Weltanschauung

Hi, These are my thoughts on things that matter to me..

Wednesday, November 22, 2006

शरदोत्सव जपान २००६

सेन्दाईत दाखल झालो. वाटेत शरदाच्या लाल पिवळ्या खुणा सगळीकडे भेटत होत्या. पण ऐन बहर ओसरुन आता भकास लाल, केशरी छटा दिसत होत्या. हे म्हणजे चांगल्या नाकी-डोळी निटस असणा-या नववधूचा, हळदकुंकवाच्या मळवटानी अंबाबाई अवतार झालेला असावा तसे. ऐन बहरातले फॉल कलर्स कसे लालचुटुक, किंवा पिवळेजर्द दिसतात ईथे- मग चढत्या भाजणीने भकास दिसायला सुरवात होते.

दाखल झालो तो चांगली कडाडुन थंडी होती. त्या पिसाट थंडीत सामानासकट वणवणत दुस-या दिवशीच्या guided टुरचा थांबा आधी बघावा, मग हॉटेल शोधून त्यात सामान टाकावे आणि मग मार्गस्थ व्हावे असा (आमच्या मते) सरळ साधा सोपा ईरादा होता. पण "अडचणींशिवाय होईल त्याला प्रवास म्हणू नये" हा बहिणाबाईंच्या "कशाले काय म्हणू नये" यातील एक clause राहून गेला असावा… त्याला अजून एक corollary आहे- सुरवातीलाच अडचणी आल्या की नंतरचा प्रवास सुखाचा होतो (किंवा अडचणींची सवय होते)! त्या न्यायाने, वाट चुकलो, थंडीत डोकं बधीर होईस्तोवर वणवणलो, त्या टुर कंपनीच्या हापिसच्या बरोब्बर उलट्या दिशेला जाऊन आलो, तिथल्या जपान्यानी कधी जन्मात आपण असला टुर-बिर ऐकला नाही हा अविर्भाव केल्यावर तत्क्षणी हाय न खाता, जपानी भाषेच्या चिंध्या करत- शेवटी एकदाचे ईष्टस्थळी कडमडलो ! दुस-या दिवशीच्या सहलीत नाव नोन्दवले आणि हॉटेलात सामान टाकून, फिरायला निघालो. वाटेत, रस्त्याच्या मधोमध असणा-या तिन पिवळ्याजर्द झाडांनी शारदोत्सवाची सलामी दिली आणि आतापर्यंतच्या शापाला उ:शाप मिळाला.


सेन्दाईहून ट्रेननी मात्सुशिमाला दाखल झालो. नुसती पायपीट करणे हा उद्देश होता. उद्याच्या टूर मध्ये तसा हाही परिसर दाखवणार होते,पण असल्या सहलीत फराफरा ओढत नेतात म्हणुन आपल्याआपण जरा रमतगमत परिसर फिरावा, फोटो काढावे आणि रात्रीची खास fall colors साठी केलेली रोषणाई पहावी असा कार्यक्रम होता.


आता पावलोपावली दिसणा-या लालपिवळ्या बहराने हृदयाचा ठाव घेतला होता.


मात्सुशिमा हा परिसर म्हणजे जपानमधील सर्वाधिक सुंदर ३ ठिकाणांपैकी. 260 छोट्या छोट्या बेटांचा नयनरम्य परिसर- बे ऐरियाची सहल उद्याच्या टूर मध्ये होती म्हणुन नुसतेच किना-यावर फिरत होतो. जरासे ऊन पडले होते, त्यात थंडी सुसह्य वाटत होती. आसपासच्या शेकड्यांनी असलेल्या पर्यटकात एकही भारतीय उपखंडातला चेहरा दिसत नव्हता. परिसर फारच देखणा. हळूहळू उन खात, फिरत,फोटो काढत चाललो होतो.

दुरवर एक सुंदर लाल रंगाचा पादचारी पूल दिसत होता. तो शोधत शोधत २ कि.मी पुढे चालत गेलो- मग एका माऊलीने सांगितले की तो तर मागेच गेला. पुन्हा मागे येऊन तो पूल शोधला, पैसे भरले आणि फुकुरुजिमा नावाच्या छोट्या बेटावर दाखल झालो. "गर्द सभोवती रान साजणी" होते, "पाय टाकून जळात बसला असला औदंबर" नव्हता तरी दुस्ररीच झाडं पाण्यात पाय टाकून बसली होती. अशा ठिकाणी मनावार दाटते, ती शांततेची साय अनुभवत होतो.

तेवढ्यात समोर एक वृक्षकविता अवतरली.. पिवळ्या, लाल रंगाच्या अद्भूत पिसा-यातल्या काळसर फांद्या तर हातावरच्या नाजूक धमन्यांच्या जाळ्यासारख्या दिसत होत्या. त्या एका झाडात fall colors चे सर्व सौंदर्य एकवटलं होतं. ईथून पुढे बरीच वर्ष ते झाड माझ्या मन:पटलावर राहिल.

पुढे एका वळणावर एक “तानुकी” (raccoon) आला. त्यानी एका जपानी बाईच्या जीन्सची चव चाखून पाहीली.. ती बाई पण धन्य होती.. शांतपणे कुत्र्याशी खेळावं तसे त्याला बाजूला करायला पहात होती. आसपासच्या साताठ लोकांनी लगेच मोबाईलच्या कॅमेरात ते दृष्यब्द्ध केले. ( हे एक जपानी लोकांचे वैशिष्ट्य आहे, यम जरी आला समोर ,तरी त्याला आधी मोबाईलमध्ल्या कॅमे-यात टिपून घेतील (रेड्यासकट)!)
मला तर साध्या कुत्र्याची सुद्धा भिती वाटते, तो तानूकी बघून माझं निसर्गप्रेम एकदम आटलं- आणि पुढे काय झालं ते पहायला न थांबता आम्ही शुरपणे पळ काढला.

परत पादचारी पुलावर येईस्तोवर दुपारच्या पावणेचार वाजता सुर्यास्त झाला.
बे जवळच्या वेटिंग रुम मध्ये पोचलो - आता ५.३० वाजायची वाट पहायची होती. रात्रीच्या रोषणाईसाठी. आतापर्यंत ६ एक तास अव्याहतपणे थंडीत फिरत होतो.जरा टेकलो तसे बरेच अवयव दुखायला लागल्याची जाणीव झाली.त्या अवस्थेत Hot Chocolate पण अमृततुल्य लागलं.

५.३० ला त्या उबदार Waiting Room मधून पाय ओढत, बाहेरच्या ३-५ डिग्री तापामानात. सेदारच्या जंगलात, झुईगांजी मंदिराच्या परिसरात कलात्मरित्या केलेली हिरवी रोषणाई पहात होतो. नवरा ट्रायपॉड लावून फोटो काढत होता. तिथेच तास गेला- आम्हाला येवढ्या थंडीत (तडफडत) फोटो काढताना पहायला एक जपानी आजी-आजोबा आले. आज्जी म्हणाली “तुम्ही एन्त्सुईन ला जा , तिथली रोषणाई इथल्यापेक्षा सुंदर आहे. तिथे काढा फोटो” एवढं म्हणुन आमच्या हातात १००० येन ची तिकीटं कोंबून ते गेले सुद्धा. मी ईतकी गोंधळले होते की तिचे आभार मानावे, पैसे विचारावे वगैरे काही सुचलं नाही. सुचलं तोपर्यंत ते लुप्त झाले होते.
आत एन्त्सुईन मध्ये गर्दीच गर्दी. Fall Colors ला उठाव यावा म्हणून जी रोषणाई केली होती ती केवळ अद्भूत होती. स्वर्ग कदाचीत असाच असावा असे भासवणारी- त्यात त्या डोळ्यातून पाणी काढणा-या बोच-या थंडीचाही सहभाग होता. तिच्या शिवाय, ईतके गूढ धुक्याचे वातावरण तयार झाले नसते. थंडीत फोटो काढून हात गारठले, दात वाजायला लागले, खालच्या जमीनीतली थंडी आता पादत्राण भेदून पायात शिरत होती,पण हौस नावाची गोष्टच अजब असते.

त्या लाल, हिरव्या, पिवळ्या रोषणाईत भूल पडल्यासारखं झालं होतं.त्यातच एक माणूस त्यांनी, संपूर्ण पारंपारिक पोषाखात पावा वाजवायला ठेवला होता. पाईड्पाईपर च्या मागे मुलं जावीत तसे सगळे चालले होते.त्यातच नव-याच्या ट्रायपोडच काहीतरी पडलं, कॅमेरा पडला नाही हे बघून जीवात जीव आला.

शेवटचा टप्पा आला होता, आणि एकदम जे समोर आलं त्यानी विस्फारलेले डोळे पुढची १५ मिनीट तसेच होते. तळ्याकाठ्च्या झाडांवर प्रकाशझोत आणि खाली पडलेलं तळ्यातलं प्रतिबिंब- वर आकाशात एकही चांदणी दिसत नव्हती, दिक्काल धुक्यात हरवलेले काही क्षण ! दिव्यांचा प्रकाश ईतक्या खुबीने टाकला होता की- ३ झाडांची तिन प्रतिबिंब , तळ्यात अप्रतिम दिसत होती. एक हिरव्या पानांचं झाड डावीकडे, मधला विशाल वठलेला,एकही पान नसलेला भुताटकीचा वृक्ष आणि उजवीकडे शारदोत्सवाचे प्रतिक असलेले पिवळ्या लाल पानांचे झाड.. तिथेच तळ्याकाठी पावा वाजवणारा तो पूर्ण पारंपारिक पोषाखातला वादक-.. त्याक्षणी काय वाटले ते शब्दातीत आहे. ते तळ्यातलं प्रतिबिंब पाहून “प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर" असल्याची साक्ष पटत होती. दुर्दैवाने ट्रायपॉडने दगा दिल्याने पुढचे फोटो रात्रीच्या अंधारात येणे अशक्य होते.

५ वेळा तरी आम्ही exit पाशी येऊन, परत एकदा ते पहायला मागे गेलो. बाहेर पडलो ते गोठूनच, आणि ट्रेनची वेळ साधायलाच.. ट्रेनमधल्या उबेत विसावल्यावर Defrost होतोयसं वाटल.

पहिला दिवस सुफळ संपूर्ण.

10 Comments:

  • At 9:37 pm, Blogger Vishal K said…

    वा! छायाचित्रांना चांगलं म्हणू की वर्णनाला. दोन्हीही सुरेखच!

    "हे एक जपानी लोकांचे वैशिष्ट्य आहे, यम जरी आला समोर ,तरी त्याला आधी मोबाईलमध्ल्या कॅमे-यात टिपून घेतील (रेड्यासकट)!)" हाहाहा. सहीच.

    "प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर" हे ही खरं.

    एन्त्सुईन ईकीताईना...

     
  • At 11:14 pm, Blogger Sumedha said…

    छान लेख, आणि अर्थात छायाचित्रंही!

     
  • At 1:35 pm, Blogger Manjiri said…

    फोटो आणि वर्णन छान जमलंय. जंत्री न होता रोचक होइल असं आपल्या प्रवासाचं वर्णन करणं ही एक कला नाही? मस्त जमलंय! Keep it up!

     
  • At 1:41 pm, Blogger Manjiri said…

    आणि एक NitPick! Hope you dont mind!
    Heading माझ्या मते "शरदोत्सव" असे हवे. म्हणजे शरद उत्सव. "शारदोत्सव" हा शारदेचा उत्सव झाला. अर्थात तुझं उत्तम लेखन हा एका अर्थानं शारदोत्सवच आहे आमच्यासाठी!

    cheers!

     
  • At 2:52 pm, Blogger Anand Sarolkar said…

    Wonderfully written!!! :-)

     
  • At 6:08 pm, Blogger Nandan said…

    aahaa! lekh aaNi chhaayachitre donhi apratim. MarDhekaranchyaa kavitaa-sangrahaache "Shishiragam" he naav suddhaa chhaan vaaTel yaa lekhaalaa.

     
  • At 9:38 am, Blogger प्रिया said…

    wow! lekh aaNi photographs donhee surekh! :-) MB varachee Raina kaa ga?

     
  • At 3:18 pm, Blogger Shimajiro said…

    Fantastic Photos!! Ani lekh hi chan ahe. Hope you don't mind if I add your blog on my bloglist!! .....

     
  • At 2:29 pm, Blogger HAREKRISHNAJI said…

    So well you write. I wished I could also write like that

    Raag Madhuvnti

    Aayi Chandani Raat Sharadki

     
  • At 1:58 pm, Anonymous Anonymous said…

    लिहीलंय तर छानच, पण छायाचित्रंही अप्रतिम आहेत! दुग्धशर्करा!!

     

Post a Comment

<< Home