Weltanschauung

Hi, These are my thoughts on things that matter to me..

Friday, July 07, 2006

रजनील ओकिनावा- भाग २


ओकिनावातल्या रिसॉर्टमधल्या खोलीतून सतत दिसणारे कातळ. सुंदर हरिणमणी रंगाचा नितळ समुद्र,क्षितीजी आलेले भरते, आणि कुणीतरी मुद्दाम ठेवल्यासारखे ते दोन कातळ..



हॉटेलात जाताना रस्त्यावर गंमत बघत होतो- रस्त्यावर चक्क सुसाट धावणा-या गाड्यांची भाउगर्दी पाहिली आणि वाटलं- हे- हे ओकिनावा आहे? गाड्याच पाहायच्या होत्या तर तोक्योत काय वाईट होत?
निकोलस म्हणाला- अगबाई हे विमानतळाभोवतीचे नाहा शहर आहे.. आत्ता आपण नाहाच्या बाहेर पडलो की बघत राहशील ओकिनावाचे सौंदर्य.
वाटेत सर्व जण जेवायला थांबलो. हॉटेल अगदी जपानी. परत एकदा माझ्या वेगळ्या शाकाहारी ऑर्डरची शहानिशा झाली- मासे चालतील का? एबि (Shrimp) चालेल का- अमुक आणि तमुक.... जपानात शाकाहारी जेवण मागवताना नेहमी जी फरफट होते तीच ईथेही.. नव-याने अगोदरच तंबी दिली होती- तिथे तरी जे मिळेल ते खा.. नेहमीची नाटकं नकोत..आता त्यानी खांदे उडवत "का SSSही -खरं- नाही- तुझं type चेहरा केला.."
समोर आलेलं ते रक्त आटवुन मागवलेलं अन्न आलं एकदाचं - मासे बिसे काढुन टाकलेला "सोबा" त्या बाईनी आणला.. तिच्या चेह-यावरचं कुतुहुल हे इथे सगळीकडेच बघायला मिळत असल्यामुळे सवयीचे होते. जपानमध्ये उपहारगृहात जेवताना माझा चेहरा नेहमीच फुकटात वारावर जेवत असल्यासारखा अपराधी होतो.. (वट्ट पैसे टिकवून सुद्धा) याचं कारण तोंडाची भयंकर वाफ दवडुन शाकाहारी म्हणजे काय हे सांगत जेवण मागवायला लागते.. लोकांकडे जेवायला गेल्यावर मीठ जरी हवं असलं तरी न मागण्याचा भिडस्त स्वभाव- आणि हे असले मिनतवारिने मागवलेलं शाकाहरी जेवण.'सुमिमासेन" (माफ करा) असं म्हणल्यावरच (ते खास मागवलेलं राजेशाही थाटाचे) सर्व काढलेलं जेवण माझ्या घशाखाली उतरतं.

जेवण झाल्यावर परत हॉटेलच्या पथाला लागलो. नाहा शहर सोडेपर्यंत ठायी ठायी इंग्रजी पाट्या पाहुन डोळे ठेचकाळायला होत होतं. नेहमी अगम्य कांज्या पहायची सवय डोळयांना- ती मोडल्यासारखी झाली..
अमेरिकेच्या पाउलखुणा जाणवत होत्या. २ महायुद्धाच्या वेळेस १९४५ मध्ये अमेरिकेने ओकिनावा व्यापले होते ते १९७२ मध्ये जपानला परत मिळाले- पण अजुनही ओकिनावात अमेरिकेचे Naval base आहेच.
गाडीतही अमेरीकेचे Armed Forces Radio Station ऐकायला मिळत होते.

नाहा सोडलं आणि जी हिरवीनिळाई दिसायला लागली ती अद्भुत होती. डोळे निवले- ओकीनावा पावलं - असे वाटायला लागले.. हॉटेल ही अगदी सुरेख होते. जुन्या Spanish Villa सारखे बांधले होते- तोक्योत कधीही न दिसणारं ऐसपैस बांधकाम... खोलीत सामान टाकलं आणि बाल्कनितून आयुष्यात आधी कधीही न पाहिलेला रजनील समुद्र दिसला. वरचं आकाश राखाडी आणि कधीही द्रवेल असं वाटणारं आणि खाली मात्र नितळ, सुंदर, पाचुला लाजवणा-या रंगाचा स्वयंप्रकाशीत समुद्र. असं वाटत होतं की आता ह्या समुद्राचीच आभा उलट आकाशाचा राखाडी रंग पळवुन लावेल. डोळे भरुन पाहिस्तोवर घन घन माला नभी दाटल्या कोसळल्या धारा......

2 Comments:

  • At 3:45 pm, Blogger Vishal K said…

    छायाचित्रं आणि वर्णन दोन्ही अप्रतिम!
    लेख वाचताना खरंच तुमचा हेवा वाटला. जपानमध्ये असेपर्यंत एकदा तरी ओकीनावाला भेट द्यायचीच असा निश्चय केलाय खरा. पण अजून विद्यार्थीदशेत असल्यामुळं ट्रिपच्या खर्चाचे आकडे पाहिल्यावर आणखी थोडे पैसे टाकून भारतात महिनाभर जाणं परवडलं अशी मनाची समजूत घालावी लागते. पण आता मात्र हा लेख वाचल्यापासून धीर सुटत चाललाय.

    ओकीनावाचं संगीत ऐकण्याची संधी मिळाली का?

     
  • At 5:16 pm, Blogger Raina said…

    धन्यवाद विशाल !
    आम्हालाही बरीच वर्ष ओकिनावा आणि होक्काईदोचे युकीमात्सुरी पाहायची इच्छा होती. ओकिनावा झाले-आणि आता युकीमात्सुरी झाले की जपान "घडलं" असे म्हणायला हरकत नाही.

    खरं आहे- ओकिनावा ट्रिप चे खर्चाचे आकडे पाहिल्यावर जायचा सहजी धीर होत नाही- पण एक सुचवू का? नव-याच्या ऑफीसमधला एक जण ऑफ सिझन डिल मिळवून- विमानभाडं + राहणे- ४०,००० येन मध्ये असा गेला होता. ऐन जानेवारीच्या थंडीत.. तसे करायला हरकत नाही. फक्त पोहता येणार नाही जास्तं- पाणी गार असेल कदाचीत.. ही मी ऐकलेली सर्वात स्वस्त डिल.

    ओकीनावाचे संगीत ??नाही.. काही माहिती पण नव्हत- काही विशेष असत का ओकीनावाच्या संगीतात? हॉटेल मध्ये होतं काहीतरी चालू- पण फार काय आवर्जून ऐकावं असं नव्हतं.

     

Post a Comment

<< Home