Weltanschauung

Hi, These are my thoughts on things that matter to me..

Sunday, August 20, 2006

तोंडओळख..

गंमत आहे- जपानला पर्यटक म्हणून/ किंवा कामानिमीत्त थोडे दिवस आलात तर जपानच्या शिस्तबद्धतेने आणि सौंदर्याने मोहीत व्हाल, क्वचितप्रसंगी स्तिमीत व्हाल! पण काही कामानिमीत्त ४-५ महिने किंवा वर्ष रहायला आलात तर मात्र अगदी सुरवातीला न-वैतागलेला-माणूस विरळाच. जपानला येऊन जपानी न येणे हे म्हणजे इंग्रजी न येता व-हाड घेउन लंडनला जाण्यासारखं. जपान मध्ये (नवीन)आलेल्याला आणि जपानी न येणा-याला "आपण निरक्षर आहोत" हे ठायी ठायी जाणवते. त्यातून शाकाहारी म्हणजे तर काय वर्णावे... सगळं अभक्ष्य काढून उरलेल खायला द्याल का ? हे जपानीत विचारायला माणूस शिकला, की निरक्षराचा धुळपाटीवर श्रीगणेशा गिरवून झाला म्हणून निश्वास टाकावा. पुढे तो निरक्षर, शिकून बालिष्टर होणार, की ढकलपास होऊन जेमतेम कुठलीतरी पदवी पदरात पाडुन कुठेतरी चिकटणार, हे कोणी सांगावे ?
हा देश आणि ही संस्कृती melting pot किंवा salad bowl नाहीये. इथे तुम्ही वेगळे आहात आणि वेगळेच राहणार आहात हे लपवायचा अभिनवेश ही नाही.. हे मुलभूत का काय ते तत्व एकदा मान्य केलंत तर प्रवास सुखकर होईल. आणि तरीही वंशभेदाची जाळपोळ ईथे नाही.. असूया/भेदभाव किंवा अन्याय नाहीच असे कसे म्हणू? आणि तरीही एकीकडे liberty, equality, fraternity च्या गप्पा मारणा-या आणि दुसरीकडे केवळ वंशभेदामुळे वित्त आणि जिवीत हानी होत असणा-या देशांसारखा हा देश नाही.
ते तुम्हाला तोंड भरुन "या बसा" म्हणणार नाहीत की घरी येण्याचं आमंत्रण सहजी देणार नाहीत- पण तुमच्या जीवावर उठणार नाहीत. अंधूक, जाणवेल - न जाणवेल इतपत वंशभेद जगात कुठेही आढळेलच- पण जपान मध्ये त्याचे स्वरुप "सबवेत जर अनेक जागा रिकाम्या असतील तर तुमच्याच शेजारची रिकामी जागा सर्वात शेवटी भरेल" इतपत! "गायजीन" (foreigner) हा शब्द तुम्ही या भूमीवर पाय ठेवल्यापासून तुमची सतत निष्ठेने सोबत करेल..
देशाबाहेर परदेशी म्हणून गणलं जाणे आणि देशात अमुक तमुक जातीचा, अमुक पोटजातीचा, तमुक धर्माचा, अ आर्थिक परिस्थितीचा, ब शैक्षणीक पातळीचा म्हणुन- पाहता क्षणीच गणले जाणे.. ! एकुण एकच.
वरलिया रंगा भुललासी !

Tuesday, August 01, 2006

वडिलधा-या पायांना शताधिकांचे हात स्पर्शती

"माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही "
आज दुपारी, ऑफिस जवळच्या सिग्नलवर एका सायकलीवरची म्हातारी माझ्याकडे पाहून तोंड भरुन बोळकं पसरुन हसत होती.तिला ओळखायला जरा वेळच लागला- मग लक्षात आलं की- ही तर आमच्या हापिसची Cleaning Lady.ही आज्जी किती वर्षाची असेल ह्यावर आमच्या पैजा लागायच्या. शेवटी सगळ्यांचे "पासष्टीच्या आसपास नक्की आहे" हयावर एकमत झालं. एक दिवस एका सहका-याला तिचा खाली पडलेला रेल्वे पास सापडला- त्यावर तिचे वय होते- ७५ वर्ष ! आम्ही अवाक !७५ वर्षाची ही म्हातारी काय खुटखुटीत होती- सुबक खाशी ठेंगणी अशी ही खास जपानी म्हातारी- केसांचा सुरेख बॉब, कडक युनिफार्मात धाड धाड Vaccum Cleaner आपटत सफाई करत असते, आणि येणा-याजाणा-याशी गप्पा मारत असते. माझ्या मनातली ती "चल रे भोपळ्या टुणुक टुणुक" म्हणणारी बेरकी आज्जी तंतोतंत अशीच.

हापिसातल्या काही लोकांना ती खूप आपटत काम करते, म्हणुन तिचा राग येतो- मला मात्र ही म्हातारी जाम आवडते. तिच्या बोळकं पसरुन हसण्यामुळे तिच्या चेह-यावरच्या सुरकुत्या तर झळाळुन उठतातच पण आमच्या ही दिवसाला झिलई चढते.
या वयात ही बाई येवढं कष्टाचे काम लिलया करते. त्याचं वाईट तर वाटतच पण तिच्या विजिगीषेचे कौतुक ही वाटते.
ह्या जरठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस जपानमध्ये वाढतेच आहे. जवळजवळ २५% लोक पासष्टीच्या वरचे आहेत जपानमध्ये सध्या.
पुरुष सरासरी ७८ वर्ष आणि बायका सरासरी ८५ वर्षापर्यंत जगतात. सध्या जपानमध्ये शंभरी पार केलेले २३००० लोकं आहेत-सर्वात वयोवृद्ध ११४ वर्षांचा. ६०व्या वर्षी हे सेवानिवृत्त होतात आणि त्यानंतर सरासरी २० वर्ष जगतात. मग चरितार्थ चालवायला अशी कामं धरतात. सुरवातीला जपानमध्ये आले तर धक्का बसला होता- ईतके जख्ख म्हणावे असे म्हातारे अंगमेहनतीची कामं उपसताना बघून.

ट्रेनमध्येही तीच गोष्ट.पाठीचा कणा पूर्ण बाकदार होवून गुढघ्यापर्यंत वाकलेली म्हातारी, जेव्हा सबवेत भेटते तेव्हा ही आज्जी या वयात उभं राहून, एकटी ट्रेनमधुन प्रवास करते, ह्या दृष्यानी हेलावल्या शिवाय रहात नाही. जपानी लोकांना फारसं काही नसतं-कधी कधी जागा देतात उठून पण कधी कधी समोर अशी जर्राजर्जर झालेली, अस्थिपंजर झालेली म्हातारी उभी असताना देखील स्वत: खुशाल “युसेनसेकी” ( Priority Seats) वर बसून राहिलेली लोकं पाहिली की संताप येतो.
नव-याचा ट्रेनमधील-बसण्याची-जागा-योग जबरदस्त आहे. कुठुनही दमुन येत असताना ह्याला बसायला जागा मिळणे आणि समोर कुठलीही ७-८ दशकं पार केलेली आज्जीबाई त्याच्याच समोर येणे- हे नेहमीचे. मग उठुन जागा देणे अपरिहार्यच !

आसपासच्या अशा कित्ती पिकल्या पानांबद्दल सांगू ? उपनिर्दीष्ट cleaning lady , आमच्या बिल्डींगचा Caretaker बुढा, (देवा ! त्याच्या येण्यावरुन सकाळचे आठ वाजलेत, म्हणून खुशाल घड्याळ लावून घ्यावे !), पेपरवाला, शेजारपाजारच्या म्हाता-या आज्ज्या, जपानी सहका-यांचे आई-वडील किंवा सासूसासरे (माझी एक मैत्रिण होती.. तिची उमर अबतक ५६ आणि तिची आई ९० वर्षांची, कोबेचा भयानक भुकंप अनुभवलेली !),डिशवॉशर बसवून द्यायला आलेला फिटर, भाजीवाले! एक ना दोन. टॅक्सीचालक तर ईतके वृद्ध असतात कधी कधी की पोचेपर्यंत धास्ती वाटत राहते.

आमच्या शेजारची "मायेदा" आज्जी- ८५ तरी वर्षाची नक्की असेल. आताशा आज्जी खूप थकत चालल्याचे जाणवते. आत्ता आत्ता तिचे केस कापसासारखे पांढरे दिसतात- नाहीतर काही महिन्यांपुर्वीपर्यंत काळे कुळकुळीत डाय करायची. तिला त्या ११६ पाय-यांचा जिना चढता उतरताना पाहिलं की माझ्या पोटात तुटतं. होता होईल तो तिचं सामान उचलणे एवढेच मी करु शकते. एकटीच असते बिचारी- कधी लिफ्ट मध्ये, कधी त्या जिन्यावर, कधी कचरा टाकताना भेटते. मला वेळ असला की गप्पा मारते हवा पाण्याच्या.. आणि कधी मी सकाळच्या घाईत जिवाच्या आकांताने पळत ट्रेन गाठायला चाललेली असते, तेव्हा भेटली की न चुकता- “तु पुढे जा बाई, तुला घाई आहे” “इत्तेराश्शाई” म्हणणारी.. तिला “इत्तेकीमास” म्हणताना क्षणभर मला मी माझ्याच आज्जीला “येते गं” म्हणते आहे असे वाटते !
आमच्याकडे भाच्च्यांनी आल्यावर घर डोक्यावर घेतले मस्तीने. आम्ही मुकाट्याने शेजारच्या आज्जीला आणि खालच्या चिनी बाईला जाउन ‘ओमियागे” (भेट) देउन आलो- "थोडे दिवस आवाज होईल जास्त- मुलं लहान आहेत- मस्ती करतात, उड्या मारतात-जरा आवाजाचा त्रास होईल तुम्हाला" म्हणुन सांगून आलो. आमच्या बरोबर भाची पण होती. तिला बघून आज्जी अगदी खुलली-खेळायला ये म्हणाली.. मग नणंदेला म्हणाली “ह्या तुझ्या वहिनीच्या मागे भलती घाई असते. बिच्चारी कायम भेटते ती घाईघाईतच. “ तिच्याशी जरा शिळोप्याचा गप्पा मारल्या आणि घरी आलो.

अशा ह्या एकेक आज्ज्या ! काही ओळखीच्या काही सर्वस्वी अनोळखी. पाहिल्या की वाटते- ह्यांना दीर्घायुष्याचा वर आहे की अभिशाप ? त्या अश्वत्थामाच्या भळभळणा-या चिरवेदनेचा शाप आहे की भीष्माचार्यांचे अटळ भोग आहेत आणि उत्तरायणाचा इंतजार ? म्हातारपण येते म्हणजे ते रुपेरी, तृप्त संध्याराग आळवायसाठी, पैलतटीची आस लागली म्हणुन, जीवनाचा चहु अन्गानी आस्वाद घेउन झाला म्हणून, कालचक्राच्या न्यायाने- आले तर चांगले.. पण अतृप्त , एकाकी, विकारयुक्त, आणि विखारयुक्त परावलम्बी आणि अकाली, दीनवाणे म्हातारपणही येतेच. काही म्हातारे कोतारे प्रेमळ आणि आपुलकीची साय चेह-यावरुन सांडणारे..( ह्या जपानी लहान मुलांचे मिचमिचे डोळे जितके लोभस असतात, तेव्हढेच ह्या म्हाता-यांचे मिचमिचे डोळे लोभस असतात.) आणि काही म्हातारे तितकेच विक्षिप्त, दुसरं बालपण अनुभवताना अतोनात हट्टी आणि हेकेखोर झालेले. कधी भ्रमिष्ट, कधी जगभ्रराचा कडवटपणा अंगोपांगातून मिरवणारे, दिसेल त्यावर खेकसणारे("नंदा प्रधान" मधील एरंडेल डोक्यावर थापणारा म्हातारा उभा राहतो डोळ्यासमोर). आणि काही सर्वस्वी उदासीन- बोरकरांच्या "सुखा नाही चव, लव वठलेली आहे, दु:खा नाही भार, धार बोथटली आहे" ची आठवण करुन देणारे. व्यक्ती तितक्या प्रकृती हे तर खरेच पण आयुष्याचे भोग हे कुठेतरी खुणा ठेवतातच.. नाही का ?..........