, it happens...... The urge to just run away as fast as the legs
wud carry us and catch the first bloody stupid AI flight home gets rampant
after the first 30 days of living abroad.. And this continues for the next
month or so... After about a quarter you kinda settle down in the alien
country.... and then it grows on you...

Thursday, October 03, 2002

About IMDR- My Alma Mater


IMDR - Pune's first management institution was established in 1974. Located against the picturesque backdrop of Fergusson hill, it almost seems as though IMDR carries the hill on its shoulders. IMDR sure carries on with the Herculean task of carrying with it- the legacy and the values, the spirit of self-reliance and renewal of the D.E.Society, the pioneering spirit and fire of D.E.Society's founders.

In the beginning, IMDR was affiliated to the Pune University. In 1977 IMDR sought autonomy and so it remains today- Pune's leading autonomous management institute that designs its own curriculum in tandem with changing times and focuses towards nurturing "thoughtful sensitive individuals". IMDR today boasts of a state- of the art infrastructure and cutting edge education provided at a modest cost to a wider section of the society, in line with the D.E.Society's philosophy.

IMDR is a management institute that bestows upon its students a perspective about management in Indian thought and context, a self-questioning thought process, the freedom to be creative yet with a sense of responsibility, and finally the freedom to be themselves.

The allure of IMDR lies in imparting this value of "freedom and courage to be themselves" to the students!

Time Machine

Rewind down memory lane to the hallowed place where we spent, dare we say, 'the best days of our life'!

IMDR Lingo

Remember those words, " thoughtful sensitive professional" or "perspective" or "systems perspective" or "Process Lab"? No one, but no one, who came in the radius of IMDR or the "Mandarins" of IMDR, can escape these words. We who have been-here-done-that can't but read through these words without a smile on our face.

Remember those endless wars of words, the wars of jargon's and half-baked theories and diagrams, the wars of lungpower - very innocuously called "CASE STUDIES "? Talk about understatements!

Remember:
"Our team is dynamite, we are IMDRites". Through the sometimes nightmarish reality of post IMDR phase of life, in times of utter divine despair, flashes of this slogan uttered (nay bellowed is more like it ;-) in deafening volumes, with the words ricocheting off the quadrangle walls by the sheer magnitude of the enthusiasm of those who shouted themselves hoarse- still come back to me with a ray of HOPE.

Remember IMDR's own version of Murphy's laws? The ratio of students getting placed on IMDR campus in the first few days is directly proportional to the number of backlogs per student.

Remember the IMDR anthem? Yes the ubiquitous R.D.Burman number "Pyaar hame kis mod pe le aaya", sung compulsorily in an off-key baritone.

However- this particular statement takes the cake. Through the years, maybe through the centuries to come, these words would always be debated amongst the past, present and future students, faculty members, and probably even the trees in IMDR. To IMDR and IMDRites the question that bothers them more than the mystery of creation of this universe - is that famous 4 words question ---- SHOULD IMDR MARKET ITSELF ? In a world where change is the only constant- this question has outlasted us and would probably outlast our children. Thank God for small mercies- some things never change!

IMDR Canteen Realigning the IMDR (food) strategy-------- anyone?

To quote the evergreen Prof. Tambe, IMDR canteen was and is an effective means of "verbal inoculation against diseases". Maybe we should patent this, for this one vaccine, has over the years taken upon its rather frail (and not exactly hygienic, if you ask me) shoulders to protect all the animate and inanimate objects in IMDR against bacteria.

The Canteen cuppa chai is another of its specialties. Served in the cups, 2 inches in length & 1 inch in diameter, it may dignify the nomenclature of "the drink of immortality". Which other drink, pray tell me, would do its best to banish the eternal sleep from the hapless student's eyes and replace it with a sense of awakening to the reality? Besides one would really have to pay attention to the quantity, I mean, before you could blink, 2 gulps and whoa--------- the cup would be empty. Hail Bhaskar !!!

People: if you haven't visited this part of the world wherein lies our aforesaid beloved Insti- and still think that the canteen sports wooden (our own challenge to KITPLY) rickety chairs & tables, think again !!! The canteen now is (like or unlike the curriculum) revamped. It is ornately decorated by white plastic chairs with 4 legs and white plastic round tables! The canteen also (hold your breath) has a ZIP phone, which works! The canteen still serves the same edible items that they claimed to serve in our heydays, in the years of yore.
Realigning the IMDR (food) strategy-------- anyone?

Odes to the IMDR canteen are incomplete without who else but our very own Canteen Cowboy Prof. Sapre.
He is the pillar of strength to the canteen and should actually write a paper on the ratio consumption of the drink of immortality (Read: IMDR without sugar chai) to the number of indigenous anti establishment hypotheses proposed in the canteen. From finance to fidelity, from Hugh Grant to Enrico Fermi to Socrates, from books to Pune nooks and corners conducive for budding romances, and from advice related to emotional and financial bankruptcy, FERA to saat phere, and chairmanship of FOSLA (Frustrated One Sided Lover's Association dear!! Have you forgotten or what?), to just about anything under the sun- Sapre Sir's sharp tongue and twinkling bespectacled eyes (but don't let that fool you, you know how he manages to get a whiff of the most secret (est) romances on the campus) dole out advice on anything and anyone!

Prof. Sapre can take the credit of having PROCESSED batch after batch of budding Romeo and Juliet who by the way- by the end of IMDR stint miraculously turn into Othello and Desdemona. Love is after all only a 4-letter word right?

By the way, when he is not in the canteen Prof. Sapre also teaches FINANCE (among other things) and many a poets (i.e. the non- engineering, non science students who are allergic to the number system invented by Greeks, sorree Romans, sorree Indians, oh dash! whoever it was) have spent or at least claimed to spend many a sleepless nights trying to complete that dreaded bloody %$&$*(I beg your pardon, OLD grudges die hard!) CMA form assignment.

These days another permanent fixture in the canteen with his own SK�s (sidekicks) or coterie is another distinguished (of course you can't miss him , he weighs only 180 pounds & sports a Rabindranath Tagore beard) faculty member humbly called in total blissful ignorance of his Goliath like stature "Sukumaran" Dr. Anand Sukumaran !
Doc(as he is fondly called) is out regularly doling (un) solicitous advice again on diverse & unrelated topics such as dietetics and liquor consumption to pseudo spirituality and sex scandals. One is very pertinently reminded of the Buddha, under the bodhivruksha and the knowledge hungry disciples lapping up every word of wisdom at his feet!
On Doc's rather broad shoulders also rests the onerous responsibility of the spiritual and physical well being of his wards- In case you don't know he is the current warden of the human pigeon holes very magnanimously termed as boys hostel!
When he isn't advising anyone, which is a rarer occurrence than the appearance of Haley�s comet- Doc also teaches Communication Theory, Manpower Planning etc.

With paeans to these individuals who add to the charm of the IMDR canteen, we have to take your leave now!