Weltanschauung

Hi, These are my thoughts on things that matter to me..

Tuesday, June 20, 2006

अनुदिनी अनुतापे तापलो रामराया

मागच्या आठवद्यात पुन्हा एकदा ट्रेन ला उशीर झाला होता. सकाळची लवकरची एक मिटीन्ग होती म्हणुन स्टेशनवर सकाळी लवकर (पावसात तड्फडत) पोचले तर हीSSS गर्दि… नुस्त्या छत्रया आणि निथळणा-या माणसांचा उसळलेला समुद्र ! तशी रोजच गर्दी असते- पण गाडीही उशीरा येणार आणि येवढेच नाही तर तोक्योच्या दिशेने जाणा-या सर्व गाड्यांचे वेळापत्रक बोंबलले आहे हे कळल्यावर वैताग/चिडचिड व्ह्यायच्या ऐवजी, आधी काळजात धस्स झाले. ! माझे भय कधि खोटे बोलत नाही.
लवकरच त्या सगळ्या गोंधळातुन अपेक्षित घोषणा कानावर पडली आणि खात्री पटली.
जे बर-याचदा होते इथे, तेच झाले होते ! कोणीतरी सकाळी ७:०६ वाजता गाडीसमोर उडी मारुन आत्महत्या केली होती आणि तोक्यो कडे जाणा-या सर्व गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. ह्याला जपानीत "जिनशिनजिकौ " म्हणतात ! (जपानित literal शब्दार्थ- human-body-accident)

हे -आताशा फार व्हायला लागले आहे का ? सरासरी आठवड्यातून १दा हा प्रकार होऊ लागला आहे…… इतके कसले ह्र्दयद्रावक प्रसंग घडले असतील या अभागी माणसांच्या आयुष्यात, की त्यांनी हा मरणाचा अतिशय भीषण आणि वेदनादायक प्रकार स्वीकारावा ? “स्वेच्छामरणाला” सुद्धा माझा खरंतर तात्विक विरोध नाही, पण ह्या अशा हिंसात्मक मरणाचं ऐकुन माझ्या तरी जिवाचा नुसता थरकाप होतो. जीवनात शांतता नाही, म्हणुन मरण पत्करावे, तर मरण देखील शांतपणे येऊ नये ही कसली दैवगति ? हा कुठला ऊफराटा न्याय? एक वेळ असे जरि मान्य केले, की जिवनसंघर्षाला कंटाळुन , एखाद्यानी हा आततायी निर्णय घेतला असेल- तरी मरणाची ही कसली त-हा? मरणच मागायचे तर शांत , मुक्त करणारे का नाही? मग ह्या नरकयातना देणा-च्या, देह छिन्नविछीन्नं करणा-या मरणाची मनिषा या लोकांनी का करावी?

जिने की वजह तो कोई नही, मरने का बहाना ढुंढता है !
मरने का ऐसा कौनसा जायज बहाना मिल गया ? हा प्रश्न मला नेहमी पडतो.

जपान मध्ये असा गाड्यांना उशीर झाला की स्टेशनवर (साहेबाला दाखवण्यासाठी ) एक चिठ्टी देतात ज्यावर लिहीले असते की आज गाडीला उशीर झाला वगैरे आणि जपानी कंपन्यात काम करणारे लोकं ती चिठ्ठी आवर्जुन घेतात. जे प्रवासी पैसे परत मागतील, त्यांना जपान रेल्वे तिकिटाच्या काही टक्के , ठराविक रक्कम परत करते. आणि असे ऐकले आहे की अशी आत्महत्या करणा-या म्रृत व्यक्तिच्या कुटुंबालाच जपान रेल्वेला नुकसान भरपाई द्यावी लागते. हे खरे असेल- तर मला अजुनच अचंबा वाटतो. आपल्याच कुटुंबियांना अजुनच त्रास (मानसिक आणि आर्थिक) होणार, हे निश्चित असताना ही हे असे का करत असावेत ?

माझा साहेब फिरंगी आहे, तो पुर्वाश्रमी बरीच वर्ष राणीच्या देशात पोलीस खात्यात होता, आणि त्याची बायको जपानी आहे. हे एवढ्याच साठी सांगीतले की त्याला गुन्हेगाराच्या मानसिकतेची जाण आहे आणि बायको जपानी असल्याकारणाने त्याचे जपानी लोकांबद्दलचे अनुभव जास्ती आहेत, जपानी संस्कृतीशी त्याचा घनिष्ठ परिचय आहे. तर त्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण असे आहे की - “”These people have not been able to create an impact in their life, at least in death, they get noticed, and are able to create an impact (even if negative), and affect so many people. “”

ही सगळी मानसिकता वगैरे खरी असली तरी, बेरोजगारी, अठरा विश्वे दारिद्र्य, स्वेच्छेने स्वीकारलेला भयंकर अगदि चिरुन टाकणारा एकटेपणा, कामाचा डोंगर, तीव्र महागाई ( तोक्यो हे जगातील सर्वात महाग शहर आहे), भावनिक आधारसंस्थांचा अभाव आणि एकंदरीतच, भावनांचा सह्जासहजी निचरा न करु देणारी संस्कृती- ही प्रमुख कारणे आहेत. २००५ मध्ये आत्महत्या करणा-यांपैकी ७२% पुरुष होते आणि जवळजवळ अर्धे बेरोजगार!

माझ्या एका सहकार्याने तर अशा एका माणसाला प्रत्यक्ष पाहिले. तो गाडीची वाट पहात स्टेशनवर थांबला होता. गाडी जवळ आली तशी क्षणार्धात त्याच्या पासुन १० फ़ुटावर असणा-या एका माणसाने , काही कळायच्या आत गाडीसमोर उडी घेतली !
मला तर नेहमी प्रश्न पडतो की ज्या गाडीसमोर अशी घटना घडत असेल त्या बिच्चा-या चालकांना काय वाटत असेल? (रेल्वे प्रशासनाच्या पदरी अशी नोकरदार माणसे आहेत की जे ह्या छिन्नविछीन्न झालेल्या देहाची योग्य विल्हेवाट लावण्यात तरबेज असतात! )
आणि सर्वात वाईट वाटते ते अशा लोकांच्या कुटुंबियांसाठी , जाणारा तर आपल्या कर्मानी गेला, पण उरलेल्यांनी कशाच्या बळावर हा आयुष्याचा प्रपंच चालु ठेवायचा?

पु.ल.देशपांड्यांच्या पुर्वरंग मध्येही “हाराकीरी” चा उल्लेख आहे. अतामी चा टॅक्सी एक चालक, त्यांना एक कडा दाखवून सांगतो, की पुर्वी इथून खूप लोकं आत्महत्या करायचे. जपानात एकंदरीतच आत्महत्येचे प्रमाण फार! असे म्हणतात की २००५ साली जितके लोकं रस्त्यावरच्या अपघातात गेले, त्याहून जास्त लोकांनी आत्महत्या केली.

गेली आठ वर्ष सातत्याने ३०,००० हुन जास्ती लोकं दरवर्षी आत्महत्या करतात. प्रगत औद्योगिक राष्ट्रांमधील माणशी सर्वाधिक आत्महत्या करणा-यांचे प्रमाण जपान मध्ये सर्वात जास्त आहे.
Group Suicides म्हणजे २-३ जणांनी मिळुन, ठरवून केलेली आत्महत्या ! ही लोकं कुठे कुठे महाजालावर संपर्क साधून मग ठरवतात की कुठे , कशी , कधी, कोणाबरोबर आत्महत्या करायची. ह्या असल्या भलत्या गोष्टीसाठी, एकमेका साह्य करणारी माणसे, आत्महत्येचा कुठला पर्याय जास्ती चांगला ह्यावर वेळ घालवण्यापेक्षा जीवनसंघर्षात एकमेकांना मदत का करत नाहीत ?

सरकारदरबारी ह्याची नोंद आणि उपाययोजना वाढत आहेत. Group Suicides साठी उचकावणा-या संकेतस्थळांवर पोलीस गस्त घालत आहेत. NGO’s ही कारणमिमांसा करण्यात आघाडीवर काम करत आहेत. सरकार, कंपन्यांसाठी नवनवे Employee Mental Health साठीचे उपक्रम राबवायला फतवे काढते आहे. जपान मध्ये, खुप सार्वजनिक सुट्ट्या आहेत त्या यासाठीच, की लोकांनी जरा सक्तीची विश्रांती घ्यावी- कारण काही लोक अक्षरश: अति कामामुळे ही जीव द्यायला राजी होतात.

अनुदिनी अनुतापे तापलो रामराया म्हणत, एकदम हे जग सोडून जाणा-या ह्या लोकांबद्द्ल काय करावे, त्यांना कसा आधार द्यावा आणि त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन, हा सरकारसमोर यक्षप्रश्न आहे.

अधिक माहीतीसाठी वाचा-

http://www.atimes.com/atimes/Japan/FG28Dh01.html
http://www.wsws.org/articles/2004/oct2004/japa-o20.shtml
http://search.japantimes.co.jp/cgi-bin/ed20060619a1.html
http://news.bbc.co.uk/2/hi/asia-pacific/5082616.stm


संपुर्ण.

2 Comments:

 • At 8:55 PM, Anonymous शैलेश श. खांडेकर said…

  नेमक्या शब्दांत परिस्थिती मांडणारा लेख वाचुन फारच विषण्ण वाटलं. खरंच, आयुष्य इतकं सुंदर असतांना लोक जग सोडण्याचा आततायीपणा का करतात? प्रगतीशील राष्ट्रांसाठी प्रगत राष्ट्रांतील सामाजिक परिस्थिती पाहता त्यांच्याकडे काय होऊ नये यासाठी हा गंभीर धडा आहे असेच म्हणावे लागते.

   
 • At 11:05 PM, Blogger Vishal said…

  जपानमध्ये राहून दोन वर्षं होत आली. याविषयी मी ऐकलं होतं पण वरच्या आकड्यांवर विश्वास ठेवणं कठीण जातंय. तसा माझा ट्रेनमधून फारसा प्रवास घडत नाही. पण जपानमध्येही एवढी लोकं ट्रेनखाली जीव देतात याची कल्पना नव्हती. पण त्याची कारणमीमांसा मात्र पटण्यासारखी आहे. असो.
  ओकिनावाची सफर म्हणजे खरोखरच अविस्मरणीय अनुभव असणार. जपान सोडण्यापूर्वी एकदातरी होक्काइदो आणि ओकिनावाला भट देण्याची इच्छा आहे. पण त्यापूर्वी आपल्या प्रवासवर्णनाच्या प्रतिक्षेत आहे.

   

Post a Comment

Links to this post:

Create a Link

<< Home