Weltanschauung

Hi, These are my thoughts on things that matter to me..

Tuesday, September 05, 2006

भावनेला येवू दे गा....

झोपेनी असहकार पुकारला होता. म्हणून ८ * २ फुटांच्या, खास जपानी घरांच्याच असू शकतील अशा छोट्याशा गॅलरीत आम्ही दोघं बसलो होतो. ती गॅलरी ईतकी अरुंद आहे, की मी थोडी जाड झाले तर मला तिरकं होऊन कपडे वाळत घालायला लागेल. असो. तर त्या एवंगुणविशीष्ट गॅलरीत आम्ही रात्रीच्या २ वाजता बसून होतो. कधी नव्हे ते, ऐन उन्हाळ्यातली ती एक थंड रात्र होती. कुठल्याही कंपन्यांचे वातानुकुलीत यंत्र झक मारेल अशी हवा सुटली होती. अशा वेळेला, बालपणी रात्री गच्चीत झोपण्याच्या कार्यक्रमाची आठवण येणे अपरिहार्यच. नवरा विदर्भातला असल्यामुळे त्यांच्याकडे दर उन्हाळ्यात हा कार्यक्रम असायचा. आम्ही पुण्यात फार क्वचित कधीतरी गच्चीवर झोपलो असू- पण नागपूरला मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत गच्चीवर झोपल्याच्या आठवणी माझ्यादेखील आहेत. असो.
तर इथले आकाश काही आपल्यासारखे नाही, आणि इथला कावळा मेला कावळ्याच्या जातीला शोभेलसा ओरडत नाही ही माझी लाडकी तक्रार... आता, इथले आकाश आपल्याईथल्यासारखे नाही- हे मला प्रामाणिकपणे वाटायचे- कारण (औषधाला ही) चांदणे दिसत नाही. तर हे नेहमीचे पेटंट वाक्य मी टाकले- तेव्हा नवरा म्हणाला- तुझे डोळे खराब आहेत- चष्मा लाउन ये जा.. अगं चांदण्या आहेत- पण अस्पष्ट दिसतात. नीट पाहिल्यास की दिसतील..

खरं आहे- आयुष्यात ब-याच गोष्टींना हे तत्व लागू पडते. त्यांच अस्तित्व असतंच, आपलेच डोळे खराब, किंवा पुर्वग्रहांची झापडं जबरदस्त- जे आहे आणि जसं आहे तसं पाहता येईल असा चष्मा हवाच. कधी स्पष्ट दिसावं म्हणून चष्मा लावावा आणि कधी चष्म्याचे झापड झालेलं असलं, तर तो उतरवून पहावा- चांदणे जरुर दिसेल !

कधी फार पराकोटिचा वैताग आला- आणि विशेषत: आपण इथे कुठे येऊन पडलो असे वाटायला लागले- की परत एकदा आपल्या irritants कडे डोळसपणे पहायला शिकायला हवे. हे शहाणपण सहजी येत नाहीच.. स्वत:ला अतोनात त्रास करुन घेतल्यानंतरच ही सदबुद्धी लाभते. कधी आपलंच मडकं कच्च असावं आणि धग लागल्याशिवाय त्त्यातून पक्क मडकं तयार होऊच नये हे विधीलिखीत असू शकतं.परदेशात राहताना विशेषत: हे तत्व आचरणात आणावे. त्यानी सगळे प्रश्न सुटतात असे नाही- पण ब-याचदा Kalidioscope फिरवला की जसे नवीन design दिसते, तसे होते. आपल्याला त्रास देणा-या गोष्टींकडे पाहण्याचा द्ष्टीकोण बदलत जातो- वादळ शमतेच असे नाही, पण काही प्रमाणात निश्चीत निवळते.
"भावनेला येवू दे गा
शास्त्रकाट्याची कसोटी "

3 Comments:

 • At 2:39 pm, Blogger Manjiri said…

  मस्त लिहलं आहेस ग!

  आकाश सगळीकडे वेगळंच असतं नाही? तुला महितेय, अमेरिकेतला चंद्र आपल्या चंद्र्कोरीसारखा आडवा नसुन C सारखा उभा असतो! जपानी चंद्र्सान कसे असतात? :)
  -मंजिरी

   
 • At 1:00 pm, Blogger Vishal said…

  एकूणच लेख छान आहे. शेवटचा परिच्छेद विशेष आवडला.

   
 • At 5:43 pm, Blogger callkd2 said…

  superb !!!

   

Post a Comment

<< Home