Weltanschauung

Hi, These are my thoughts on things that matter to me..

Sunday, August 20, 2006

तोंडओळख..

गंमत आहे- जपानला पर्यटक म्हणून/ किंवा कामानिमीत्त थोडे दिवस आलात तर जपानच्या शिस्तबद्धतेने आणि सौंदर्याने मोहीत व्हाल, क्वचितप्रसंगी स्तिमीत व्हाल! पण काही कामानिमीत्त ४-५ महिने किंवा वर्ष रहायला आलात तर मात्र अगदी सुरवातीला न-वैतागलेला-माणूस विरळाच. जपानला येऊन जपानी न येणे हे म्हणजे इंग्रजी न येता व-हाड घेउन लंडनला जाण्यासारखं. जपान मध्ये (नवीन)आलेल्याला आणि जपानी न येणा-याला "आपण निरक्षर आहोत" हे ठायी ठायी जाणवते. त्यातून शाकाहारी म्हणजे तर काय वर्णावे... सगळं अभक्ष्य काढून उरलेल खायला द्याल का ? हे जपानीत विचारायला माणूस शिकला, की निरक्षराचा धुळपाटीवर श्रीगणेशा गिरवून झाला म्हणून निश्वास टाकावा. पुढे तो निरक्षर, शिकून बालिष्टर होणार, की ढकलपास होऊन जेमतेम कुठलीतरी पदवी पदरात पाडुन कुठेतरी चिकटणार, हे कोणी सांगावे ?
हा देश आणि ही संस्कृती melting pot किंवा salad bowl नाहीये. इथे तुम्ही वेगळे आहात आणि वेगळेच राहणार आहात हे लपवायचा अभिनवेश ही नाही.. हे मुलभूत का काय ते तत्व एकदा मान्य केलंत तर प्रवास सुखकर होईल. आणि तरीही वंशभेदाची जाळपोळ ईथे नाही.. असूया/भेदभाव किंवा अन्याय नाहीच असे कसे म्हणू? आणि तरीही एकीकडे liberty, equality, fraternity च्या गप्पा मारणा-या आणि दुसरीकडे केवळ वंशभेदामुळे वित्त आणि जिवीत हानी होत असणा-या देशांसारखा हा देश नाही.
ते तुम्हाला तोंड भरुन "या बसा" म्हणणार नाहीत की घरी येण्याचं आमंत्रण सहजी देणार नाहीत- पण तुमच्या जीवावर उठणार नाहीत. अंधूक, जाणवेल - न जाणवेल इतपत वंशभेद जगात कुठेही आढळेलच- पण जपान मध्ये त्याचे स्वरुप "सबवेत जर अनेक जागा रिकाम्या असतील तर तुमच्याच शेजारची रिकामी जागा सर्वात शेवटी भरेल" इतपत! "गायजीन" (foreigner) हा शब्द तुम्ही या भूमीवर पाय ठेवल्यापासून तुमची सतत निष्ठेने सोबत करेल..
देशाबाहेर परदेशी म्हणून गणलं जाणे आणि देशात अमुक तमुक जातीचा, अमुक पोटजातीचा, तमुक धर्माचा, अ आर्थिक परिस्थितीचा, ब शैक्षणीक पातळीचा म्हणुन- पाहता क्षणीच गणले जाणे.. ! एकुण एकच.
वरलिया रंगा भुललासी !

3 Comments:

  • At 1:16 pm, Blogger Gayatri said…

    मार्मिक आहे विवेचन. लेख आवडला :)

     
  • At 2:09 pm, Blogger Vishal K said…

    गायत्रीशी सहमत. छान लेख.
    "इथे तुम्ही वेगळे आहात आणि वेगळेच राहणार आहात हे लपवायचा अभिनवेश ही नाही..","सबवेत जर अनेक जागा रिकाम्या असतील तर तुमच्याच शेजारची रिकामी जागा सर्वात शेवटी भरेल"
    मोजक्याच शब्दात सगळं काही सांगून जातात.

     
  • At 7:54 pm, Blogger Anand Sarolkar said…

    Nice one...

    can you tell me how to blog in marathi?

     

Post a Comment

<< Home