Weltanschauung

Hi, These are my thoughts on things that matter to me..

Monday, July 03, 2006

रजनील ओकिनावा


हा आमच्या गाडीतून दिसणारा , धो-धो पावसाचा मनोहर (?) देखावा. ओकिनावात पाउल ठेवल्यापासून , जायच्या क्षणापर्यंत सतत सोबत करणारा पाउस..




सुदूर पूर्वेच्या ह्या मनोहर देशाच्या नै‌ऋत्येला हजारो बेटांचा द्विपसमुह आहे- त्याचे नाव ओकीनावा.
जपानचे ४७वे राज्य. पूर्वी हे एक स्वतंत्र राज्य होते- Ryukyu Kingdom. ताईवान आणि जपान च्या मधोमध नकाशावरील छोटीशी बेटांची द्विपमाळ. हवाई , बहामा वगैरे जगप्रसिद्ध पर्यटकांची पंढरी असलेल्या बेटांच्याच अक्षांशावर असल्याकारणाने- हवामान ही तसेच. पाऊस तर पाचवीलाच पुजलेला. तोक्योत पाउस पडत नाही, नुसताच झिमझिमतो, त्याचे आता मी पाउसुल्लु ( पावसाचे पिल्लु) असे नामकरण केले आहे.
ओकीनावातला पाउस धोधो.. म्हणजे मुंबईच्या पावसानी लाजून मान खाली घालावी असा, कधी कधी लोणावळ्याच्या परिघात पायपीटीत भेटतो तसा! मुळशीतल्या वांद्र्यात मी आयुष्यात पहिल्यांदा मुसळधार का काय म्हणतात तसा पाउस अनुभवला(देवा ! इतका पाउस की खुशाल तलवारीनी कापावा)- तो असा सुमारे ७ वर्षांनी उराउरी ओकीनावात भेटला.
खरतर तोक्योहून ओकीनावा हा सुमारे २ तासांचा विमानप्रवास. फार काही लांब नाही.. तरी ओकीनावाच्या सहलीच्या किमतीत खुशाल एक सिंगापूर मलेशिया सहल पदरात पडू शकते म्हणून बरेच दिवस जायच मनात असूनही गेलो मात्र नाही कधी. ओकीनावा म्हणलं की लगोलग खर्चाचा आकडा डोळ्यासमोर यायचा- आणि दरवेळेस राहून जायच.
आत्ता योग आला आहे तर जायचेच.. असे ठरवले होते. ३ रात्री, ४ दिवसांचे टुर नेहमीप्रमाणेच २-३ महिने आधी आरक्षीत करायला लागले. अदमासे हवामानाची अटकळ बांधुन दिवस ठरवले.

एक आठवडा आधी हवामान, महाजालावर पाहीले तर काय- पुढचे २ आठवडे धोधो पावसाची सरासरी ८०% शक्यता. टुरवाले रद्द करु देईनात. पैसे ही परत देईनात. शेवटी काय होईल ते होवो म्हणून हानेदा विमानतळावर थडकलो. आमचे हे आन आम्ही आणि, एक न्युज़ीलंड चा सहकारी- निकोलस आणि एक जपानी सहकारी मासामीची. जपान एअरवेजचे विमान शीगोशीग भरले होते. आपल्या सारखे अनेक मजबूर लोकं बघून बरं वाटलं- चला ! हे ही पावसात ओकीनावाला चालले आहेत तर ! आख्ख्या विमानात आम्हीच दोघे भारतीय , तुरळक ५-६ गौरवर्णिय पर्यटक, आणि बाकी सारे जपानी किंवा जपानी दिसणारे.. जपान एअरवेजचे लॅन्डिग लय भारी होते, खाली येताना एकदम धाडकन विमान परत उंचावर आणलेन आणि मग वाईट्टदाणकन खाली आणले . खाली सर्व धुकं. माझ्या विमानभयाला हसणा-या निकोलस आणि मासामीची ची पण त्या लॅन्डिग पायी बोलती बंद झाली होती . खाली आलो तर Hotel ची शटल बस कुठुन सुटते ते जाम सापडायला तयार नाही. तरी बरं मासामीचि असल्यामुळे भाषेचा जटिल प्रश्न नव्हता. मग कार (गाडी) भाड्याने घ्यायची टुम निघाली, निकोलसच्या भरवशावर ती घेतली( त्याचा एकट्याचाच Driving Licence चालत होता), मासामीचीच्या लायसन्सची मुदत संपली होती, आणि आम्हाला ४ चाकी गाडी चालवता येत नाही. त्या गाडीत बसून Hotel चा दूरध्वनी क्रमांक Navigation System मध्ये टाकला एकदाचा आणि त्या रस्त्याला लागलॊ. आता पावसाची रिपरिप सुरु झाली होती, आलापी चालू होती ती पुढील ४ दिवसात वक्री तानेपर्यंत जाउन पोचली, रिपरिप, झिमझिम, प्रोक्षण केल्यासारखा ४ थेंब ते धो-धो, मुसळधार , भसाभसा, प्रलयंकारी महारुद्राभिषेक -वगैरे सर्व प्रकारे पाउस बरसतच होता.


अपूर्ण......

0 Comments:

Post a Comment

<< Home