Weltanschauung

Hi, These are my thoughts on things that matter to me..

Monday, December 11, 2006

बाई बास करा आता !

शनिवारी 'नक्षत्रांचे देणे" ह्या कार्यक्रमाचा (२७ वा) आणि शेवटचा भाग पाहिला. आणि पुन्हा एकदा अनुराधा मराठेंचे गायन ऐकून वाईट वाटले.
बाईंचा आवाज पाSSSर गेलाय. नव्या को-या भांड्यांवर बोट फिरवल्यावर जसा च्यय्य्य्य्क आवाज येतो- तसा कानावर ओरखडे आणि अंगावर शहारे आणणारा आवाज झालाय. तो एकवेळ परवडला अशी सुरांची दुर्दशा झालीये. आवाज गेलाय हे (एक वेळ) मान्य केले तरी सूर कुठे गेले? बेसूर झालेल्या किती जागा दाखवाव्या? -हास , -हास म्हणतात तो हाच, याची पुन्हा एकदा खात्री पटली. ते भीषण "परवशता पाश दैवे" तर जन्मात विसरणार नाही. अगदी त्यांचे पेटंट "लटपट लटपट"- पण आपटलं. बाई- खरंच कळकळून विनंती आहे- स्वरयंत्र जिथे वयानुरुप दस्तुरखुद्द लताबाईंचे झिजले आहे तिथे तुमची काय कथा? बास करा आता!! आणि हे आत्ताचे नाहीये. सुधीर फडक्यांवरील नक्षत्रांचे देणेच्या भागातही त्या अनेक वेळा बेसूर झाल्यात. उदा-"मनोरथा चल त्या नगरीला".

ह्या कार्यक्रमात त्या कमी म्हणून की काय रविंद्र साठ्यांनी ही पाटी टाकली- आधीच तो सचिन करंबळेकर नावाचा ईसम उसनं अवसान आणुन लोकगीत म्हणत होता- साठ्यांनी जागा तर चुकवलीच पण तेही बे-सू-र झाले एका क्षणी.

चंद्रकांत काळे,नीना कुलकर्णी आणि विभावरी आपटेनी अब्रु सांभाळली. विभावरी आपटेनी ओम नमोजिआद्या, याला जीवन ऐसे नाव, आणि निळ्या आभाळी अप्रतिम सादर केलं. अनुराधा बाईंच्या पुढे तिचा आवाज कानात अमृत ओतल्यासारखा.
चंद्रकांत काळे मस्त!

कार्यक्रम संपल्यावर टाळ्या वाजवावश्या वाटल्या त्या "हुश्श!! संपला एकदाचा !" यासाठी. रविवारचा दुसरा भाग पाहण्याची हिम्मत केली नाही.