The Music Room – Namita Devidayal
द म्युझिक रुम- नमिता देविदयाल
नमिता देविदयाल- यांचे द म्युझिक रुम वाचले. मला आवडले. कथानकासाठी ही लिंक वाचा-
http://www.telegraphindia.com/1070928/asp/opinion/story_8367570.asp
केसरबाईंवरील माहितीसाठी
http://www.underscorerecords.com/artists/details.php?art_id=40
अनेक वर्ष काही प्रश्नांची उत्तरं शोधत होते ती काहीशी सापडल्यासारखी वाटली. हा नमिता यांचा संगीतशिक्षण प्रवास, त्यांच्या गुरु जयपूर घराण्याच्या धोंडूताई कुलकर्णी (केसरबाई केरकर आणि भूर्जीखाँ साहेब यांच्या शिष्या) यांच्याकडे २ तपांहून अधिक काळ चाललेले संगीत आणि जीवनमुल्ये शिक्षणाचा प्रवास, रागदारी, घराणे आणि भारतीय संगीत परंपरेवरील चिंतन, गुरूकॄपेने लाभलेली संगीतानुभूती आणि आत्मानूभूती, त्यात पत्रकरितेची आणि विवेकवादाची जीवनानुभुती, आणि या सगळ्याची सांगड घालायची धडपड. तीळातीळानी, रियाजाने घटवत जाणारा षड्ज. " My "sa" is improving, a few sesame seeds at a time". {हे Diaspora लेखकांचे खटकतं तरी याजागी दुसरी काय बरं उपमा देता येईल? आणि ह्याच उपमा पाश्चात्यांना विलायती म्हणून मोहून टाकत असाव्यात हे बुकरच्या वाढत्या पुरस्कारप्राप्त यादीतले लेखक वाचून वाटतं. तरीही फक्त त्यासाठीच तर लिहीले नसावे , ईतकी शंका घेण्याइतपत लेखक आपण सगळ्यांनीच वाचले आहेत आणि मनात निषेध व्यक्त केला आहे. :-)
केसरबाई केरकरांचे व्यक्तिचित्र बहूतेकांनी तरी पुलंच्या मैत्र मध्येच वाचले असेल. मी स्वतः त्यांचे ध्वनिमुद्रण फक्त राजन पारिकरांच्या पानावर ऐकले आहे. त्या व्यक्तिचित्रणाला पूर्ण छेद देत, आडपडदा न ठेवता, आणि तरीही सीमारेषा पार न करता विवेकनिष्ठ चित्रण या पुस्तकात वाचले. "बाई", त्यांचे सूर, त्यांची साधना आणि बेसूर रंगढंग आणि निव्वळ संगीत परंपरा चालू रहावी म्हणून घराण्याबाहेरच्या केसरबाईंना, जुल्माचा रामराम स्वीकारून तालीम देणारे ते अल्लादिया खाँ साहेब.
गुरु धोंडूताईंचे ध्यासनिष्ठ जीवन आणि संगीत विषयक चिंतन, ईश्वरभक्ति, सोसलेले आघात, आर्थिक कोंडमारा, आयुष्यभर न सुटलेला तोल,, जयपुर घराण्याच्या सर्वेसर्वांच्या कडून मिळालेली तालीम, प्रतिभा आणि तरिही सगळं अनुरुप असताना कूठेतरी शिंकलेली ती नशीब नामक माशी-योग्य प्रमाणात न मिळालेलं ते दुमदुमतं यश/प्रसिद्धी - याबाबतीत ही पूर्ण नियंत्रीत /समतोल विचार नमितानी नोंदवलेले आहेत. भारतीय संगीत परंपरेतील "गुरु " आणि त्यांची मर्जी सांभाळतांना आपल्या गुरुबाबत असे लिहीणे आणि टोकाच्या उदात्तीकरणापासून दूर राहणे, आणि तरीही गुरुमधील अलौकिकाची जाण ठेवून लिहीणे सोप्पे नाही.
हिंदू / मुस्लिम सांगीतीक विचारधारा आणि त्यांची घट्ट वीण हाही एक महत्वाचा धागा. त्यातले अल्लादिया खाँ खरं म्हणजे हिंदू होते वगैरे मिथकं. केसरबाई आणि त्या प्रतिस्पर्धी मालू (? ह्या कोण हे मात्र कळले नाही), धोंडूताई आणि त्यांचे प्रतिस्पर्धी (ह्या कोण ह्याचा मात्र अंदाज लागला), हेवेदावे आणि कपट- हे ही, काही सांगीतीक दंतकथा तानसेन आणि स्वामी हरिदास/ अल्लाह, घराण्याची प्राणपणाने जपण्याची गुपिते, ग्रांट रोड मधल्या शारिरव्यापाराच्या भांगेतली ती अभिजात आणि पिढीजात शास्त्रीय संगीताची तुळस, रागांग आणि श्रुती यावरील गुरुभाष्य सगळेच सुरेख लिहीले आहे. तेवढीच (मला)महत्वाची वाटते ती नमिताबाईंची डोळस वाटचाल, त्यांना पडणारे प्रश्न आणि कित्ती नाही म्हणले, विद्रोही सिगरेटींच्या धुम्रवलयात सोडली तरी सूरात आणि कैवल्यात लीन होऊ पहाणारी त्यांची सापडलेली आणि न सापडलेली उत्तरं- वाचाच !!
राहता राहिला एक प्रश्न-
धोंडूताईंचे गाणं किंवा नमिताचं खरं कसं होतं /आहे ? पुस्तकाला साजेसं आहे का? हा माझ्या डोक्यात वळवळणारा किडा. पण त्यानी काय फरक पडतो ? (हाही एक किडाच). शब्दात तरी त्यानी मूर्त रुप घेतलय ना ? पण मग पाय मातीचे निघाले तर ?
आपल्याला काय वाटतं ?