इजिप्तायन
पूर्वी १ (च) नविन पुस्तक हातात पडलं की वाटायचं " इससे मेरा क्या होगा"- पुस्तकं ही वाचण्यासाठी नसून खाण्यासाठी असतात ही सखराम गटण्या प्रमाणेच माझीही समजूत- फक्त अस्ताव्यस्त स्वभावामुळे गटण्याप्रमाणे प्रत्येक पुस्तकाचा पंचनामा करण्याइतकी शिस्त माझ्या अंगी नव्हती/ नाही..
आता जपान मध्ये वास्तव्याला असल्यापासून पुस्तकांचा भस्म्या रोग आटोक्यात येउन बिच्चारे वाचन डायेटवर आहे.. चांगलेच हडकलय.. दर भारतवारीत निवडक ३-४च पुस्तकं मावतील एवढीच २० किलो च्या कमाल सामान मर्यादेत जागा असते.. जयललिता बाईंच्या साड्यांपेक्षा जास्त पुस्तकं भारतात असताना होती. जयललिता बाईना कसा, इतक्या साड्या असल्यामुळे वर्षातले ३६५ दिवसात तीच साडी दुस-यांदा नेसायचा योग येत नसणार- तसेच मला कधी पुस्तकं कमी पडत आहेत, म्हणून आहेत तीच पुस्तकं पुरवून पुरवून वाचायची वेळ कधी आली नव्हती- ती वेळ जपानात आल्यावर आली.
तर इथे जेव्हा आमच्याकडे जेवायला आलेल्या स्नेहींनी मीना प्रभूंचे "इजिप्तायन" भेट दिलं तेव्हा इतकं छान वाटलं. एव्हाना पूर्वीचा "१ से मेरा क्या होगा ?" हा माज जाउन, पुस्तकं काटकसरीने पूरवून पुरवून वाचायची सवय लागली होती.
खरचं इथे सगळ्याच वाचनप्रेमींची कमाल-सामान-मर्यादेने आबाळ होते.. त्यात मैत्रिणीने खास आठवण ठेवून आपल्याकडचे पुस्तक भेट दिल्याचा आनंद अवर्णनीय..
आता रोजचा त्याच "कशासाठी- पोटासाठी" चा ट्रेनप्रवास एकदम सुसह्य झाला.. पुस्तकाचे मुखपृष्ठ एकदम आकर्षक..खरं सांगायचे तर मराठी पुस्तकाला न शोभण्याइतकं.. आतली रंगीत चित्र ही सुरेख.. त्या चित्रांविना आणि मुखपृष्ठाविना पुस्तक खचितच एवढं आकर्षक दिसलं नसतं.हि-याला कोंदण शोभून दिसत होतं पण नाकापेक्षा मोती जड नव्हता.
आतला मजकूर निश्चितच त्या चित्रांना न्याय देत होता.
या आधी ब-याच वर्षांपूर्वी मीना प्रभूंचे "माझं लंडन" वाचलं होतं. त्यापेक्षा "इजिप्तायन" मधील लेखन जास्त रसाळ वाटलं. लेखनातला नवखेपणा आणि माहीतीवजा रुक्ष वर्णनं जाउन त्या "इजिप्तायन" मधल्या लेखनाला जास्त आपुलकीचा स्पर्श आणि ओघवता मोकळेपणा वाटला.. पानापानातून त्यांचा प्रवास तर अद्भुत वाटत होताच- पण त्या प्रवासतल्या "त्या" ही जागोजागी भेटत होत्या.
बाई ग्रेटच ! ३ महिने इस्राईल, जॉर्डन , इजिप्त मध्ये एकट्या भटकत होत्या. ही नुस्ती भटकंती नसून अभ्यासपूर्ण भटकंती होती.. त्यांचा बराच अभ्यास जाणवतो. म्हणुनच पुस्तकातला खरेपणा जाणवतो, आणि हा "आखो देखा हाल" भिडतो. इस्राईलच्या इग्लंड मधील दूतावासातल्या अजब अनुभवापासून पुस्तक सुरु होते- ते ईजिप्त मधल्या त्यांच्या वास्तव्याच्या शेवटच्या संध्याकाळी पाहिलेल्या एका Light and Sound Show नी इजिप्तायन ची सांगता होते. शेवट जरा तुटकच वाटला.
बाईंच्या वर्णनशैलीचे एक वैशिष्टय जाणवले ते -सगळीकडे दोन क्रियापदांचा जोडुन वापर- उदा- "बघतोयेसं वाटलं"..
त्यांचे अनुभव मनाला भिडतात- इस्राईल मधील दहशतीचे वाटावरण- बॉम्ब नी उध्वस्त झालेली पॅलस्टिनची सीमारेषा..ओस पडलेले जेरुसलेम आणि बेथेलहेम, इस्लाम/ख्रिश्चन/ज्यू धर्माची गुंफण, जॉर्डन मधील भव्य रोमन ऍम्फी थियेटर, पेट्राची सफर- जॉर्डन चे अश्मस्वप्न, मृत समुद्र, अकाबातील जलसृष्टी, इजिप्त- सायनाय,दाहाब, सुएझ कालवा,नाईलची सफर, लुक्सार, ऍलेक्झांड्रिया,ओऍसिस,कैरो, कैरोतला रमजान चा उत्सव, पिरॅमिडस, वस्तूसंग्रहालय..
त्यांनी जितका इजिप्त भरभरुन पाहिला त्याचे हे रसाळ वर्णन..
काळाच्या संकल्पनेइतक्याच जुन्या, ५००० वर्षांपासूनच्या पुरातन इजिप्त मधील ही मीना प्रभूंची भटकंती. बाई काय खमक्या असतील याचा प्रत्यय त्यांच्या सर्व ब-या वाईट अनुभवांमधून येतो.
वाचण्याजोगे "इजिप्तायन" !
ता.क. त्यांची एकंदरीतच वैश्विक भ्रमंती बघीतली की मला दर वेळेस वाटते- यांची सर्व पृथ्वी पाहून संपली तर काय करतील ? पुढलं पुस्तक लिहायला मग त्या कुठला देश निवडतील ?