Weltanschauung

Hi, These are my thoughts on things that matter to me..

Sunday, November 12, 2006

The Story of Barefoot Gen ह्या जपानी anti-war/anti-nuke story चा अनुवाद (भाग ४-६)

(4)

एक दिवस एक पोलिस बाबांकडे आला आणि म्हणाला " तुमची चौकशी करायची आहे. ताबडतोब पोलीसचौकीवर हजर व्हा". बाबांना हातकड्या अडकवून, त्यांना तो पोलिसचौकीवर घेऊन गेला. बाबांना गार फरशीवर ओणवं केल्या गेलं आणि सोट्यानी मारहाण केली गेली. ते बेशुद्ध पडले तसे, त्यांच्या तोंडावर बादलीभर पाणि मारून, कातड्याच्या मजबूत बुटांनी पेकाटात लाथ घालून, पुन्हा बेशुद्ध पडेस्तोवर मारल्या गेलं. पण कितीही छळ झाला तरी त्यांचे युद्धविषयक विचार बदलू शकले नाहीत.
गेन आणि उर्वरित कुटूंब घरी हताश होऊन बसले. कोणाची कमाई नाही म्हणून त्यांच्याकडे अन्न विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. शिन्जी रडू लागला-"मला भूक लागली. मी आता उपाशीपोटी मरणार".
"बाबा घरी परत येईपर्यंत धीर धर बाळा" आई म्हणाली.
त्या काळात तांदूळ विकत घेता येणे हे खूप अवघड होते. हि-यांईतकाच महाग आणि दुर्मिळ असायचा तांदूळ तेव्हा!लोकांना भाता ऐवजी धान्याचा कोंडा किंवा भोपळ्याच्या वेली किंवा जे काही खाण्यासारख असेल ते खावं लागायचं. तांदूळ विकणा-यांना नाकाओका कुटुंबासारख्या "गद्दारां"बरोबर व्यवहार करायला मनाई होती. म्हणून आता घरात कुठलंही अन्न शिल्लक नव्हतं
मग गेनच्या सुपीक डोक्यात एक नवी कल्पना आली." आई आपण नाकतोडे पकडून रात्रीच्या जेवणात ते खाऊ."
गेन आणि शिन्जी शस्त्रात्रांच्या टप्प्याकडे धावले, आणि आई आणि ऐको पिशवी घेऊन त्यांच्या मागे धावल्या. काही नाकतोडे पकडुन ते भाजण्यासाठी घरी घेऊन जाताना वाटेतच त्यांना बाबा भेटले. अटकेनंतर २ आठवड्यांनी त्यांची अखेर सुटका केली गेली होती. आनंदानी गेन आणि शिन्जी त्यांना बिलगले.बाबांनी त्यांना घट्ट मिठी मारली आणि ते म्हणाले" सगळं ठीक होईल आता. मी आता तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही"..... जखमांनी आणि व्रणांनी त्यांचे सगळं शरीर भरलं होतं आणि होते त्यापेक्षा खूप बारिक होऊन ते परत आले होते.
भाजलेल्या नाकतोड्यांच्या जेवणानी त्यांनी बाबांचे सुखरुप पुनरागमन साजरं केलं.

(5)
राजाधिराज हा जपानचा ईश्वर आहे आणि सर्व मुलं त्या राजाची मुलं आहेत असे त्या काळी शाळेत शिकवले जायचे. गेनचे शिक्षक म्हणाले" मुलांनो, चांगले मोठे व्हा, राजाधिराजांच्या आज्ञेनुसार कुठेही जाणारी आणि प्रसंगी त्याच्यासाठी स्वप्राणाची आहूती द्यायला तयार असणारी जपानची शक्तिशाली मुलं व्हा"!
एक दिवस गेनच्या वर्गातील मुलांना, दुरदुरच्या समरभुमीत लढत असलेल्या सैनिकांना उद्देशून पत्र लिहायला सांगीतलं गेलं. सैनिकांना पाठवण्याआधी मुलांना आपले पत्र सगळ्या वर्गासमोर जोरात वाचून दाखवायला सांगितले.
एका मुलानी लिहीलं " Dear Soldiers , आशा आहे की तुम्ही बरे आहात. मोठा झाल्यावर मी सुद्धा तुमच्यासारखा सैनिक होईन आणि खूप अमेरिकन सैनिकांना मारेन. Please keep up the good work.
दुस-या एका मुलीनी लिहीलं " आम्हीही जपान युद्ध जिंकेपर्यंत कसलेही हाल सहन करु. राजासाठी आणि देशासाठी आम्ही कधीही प्राण द्यायला तयार आहोत."
मास्तरांनी या मुलांच कौतूक केलं आणि त्यांची पाठ थोपटली.
आता गेनला त्याचे पत्र वाचून दाखवण्यास सांगितले गेले. गेन वाचू लागला" Dear Soldiers . माझे बाबा म्हणतात की जपानने ह्या युद्धात भाग घेऊ नये. युद्धात अगणित जीव जातात आणि युद्ध विनाश करते. मलाही तसेच वाटते. Please don't die, soldiers . तुमच्या आईवडिलांना दु:ख होईल."
"मुर्खा हे लिहून तु स्वत:ला खरा जपानी मुलगा म्हणवतोस? पुन्हा लिही ते नीट" मास्तर ओरडले.

गेननी पुन्हा पत्र लिहायला नकार दिला, तेव्हा मास्तरांनी त्याच्या कानफटात मारुन, त्याला दोन्ही हातात बादलीभर पाणी घेऊन बाहेर उभं रहायला सांगीतलं. तास संपल्यानंतर त्याला शिक्षकांच्या खोलीत नेण्यात आलं. आत शिरताच ऐको ला (बहिणीला) अर्ध्या कपड्यात पाहून गेनला धक्काच बसला. गेनला पाहताच ती मुसमुसत सांगू लागली " वर्गातले काही पैसे चोरिला गेले आहेत आणि माझे मास्तर म्हणतात की ते मी घेतले आहेत. मी खरच पैसे घेतले नाहीत, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही." मास्तरांनी तिचे कपडे काढून, तिची झडती घेतली, पण त्यांना पैसे कुठेच सापडले नाही. त्यांना वाटलं तिने पैसे दुसरीकडे कुठेतरी लपवले, आणि त्यांनी तिला कबूल करेपर्यंत तसच उभं राहण्याची शिक्षा केली.
"माझी बहीण खोटं बोलत नाही तिच्यावर अरेरावी करु नका" गेन म्हणाला. आपली बहिण निष्पाप असल्याचे गेन वारंवार मास्तरांना पटवायचा प्रयत्न करत होता, पण मास्तर विश्वास ठेवायला तयार नव्हते.
जपानच्या दुर्दैवाने, युद्धाच्या काळात शिक्षकांना युध्दकार्याला मदत करणे अनिवार्य होते- त्यांना आवडो किंवा न आवडो.शाळेच्या अधिका-यांची आणि इतर महत्वाच्या व्यक्तिंची त्यांच्यावर सतत देखरेख असायची. विरोध करणा-या विद्यार्थ्यांना शाळेत ठेवायची मनाई होती. खरं बोलतं असले तरी गद्दार आणि त्याच्या मुलांवर विश्वास ठेवला जात नसे.
"खी खी खी"''रयुकीची (अध्यक्षांचा मुलगा) खिडकीतून बाहेर पाहून दात विचकू लागला.
"त्या नाकाओका मुलीला चांगली अद्दल घडली. मीच तिची कागाळी केली होती."
दुस-या दिवशी सकाळी शाळेची वेळ होऊनसुद्धा ऐको ऊठली नाही. आई तिच्या गादीपाशी जाऊन म्हणाली- "ऐको, काय झालय तुला?" ऐको काही उत्तर देईना, नुसतं हमसून हमसून रडत होती. मग गेन म्हणाला" तिला शाळेत जायचे नाही कारण मास्तरांनी तिच्यावर चोरीचा आळ घेतला आणि तिचे कपडे काढून झडती घेतली."
हे ऐकून बाबांनी कंबर कसली. ते शाळेत गेले आणि शिक्षकांच्या खोलीत शिरले. गेन सांगतोय ते खरं आहे का याची त्यांनी मास्तरांकडे शहानिशा केली आणि त्यांना ऐकोला पैसे चोरताना पाहणा-या मुलाला आणायला सांगीतलं. रयुकिचीला बोलवण्यात आलं आणि लवकरच त्यानी आपण खरतर तिला पाहिलं नसल्याचं कबूल केलं. "मी खोटं बोललो, कारण मला तिला त्रास द्यायचा होता" तो म्हणाला.
हे ऐकून बाबांनी रयुकिची आणि मास्तरांना चांगलच फैलावर घेतलं.

(6)
बाब घरी आले तोच त्यांनी कोज़ी समोर(गेनचा सर्वात मोठाभावासमोर) आईला रडताना पाहिलं. तो खरंतर दूर दारुगोळ्याच्या कारखान्यात असायचा, पण आता तो आपण नौदलात जातोय हे आईवडिलांना सांगायला आला होता. आईनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो काहीच ऐकत नव्हता. बाबांनी कोजीला त्याच्या नौदलातून हात-पाय गमावून आलेल्या चुलतभावाचा विचार करायला सांगीतलं.
"कोज़ी, माझ ऐक!" बाबा म्हणाले " युद्धात सहभागी व्हायला शौर्य लागतं हे फक्त मुर्खाला वाटत, पण खरं शौर्य लागतं ते स्वत:च्या आणि दुस-याच्या आयुष्याची पर्वा करायला. ह्या निरर्थक युद्धात मी तुझा बळी जाऊ देणार नाही".
"नाही. मी नौदलात भरती होणारच. मला आता "पळपुटा", "गद्दार" हे ऐकून घेणं सहन होत नाहीये." मग त्यानी आईवडिलांना सांगीतलं की त्याने नौदलात जायचं का ठरवलं. त्याच्या कारखान्यात एक स्फोट झाला होता आणि त्याच्यावर संशयित असल्याचा आरोप करण्यात आला. एका पोलिसाने त्याला अटक केली आणि त्याच्याकडून कबूलीजवाब मिळवायला त्याला बेदम मारहाण केली.
"तुझा बाप देशद्रोही आहे आणि तुझ्यात तेच गद्दाराचं रक्त आहे. तूच हा दारुगोळ्याचा कारखाना बंद पाडायचा प्रयत्न केलास."- पोलीस कोजीला म्हणाला.

नंतर त्यांना कळलं की short circuit मुळे तो स्फोट झाला होता.पण आपल्या निर्दोष असण्याचा हा पुरावाही, कोजीचा नौदलात जाण्याचा निर्णय बदलू शकला नाही. त्यानी लोकांना आपण देशद्रोही नसल्याचे शाबीत करुन दाखवायचे ठरवलं होतं. युद्धाच्या खाईतून मेडलांनी विभुषित होऊन परत येण्याचा त्याचा मानस होता. मग त्याच्या भावांना गावात ताठ मानेनं चालता आलं असतं.
कोजीचा नौदलात जायचा दिवस आला. आई, ऐको आणि दोन्ही भाऊ त्याला निरोप द्यायला स्टेशनवर गेले, पण शेजारपाजारुन कोणीही गेले नाही. बाबा घरी थांबले होते तरी आपलं काळीज फाटतयसं दु:ख त्यांना झालं होतं.
"हुर्रे! Three cheers for Koji "" त्याचे भाऊ ओरडले. आई आणि ऐको हुंदके देत होत्या.
हळुहळु त्यांचे आवाज मागे ठेऊन गाडी पुढे निघून गेली. आगगाडी स्टेशनपासून जरा दूर गेली, तसे कोजीने बाहेर पाहिले. Track च्या बाजूला बाबांना उभे पाहून कोजीला आश्चर्य वाटलं. आगगाडी पुढे जाऊ लागली तसं बाबांनी हात वर करुन आरोळी ठोकली. " Three Cheers. Hurrah for Koji Nakaoka . जिवंत परत ये बाळा".
"धन्यवाद बाबा"- कोजी म्हणाला.
गाडी दिसेनाशी होईपर्यंत बाबा पहात राहिले. त्यांचे डोळे पाण्यानी भरले होते.
क्रमश:

2 Comments:

  • At 6:14 am, Blogger Nandan said…

    kathaa changali rangate aahe, aani anuvaad suddha agadi sahaj zaalaay. Pudheel bhaganchyaa prateexet aahe.

     
  • At 7:44 am, Blogger Vishal Khapre said…

    Just Awesome...

     

Post a Comment

<< Home