फुलों की घाटी, हेमकुंड- नमनाला घडाभर...!
*ट्रेकर लोकांनी वाचून चिडचिड करुन घेऊ नये कृपया. ज्यांना ऊन, पाऊस, थंडी यातील काहीही माफकच सोसवते अशांपैकी एका नमुन्याचे हे 'सिव्हिलियन' मनोगत आहे. आधीच सांगत्ये. मागाहून तक्रार करु नये.
*आणि हो यात काहीही ग्रेट नाही, लोकं बेसकॅम्पलाच काय, शिखरावरही जाऊन येतात. ही नम्र (आणि बोचरी) जाणीव लिहीताना साथसोबत करते आहेच.
गेली चार तरी वर्षे मी नित्यनेमाने घाटीच्या ट्रेक्सच्या जाहिराती चवीने पाहते. या(ही)वर्षी न जमण्याची काही ना काही तजवीज लहान मूल, पावसाळी आजारपण, नोकरी, तब्येत, सुट्ट्या, खर्च, कंटाळा, भीती, inertia यातील एक किंवा सर्व घटक आपसूक करतात. यावर्षी कसे कोण जाणे, बर्याच प्रापंचिक अडचणी येऊनही, जमलेच. हाच एक मोठ्ठा धक्का. तो पचवून तयारीला लागले. नवीन जोड्यांचा सराव तब्बल एक दिवस चालून केला. त्याला शंभराने गुणले की जमलाच ट्रेक, असल्या गणिताने नक्की किती त्रास होईल याचा अदमास बांधला. मर्फीच्या नियमांनुसार आदल्या आठवड्यात माश्या मारायची वेळ आली होती, तो जायच्या आठवड्यात बरोब्बर कामाचे रान पेटले. प्रातःस्मरणीय मालिनीकाकू राजूरकर आठवल्या. त्यांच्या मुलाखतीत एकदा बाई आली नाही, अडचणी आल्या म्हणजे हमखास कार्यक्रम चांगला होणार असे वाचल्याचे (नेहमीच) स्मरते.
तयारी म्हणजे काय सांगावे महाराजा! कपड्यांपासून रेनकोटापर्यंत सर्व घेतले. कापूर (हुंगायला) वगैरे सर्व टिपा मायबोलीकर मैत्रिणींनी आठवणीने दिल्या. तीन चेकलिस्ट करुनही शेवटी विसरायचे ते रीतसर विसरलेच. रकसॅक भरताना वैतागले. एकतर त्यात दिवसाप्रमाणे काहीही भरता येत नाही. चार बोचकी भरुन आत कोंबणे (आणि बाहेर काढू शकणे) याला कौशल्य लागते. हँडबॅग घ्यावी असा (सिव्हीलियन) मोह झाला. नवरा बोंब मारत होता की सॅकच घे, पण ऐकले तर एवढ्या वर्षांच्या संसाराची बूज कोण राखेल, आँ?
मग फालतू प्रश्न विचारायची लाज गिळून ट्रेकलिडरना फोन केला. तो तिकडे बेशुद्ध पडला नसावा कारण उत्तर लगेच आले. त्या सोबत एक उसासा ऐकल्याची दुष्ट शंका अजूनही येते. श्री. ट्रेकलिडर म्हणले की 'अहो, शक्य असेल तर सॅक आणा. आपण खेचरांवर सामान लादतो. बॅगांच्या पट्ट्यांवर वजन पडून ते तुटतात' वगैरे. नवर्याने 'तरी मी सांगत होतो' वगैरे म्हणलेच. ते ऐकून न ऐकल्यासारखे करण्याचा दांडगा सराव कामी आला. नेहमी(च) येतो. त्या नतद्रष्ट सॅकमध्ये ती बोचकी भरली एकदाची. डोंगराएवढे सामान झाले. नवर्याच्या मते, घेतलेय त्यापेक्षा अर्धे सामान कमी करायला हवे होते !!!!! ते मौलिक मत पुन्हा कानाआड केले.
त्याआधी एखाद आठवडा SLR दे म्हणून भांडण केले. तो SLR मिळाला नाहीच. 'आधी तू एकदा धड जाऊन नीट आलीस, काहीही न हरवता, तर पुढच्या वर्षी देईन. तुला तो पेलवणार नाही तसाही चढताना.' हे उत्तर आले. (उत्तरात अगदीच तथ्य नाही, असे म्हणता येणार नाहीच, पण कबूल कशाला करायचे ते!) 'बस मग त्या कॅमेर्याला कवटाळून. तू आणि तुझा SLR खड्ड्यात जा.' वगैरे प्रेमळ संवाद उभय बाजूने म्हटले. (तात्पर्य, हे फोटो अप्रतिम सुंदर नाहीत याचे कारण डबडा पॉईंट अँड शूट कॅमेरा. नाहीतर पाहत राहिला असता. काय समजलात!)
दरम्यान सहट्रेकर्स आणि मायबोलीकर मैत्रिणी शैलजा आणि स्वाती यांच्याशी आपत्कालीन संभाषण सुरु होतेच. आता फक्त कपडे, रेनकोट, बूट, सॅक, कापूर, हातरुमाल, लाडू, ओडोमॉस, प्लॅस्टिकपिशव्या, चपला, पैसे आणि... एवढेच घ्यायचे राहिलेय..आणि हो.. चालायला सुरवात करायचीय गं! - असले महान विनोदी संवाद वारंवार झडत होते.
आपल्याला जमेल ना नक्की? घरी मुलगी राहील ना नीट? आधीच स्वतःसाठी अशी एक आत्यंतिक गरजेची नसलेली सुट्टी घेणे, त्यात आणि लहान मुलीला घरी ठेवून, म्हणजे अपराधीपणाचे कडवट, मुरलेले, उग्र लोणचे. 'अँटी-हिरकणी सिंड्रोम' इथपावेतो येडचॅपपणाची आणि स्वनिर्भत्सनेची मजल जाऊन पोचली. 'तू गेली असतीस?' असे कोणाही बाईला विचारण्याइतपत घोळ घातला. 'मी नसते जाऊ शकले, पण तू जा' अशी उत्तरे येऊ लागली तसा Guilt Quotient चा पारा उपकरण फुटेस्तोवर चढू लागला. पारा चढला की त्रास नुसता. घालमेलडॉटकॉम. मग नवरा तापमान उतरवण्याचे काम 'पेप टॉक' देऊन इमानेइतबारे करी. शेवटी त्याचा 'कोणाला काहीही विचारायची गरज नाही' हा सल्ला मानला. 'बाळ माझ्याशिवाय राहील ना नीट' ही दुधारी तलवार असते. दोन्ही बाजूने वेदना.
भरीस भर एक मित्र भेटला जीटॉकवर. म्हणे लेह-लदाखला चाललोय. साधारण त्याच तारखा. आणि सगळा आमचा PGचा ग्रुप, दहा जणांचा. याच प्राण्यांबरोबर शेवटचा ट्रेक साधारण एका तपापूर्वी केला होता.' गाढव!!! मला का नाही सांगितलेस? मला न सांगता तुम्ही जाताच कसे' अशी उभयपक्षी घमासान वादावादी झाली. उत्तर दोघांचेही सारखे. तंतोतंत. Word for word ! 'मला वाटले तू फारच संसारी आहेस, मुलीला/मुलांना सोडून येणार नाहीस अजिबात.' घ्या आता! दोन्ही बाजूंने तेच आरोप, त्या च शब्दात, आणि 'संसारी' ही एकच शिवी. दोघांनीही कप्पाळाला हात मारला, संसारीपणाचे दाखले देऊन देऊन दांडग्या उखाळ्यापाखाळ्या काढल्या. फार हळहळलो. काहीही बदल करणे ऐनवेळी कोणालाच शक्य नव्हते. असो. पण तेवढ्यात ग्रुपमधल्या मुलीही मुलं घरी ठेवून निघाल्या होत्या ते समजून काहीसे बरे वाटले.
प्रापंचिक अडचणी वगैरे सर्व शंकाकुशंका होत्याच. लेकीची भूणभूण सुरु होतीच की 'मीपण येणार. मी चालेन पायीपायी. तुला कडेवर नाही घ्यायला लावणार. भ्यॉऽऽ, भ्यॉऽऽ'
त्याच जोडीला हापिसने षटकार मारला. एक 'HK कॉल आहे, महत्वाचा, सोमवारी तो घेशील ना?'
कुठून? हिमालयातून? तिथे फोन नसतात - असे मी बिनधास्त ठोकून दिले.
मी तिकडून ओरडूनओरडून 'हॅलो, ऐकू येतंय ना नीट? हेऽ पहा, अजिबात हलू नकोस. हाँ, काय म्हणालास.., जोरात बोल जरा' असे ज्या चिन्याशी बोलेन तो ठार वेडा होईल 'रेंज' प्रकरण ऐकून. 'एकच कॉल आहे, अगं. सोमवारी तर आहे.' कधी नव्हे ते स्पष्ट नाही सांगितले. ते बरेच झाले एकूणात, कारण दिल्लीत प्रवेश करताच नेटवर्कने प्रथेनुसार दगा दिलाच.
दरम्यान मायबोलीवर इतक्या जणींनी शुभेच्छांचा पाऊस पाडला की अतिशय कानकोंडे वाटले. अजून जायचा पत्ता नाही, कधीही रद्द होऊ शकते त्यातली गत, आणि कधी न पाहिलेल्या लोकांकडून इतक्या शुभेच्छा आणि एवढे करुन जमलेच नाही तर लोकं काय म्हणतील हेही एक प्रेमाचे ओझे मानगुटीवर येऊन अलगद बसले. शर्मिला आणि आउटडोअर्स यांनी ट्रेकर्सची छोटीछोटी महत्त्वाची ऐहिक गुपिते शेअर केली, आणि अनुदोनने 'मजा कर पण मन गुंतवून येऊ नकोस' असा भारी उपयोगी सल्ला दिला. सावली आणि मृण्मयीने 'ती राहील, तू तुझे पहा' हा अमूल्य सल्ला दिला. जाऊ शकु याची खात्री नव्हती, आस तर अजिबात लावायची नव्हती त्यामुळे निर्लेपपणाचा कळस साधत चक्कं एकही ओळ वाचली नाही पूर्वतयारी म्हणून.
घरुन निघताना मात्र बाळाचा चेहरा एवढाऽसा चिमणीएवढा झाला होता तो पाहून अक्षरश: गलबलून आले. पाय पुढे टाकवेना. नको जाऊयात असे दहाहज्जार वेळा तरी वाटले. काहीतरी महत्त्वाचे काम निघावे आणि रद्द करावे लागावे असेही वाटून गेले. म्हणजे निर्णयाचे शिवधनुष्यही पेलायला नको.
पुण्याहून या दोघी आधी बसणार होत्या, अर्धा तास आधी फोन, स्वाती अजून आली नाहीये. अरे देवा!!! मग ती सापडली. मग तिचा फोन की 'आता आम्ही बसलोय, तू नक्की बस आता ट्रेनमध्ये'... ताण वाढून खोकला यायला लागला. हापिसात लोकं वैतागले. 'अगं, काय युद्धावर चाललीयेस की काय, होईल सर्व व्यवस्थित' वगैरे म्हणून धीर दिला.
डायवरसाहेबांनी रीतसर रस्ता चुकवून एकदाचे स्टेशनावर सोडले. त्यात आणि मलाच पुन्हा ऐकवले की 'होता है, हर रस्ता कैसे मालूम होगा?'. रागात मला 'आपणांस कुठलाच रस्ता ठाऊक नसतो, अमात्य !!' याचे हिंदी भाषांतर सुचले नाही म्हणून तो वाचला. आता पुढील काही दिवस अजिबात एकमेकांची तोंडे पहायला नको याचे आम्हा दोघांनाही फार फार बरे वाटले. एकदाची ट्रेनमध्ये बसले आणि अर्ध्या तासात वैतरणेचे कॉफीरंगाचे कॉफीइतकेच दाट असावे असे वाटणारे पाणी भरभरून वाहताना पाहिले. दारात जाऊन उभे राहिले. वैतरणेत निळ्या रंगाची होडी. एकटीच. त्यात इग्रेट तालेवार बसलेला. जीव त्या जवळ नसलेल्या SLR साठी अस्सा तळमळला की क्या बताऊं! दार उघडून तिथे उभं राहून हवा खाल्ली. अधिकृत प्रवास सुरू झाला म्हणायचा! राजधानीच्या सेवकाशी पंढरीची वारी, वैतरणेचे पाणी आणि राजधानी वेळेवर कशी पोचते यावर गप्पा कुटल्या. सहप्रवासी मुलगी आणि तिची कथाही फार मस्त होती. तिच्याशी सगळ्या अलम दुनियेच्या गप्पा मारल्या. बोलता बोलता तिने सहज 'लग्न करु की नको, तुला काय वाटते' असे विचारले. कोणी मत विचारले की पंचाईत होते. खरे बोलावे तर लोकं बिचकतात. खोटं बोलवत नाही. 'नरो वा कुंजरो वा' सल्ल्यांची स्क्रिप्ट तयार असते तशी हल्ली वयानुरूप, पण वापरत नाही सहसा. पण मग उत्तर काय द्यावे? हल्ली असे वाटते की खरेच उत्तर द्यावे, लोकांना समजत नाहीच. लोकांनाच का? मलाही समजले नसतेच. सांगूनही समजत नाही अशा अनेक गोष्टींपैकी ही एक महत्त्वाची.
रात्री बराच वेळ 'हिंदू' वाचली. डोके दुखायला लागले. ती घेऊन जाणे हा महामूर्खपणा क्रमांक २ होता, कारण ती हार्डबाऊंड आहे. जागा व्यापते. (वजनी आणि आशयानेही)जड आहे आणि ती वाचायला डोके बर्यापैकी ठिकाणावर लागते. म्हणजे प्रवासात कटाप. पण एवढी अक्कल मला असती तर सामान कमी झाले नसते का? मध्येच लेकीची आठवण यायला लागली. तेवढ्यात एका मित्राचा SMS. 'आपल्या वर्गातील आम्ही चौघं भेटतोय, जेवायला येणारेस का उद्या? अमकीतमकीलाही विचार' मी उलट टपाली येऊ शकत नसल्याचे कळवले. उत्तर आले. 'Gr8. Try not to stomp on the flowers'. लै हसले. मग त्या अमकीतमकीचे उत्तर, 'कोण कोण येणारे?' 'माहित नाही.. त्यालाच विचार.' 'त्याचा नंबर दे. मग हिचा दे, मग तिचा दे..' काय नमुने आहेत रे देवा एकेक! महिनोन्महिने भेटत नाहीत गधडे आणि मी नसतानाच नेमके यांना भेटायचे असते. गाडीत रात्री उशीरापर्यंत एक माणूस सतत फोनवर खोटे बोलत होता पैसे उकळायला. मी दिल्लीत आहे असे सांगून. त्याचे संभाषण फारच उद्बोधक आणि संतापजनक होते. तसेच पाचेक वर्षाचा एक छोटा अतरंगी मुलगा भोकाड पसरुन रडत बसला चांगला साडेबारापर्यंत. उगाचच. त्याच्या बापाने संयम सुटून त्याला बखोटीला मारले आणि आता तुला गाडीतून खालीच टाकतो म्हणाला. बराच तमाशा सुरु होता.
सकाळी दिल्लीत उतरले. नेटवर्क गायब. मग रिक्षावाल्याने रीतसर जास्त पैसे घेऊन वगैरे दिल्लीची योग्य चुणूक दाखवून योग्य जागी पोचते केले. छोट्या सॅकच्या चेन तुटल्या तेवढ्यात, तिने आऽऽ वासला. म्हणजे एवढ्या घाईत ते घेणे आले आता. चडफडडॉटकॉम. मायबोलीकर अल्पना आणि कुटुंबियांनी खूप अगत्याने स्वागत केले. त्यांचे आभार मानावे तितके थोडे आहे. फार छान वाटले. त्यांच्या घरात आम्ही हाऽऽ एवढा पसाऽरा केला सामान रचून. आयाम भलताच गोड आहे. अल्पनाने सॅकच्या चेन्स लावून आणवायचे खूप मोठ्ठे काम केले. पहिलाच दिवस. आंघोळ करायला मिळाली. त्यामुळे सिव्हीलियन जीव सुखावला. पोटभर गप्पा मारल्या, खाल्ले आणि स्टेशनवर जिथे भेटायचे ठरले होते तिथे अल्पनाकृपेने पोचलो. पब्लिकने आम्हाला आणि आम्ही पब्लिकला पाहून घेतले. एकेक जण येत होता, धपाधप सॅकची पोती येउन आदळत होती. नुसत्या सामानावरून कोण नवखे ते लगेच ओळखायला येत होते. प्रत्येकाच्या हातातील कॅमेरे पाहत होते. एखाददोनच SLR दिसले. हुश्श्य!! औपचारिक ओळख झाली. बहुतेकांचा पहिलाच हिमालय ट्रेक होता. लीडरसाह्येबांनी 'पाणी विकत घ्यायची गरज नाही, गंगेचे पाणी थंडगार सुरेख असते, ते प्या आणि प्लॅस्टिक वाचवा' असे सांगितले, ते ऐकूनच मी मनातल्या मनात त्याला फुल्ल मार्क दिले आणि निदान छान ग्रुप निवडला याचे हुश्श्य केले !
मग वरात सामान घेऊन पल्याड असलेल्या स्टेशनापात्तुर निघाली. सात मिनिटांच्या रस्त्यात जिने चढून, सामान वाहून दम निघाला. हरिद्वारला जाणार्या गाडीची वाट पाहत होतो. समोरून दरभंगा एक्सप्रेस गेली. त्यातली जनता पाहून आणि दोन डब्यांमधील खबदाडात प्रवास करणारे जय-वीरू पाहून पुन्हा एकदा स्वदेशाची जाणीव असोशीने झाली. निळ्या डब्यांमधील काळपट बेदरकार चेहरे, मातकट पिवळसर कपडे, पगड्या, फेटे, लालपिवळेहिरवेनिळे घुंघट, लगबग, लगबग आणि कमालीची दाटीवाटीने कोंबलेली माणसे. Grotesque meets beautiful असे नेहमी वाटते. व्हॅन गॉफने ही मानवी सूर्यफुलांची शेते पहायला हवी होती. सगळे रंग सुटे विलग फर्र डोळ्यासमोरून गेले....
दिल्ली ते हरिद्वार लहलहाती शेते पाहून गारगार वाटले. हिरवेपिवळे माळ, त्यावर निवांत चरणार्या गायीम्हशी, त्यांच्या भोवती पिंगा घालणारे पांढरट पिवळे कॅटल इग्रेटस, विजेच्या तारांवर काळेभोर ड्रोंगो आणि नेहमी दिसणारे इतर पक्षी दिसले भरपूर. शहराची पुटे निवळू लागली.
हरिद्वार स्टेशनाबाहेर पथार्या पसरलेले निदान शंभरदीडशे यात्रेकरू. दोन बायका मिळून हाताने भडक्क रंगाच्या साड्या वाळवणे सुरू होते. खाली ते रंगाचे फलकारे काहीश्या अंधारातही दिसत होते आणि वर स्टेशनाच्या इमारतीच्या टॉवरसदृश घुमटात दिवे लागले होते. कितीही मुशाफिरी आव आणला तरी मी असे स्टेशनावर कधी आयुष्य वाळवू शकेन असे वाटत नाही.
तिथून छोट्या बसमधून हृषिकेश. रस्त्यात गंगेचे घाट दिसले दुरून. I thought I did'nt have a religious bone in my body. I was wrong. Unfortunate, but true ! नदीत तरंगते फडफडते नाजूक दिवे, भजनांच्या ललकार्या, घंटानाद,खळाळत्या गंगेची अद्भूत गाज, तुंबलेली वाहतूक, प्रचंड उकाडा. राजाजी राष्ट्रीय उद्यान आणि ‘जंगली हत्तींच्या कळपापासून सावध रहा’चे फलक. जंगलाचा वास यायला लागला. माहौल चढायला लागला. शेवटी एका मोठ्ठा चौक आत असलेल्या जागी आम्ही राहिलो. किती मोठा चौक होता माहितीये? 'ये गलियाँ ये चौबारा' मधल्या चौकाएवढा. कोणाची तरी कोठी असणार ती नक्की. तिथे गढवालचा नकाशा भिंतीवर लावला होता. फुलोंकी घाटी नकाशावर पाहिले आणि तिथे फुलदाणीत ठेवलेल्या गावठी फुलांचा वास असे एकत्रित मळमळायला लागले. पाऽर दुसरे टोक होते फुलोंकी घाटी. कुठलाही नकाशा पाहिला की आपण नक्की कुठे आहोत हेच शोधायला फार वेळ लागतो. नेहमीचे आहे. आणि मग तो नकाशा मोठ्ठ्या नकाशात (आणि मग पृथ्वीत) कुठे बसतो हेही..
(साभार: आंतरजाल)
जेवणे आटपली. हसत खेळत ओळखी वाढवत. जेवणाची गंमतच झाली. 'छे! अजिबात भूक नाही, भूक नाही' अशी सुरवात करत, शेवटपर्यंत ज्या काय ऑर्डरी सटासट जात होत्या त्याने वेटरसाहेब वैतागले. त्याच्या चेहर्यावर 'अजून हवंच आहे का?' असले भाव तरळायला लागले. इथपासून जे हसणे खिदळणे सुरु झाले ते शेवटपर्यंत. ग्रुप छान असल्याची खात्री पटली. मनावरचा ताण हलका झाला.
दुसर्या दिवशी सकाळी ६ ला निघायचे (म्हणजे साडेचार-पाचला उठायचे. तिघींचे आवरायला तेवढा वेळ लागतोच) अशी सूचना मिळाली. सगळी विद्युतउपकरणे चार्ज करणे हे महाकंटाळवाणे काम आठवणीने केले आळीपाळीने. नळातून येणारे गरम पाणी तिथे मिळाले ते शेवटचे.
पहिले दोन दिवस लांबलचक वाटले.
मुशोसाठी आभार : ललिता_प्रीति
क्रमश: