Weltanschauung

Hi, These are my thoughts on things that matter to me..

Tuesday, July 18, 2006

रजनील ओकिनावा- माहेरची झाडं आणि जनजीवनरिसॉर्टच्या बागेत आता उतरुन खाली आलो तर एकदम धक्का बसला…चक्क चाफ्याचे झाड दिसलं- बावचळल्यासारखी बघत राहीले- माहेरचे माणूस भेटल्यासारखे वाटले. इकडे तोक्योत असली घमघमणारी चाफ्याबिफ्याची झाडं दिसणं तर सोडाच, गुलाबाला सुद्धा फारसा वास म्हणून नाही.. आपल्याकडे किती सुगंध असतात- सौम्य जाईजुईसायली ते मोहक मोगरा ते उग्र मादक वासाच्या सोनचाफ्या पर्यंत !! जपानातले गुलाब बरेचसे बिनवासाचे असले तरी दिसतात टप्पोरे- पण वास नाही म्हणजे नुसतेच आवाज बंद करुन सिनेमा पाहावा तसे.. अपूर्ण…
खाली पडलेलं एक चाफ्याच फूल उचललं आणि वास घेतला तेव्हा धन्य वाटलं- पुढे ४ दिवस फिरताना सगळीच आपली झाडं दिसत होती… जास्वंद, त-हेत-हेचे (वासाचे) गुलाब, तगर, लाल चाफा, मोग-या सदृश फुलं , आंब्याची झाडं, केळीचे घड आणि….. गुलमोहोर….
गुलमोहोर दिसला आणि दिवसभर ओल्या कपड्यांनी अक्षरश: वादळात फिरण्याचा शीण विसरले… समोर छत्रीला टिकु म्हणुन न देणारा पाऊस - पण मनात मात्र मायदेशातले वैशाख वणव्यात आकंठ पेटल्यासारखे दिसणारे गुलमोहोराचे डवरलेले झाड आणि खाली पडलेला लाल गालीचा …. मी आणि नवरा दोघेही डोळे भरून पाहात राहीलो…
तर सर्वत्र असे जाणवले की ईकडे सगळी उष्णकटीबंधातील वनराई पहायला मिळत होती… तोक्योच्या आणि इथल्या झाडाझुडपात विलक्षण फरक…
गंमत म्हणजे- मी अरे हा पहा चाफा , म्हणुन ओरडते आहे तोच निकोलस वा! फ़्रांजीपानी म्हणून झाड बघायला धावला… मनात आलं -आम्ही तिन देशांचे चार लोकं तर खरेच… पण चाफ्याचा घमघमाट आम्हाला सारखाच भिडला होता की..


नंतरचे दोन दिवस पावसाची संततधार होती तरी खूप फिरलो…
Glass Bottom Boat मधली सैर केवळ अविस्मरणीय…. समुद्राचा तळ -तळ म्हणजे काय हे लख्ख दिसत होते… बोटीचा चालक भरपूर खाद्य टाकत होता म्हणुन माशांचे लोटच्या लोट येत होते- ते स्पष्ट दिसत होते.. बोटीतली इतर जपानी चिल्ली पिल्ली चिवचिवत होती.. जपानी पोरं अचाट असतात - कुठल्याही मत्सालयात जपानी पोरांनी कधी माशाला सुंदर म्हंटलय? छे… कार्टी नेहमी मासे पाहून “ओईशी” (tasty.. रुचकर!!) असे ओरडतात… इतकी गंमत वाटते त्यांची … त्यांना मासे पाहीले म्हणजे आपसूक खाद्यपदार्थच आठवत असणार…. इथेही मुलं अगदी डोळे विस्फारून बघत होती.. तोंडाने मात्र.. “ओईशी” चालू….

मग एका Underwater Observatory त गेलो.. Cylindrical आकाराची Observatory. त्यात जिन्यानी उतरुन खाली जायचं आणि खाली पोचल्यावर सगळीकडे पोर्टहोल मधून मासे पहायचे…. मासामीचीला Claustrophobia! तो गळपटला! येत नाही म्हणाला.. त्याला पटवून, काSSही होत नाही- ये तर खरं, असं म्हणून खाली नेलं… वरती धोधो पाऊस .. शांतपणे उभं पण राह्ता येत नव्हतं. छत्री उघडणं तर सोडाच, स्वत:च उडून जाण्याएवढा सोसाट्याचा वारा…. शेवटी बिचारा आमच्या बरोबर खाली आला… किती वेळ त्या पोर्टहोल्सच्या काचांना नाकं लावत मासे पहात होतो…
उभ राहून बघताना पाय दुखायला लागले पण मन भरत नव्हतं…. पाय ओढतच बाहेर आलो आणि पावसात गाडीपर्यंत धावत गेलो…

मग रिसॉर्ट वर परत येउन पावसातच समुद्राकाठी बसलो… हे तिघं जण पोहायला गेले समुद्रात…. नव-याला पोहायला आवडत असलं तरी तो बेतानेच आत जात होता हे पाहून हायसं वाटलं. निकोलस एकटाच फारंच दूरपर्यत गेला… तिकडे साधारण किलोमीटर वर निळया जाड फ़्लोटर्स नी एक कुंपण केलं होतं… त्याला ती सीमारेषा पार करुन आणखी पुढे पोहत जायचे होते… पण वारंवार ती सुरक्षा जाळी त्याला पुढे जाउ देत नव्हती…
आम्ही पण सगळॆ जण त्याला " लई झालं आता ! परत ये.. "अशा खाणाखुणा करत होतो… शेवटी आला एकदाचा…
आणि म्हणाला" बायकोनी दम दिलाय म्हणुन त्या जाळीच्या पलीकडे गेलो नाही… तिचे वडील ओकीनावात पोहताना वाहून गेले होते… म्हणुन ती ओकीनावातल्या समुद्राला धसकून असते… "" ऐकुन पोटात गोळा आला….


मग तो आम्हाला त्याच्या बायकोच्या ओकीनावातल्या नातेवाईकांबद्दल सांगत होता… त्याच्या बायकोचे काही दूरचे नातेवाईक ओकीनावाच्या असंख्य छोट्या बेटांपैकी एका बेटावर रहात होते… जेमतेम ५० घरांचे गाव.. एक शाळा- त्यात ५ छोटी मुलं आणि तिन शिक्षक. त्या गावात बायकोच्या आजीकडे हे दोघं काही दिवस राहीले होते.. ती आजी ७० वर्षी स्वता:ची नाव घेऊन Squid fishing ला जाते… (ओकीनावात जगातले सर्वात जास्त शंभरी पार केलेले लोकं राहतात… कष्टाचे जीवन, सुंदर निसर्गरम्य ठिकाण…. औद्योगीक वसाहत फार कमी… जेवण म्हणजे विवीध प्रकारचे स्वत: पकडलेले मासे…. मन:शांती, माफक आणि पोषक आहार आणि आनंदी जगणे हे ह्या दीर्घायूष्याचे रहस्य असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे…
मग वाटले… ट्रेनमधील गर्दी , रस्त्यावरील रहदारी, रोजचे तणावपूर्ण काम… ह्या सर्वांनी आपण पैसे मिळवतो की क्षणाक्षणाने आपलं आयुष्य व्याधीग्रस्त करत असतो… ? असो.)
तर ही आज्जी रोज रात्री Squid Fishing जाते- एका रात्री नातीला आणि फिरंगी नातजावयाला बरोबर घेउन गेली…. आज्जी सर्राईतपणे सरसर गळ टाकून मासे पकडत होती.. Squid पकडला की तो एक द्रव/शाई बाहेर टाकतो.. ती शाई घालून इकडे स्पगेटी करतात… ती "इकासुमी" Squid Ink Spaghetti इकडे भलतीच लोकप्रिय आहे… तर दुस-या दिवशी आज्जीने न्याहरीला नातजावयाला इकासुमी सूप दिले… आम्ही विचारले- कसे लागले? निकोलस म्हणाला… ""It looked and tasted like motor oil. ""पुढचे आठही दिवस न्याहरीला तेच Motor Oil सारखे लागणारे सूप होते..

सुर्यास्त बघावा म्हणुन कधीचे रेतीत बसलो होतो… जोडिला कमीअधिक पाउस होताच…शेवटी लक्षात आले की इतक्या भरुन आलेल्या आभाळात काय डोंबल सुर्यास्त दिसणार ? आता खोलीत परत गेलेलं बरं…. खोलीत जाउन अंधार पडेस्तोवर ते कातळ पहात बसलॊ शांतपणे…

1 Comments:

  • At 10:34 PM, Blogger Vishal said…

    हा लेखही अतिशय छान जमून आलाय. खरंच.. तोक्योमधल्या लोकांना जाई-जुई किंवा मोग-याचा गंध एकदा दाखवायलाच हवा. आणखीही खूप गोष्टी या लोकांना दाखवाव्याश्या वाटतात. आपण जसं जपान अनुभवलं तसा यांनी भारत अनुभवावा अशी माझी फार इच्छा आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये भारताच्या दौ-यात प्रयोगशाळेतल्या दोन-तीन सहका-यांना बरोबर घेवून जायचा विचार आहे.(अर्थात ते तयार झाले तर). पाहूया जमतं का.

     

Post a Comment

Links to this post:

Create a Link

<< Home