Weltanschauung

Hi, These are my thoughts on things that matter to me..

Wednesday, September 06, 2006

भुकंपासाठी (प्रयत्नपूर्वक) सुसज्ज जपान


मागच्याच आठवड्यात एक भुकंप झाला. तसे नेहमीच होतात- पण हा जरा विशेष जाणवण्यासारखा होता. त्याच्या दुस-याच दिवशी- १ सप्टेंबर ला- १९२३ च्या Great Kanto Earthquake च्या anniversary निमीत्ताने जपानमध्ये मोठी Earthquake Drill होती. त्याची ही क्षणचित्रे.
http://news.bbc.co.uk/2/hi/in_pictures/5305932.stm
http://news.bbc.co.uk/2/hi/asia-pacific/5304562.stm


भुकंपाची पुर्वतयारी करायलाच हवी असे जपान मध्ये इतके बिंबवले जाते की शिशूविहारापासून सगळीकडे ह्याचे प्रशिक्षण सुरु होते. सर्वात महत्वाचे म्हणजे emergency earthquake kit तयार करणे. यात पाणी, थोडे खायचे सामान, काही महत्वाची औषधे, अतिमहत्वाची कागदपत्रे, पैसे, रेडियो, टॉर्च, काड्यापेटी अशा वस्तू एकत्रित ठेवाव्या.
इथे अजुन एक शिकवले जाते ते म्हणजे भुकंप होत असताना, सर्वप्रथम गॅस बंद करायचा, दार किंवा खिडकी उघडायची (म्हणजे अडकलो तर बाहेर पडायला) आणि पहिले जाउन टेबलाखाली बसायचे. कारण असे की, भुकंपात सर्वात जास्ती इजा ही धडाधडा पडणा-या वस्तूंनी होते- त्यापासून वाचण्यासाठी. सगळी theory माहीती आहे पण भुकंप होत असताना मात्र बाहेर पळुन जायचीच उर्मी दाटून येते. इकडे ते कानीकपाळी ओरडुन सांगत असतात, की अजिबात बाहेर पळुन जायची घाई करु नका. तसे केले तर डोक्यात दगड विटा पडण्याची शक्यता फार. टेबलाखाली बसा आणि भुकंप संपल्यावर (जगला-वाचला तर) त्वरित जवळच्या earthquake designated safe areas/ evacuation ground मध्ये आपली emergency kit घेउन जा. इथे असे शिकवतात की भुकंपात सर्वात जास्ती मनुष्यहानी ही अंगावर वस्तु पडुन किंवा त्याहुन जास्ती आग लागुन होते. आग लागली की संपले. म्हणुन भुकंपात कधीही elevator वापरायचा नाही. भुकंप सुरु झाला की त्वरीत गॅस बंद करावा. प्रत्येक मजल्यावर fire extinguisher असतेच. ( तो हाताळायच्या सर्व Instructions अर्थातच फक्त जपानीत असतात.)

टेबलाखाली जा- हे हज्जार वेळा ऐकले आहे- पण केले नाही कधी. या मे महिन्याच्या सुरुवातीला एक भुकंप झाला तेव्हा आम्ही Costco त होतो. त्यावेळेला ह्या शिकवणुकीचे महत्व पटले. त्या अवाढाव्य Costco त वस्तु पडायला लागल्याकी! नशीब खूप मोठा भुकंप नव्हता- नाहीतर ५ किलोचे Tide टाळक्यात बसले असते तर त्या भुकंपानी नाही तरी Tide नी नक्कीच इजा झाली असती.
ऑफीसात पण तेच- भुकंप होत असताना, मोठा आहेसं वाटलं, की जपानी लोकं सटासट टेबलाखाली आणि समस्त परदेशी जनता घाबरत एकमेकांच्या तोंडाकडे पाहत उभे असतात. माझं आधीच कार्यालय १४व्या मजल्यावर होत. तर ब-याच जपानी बाया आपल्या cube मध्ये spare flat (बिनटाचेच्या) चपलांचा जोड ठेवायच्या. म्हणजे भुकंपात पळायला लागले तर उपयोगी होतील. कारण जपानी बाया झाडुन सगळ्या उंच टाचांच्या चपला घालतात. नव-याचं आधीच office ४४व्या मजल्यावर होतं. त्यांची disaster drill असायची ६ महिन्यातुन एकदा. ४४ मजले जिन्याने उतरत येणे म्हणजे- १ तास लागतो.. इतका वैतागायचा.. पण वेळ कधी सांगून येत नाही- म्हणून पूर्वतयारीच्या होता होईल तो सर्व सुचना अमलात आणाव्याच.
इथे असेही खूप सांगतात की- घरच्या लोकांनी अशा संकटकाळी नक्की कुठे भेटायचे ते आधी ठरवून ठेवायचे . कारण फोन बंद होणार, कदाचीत ट्रेन ही. बायको घरी, नवरा कार्यालयात आणि मुलं शाळेत असतील. अशा प्रसंगी आधी ठरवलेले बरे.
जवळचे evacuation areas सर्वांनी जाउन आधी पाहुन यावे- असेही म्हणतात.

तोक्योत म्हणे दर ७०/८० वर्षांनी का काय एक जोरदार मोठठा भुकंप होतो. तर असा ह्या दशकात अपेक्षीत आहे वगैरे. त्यामुळे जोरदार तयारी सुरु असते सगळीकडे. असे म्हणतात की सरकारची सर्व आकडेवारी तयार आहे.की अमुक एक strength चा भुकंप झाला तर किती जिवीतहानीची शक्यता आहे -वगैरे.

खुद्द भुकंप तर अनेक प्रकारचे. काही अमीर खा साहेबांच्या आलापीसारखे धिम्या गतीत सुरु होउन मग धडाधड जोरात हलायला लागते. बिलडिंगा एक तर आडव्या (म्हणजे Pendulum सारख्या ) नाहीतर पुढे मागे हलतात... मग या ताना झाल्या की परत विलंबीत लयीत हलुन हळुहळु थांबतात. दुस्-या प्रकाराची मला जास्ती भिती वाटते.. जमिनीतुन खालुन असा [ढुप्प SSS] आवाज येउन,बॉम्ब पडलाय की काय- असे वाटावे असा आवाज आणि जमिनीखालुन हलतय असे वाटते...
असा एक भुकंप मागच्या वर्षी जाणवला. त्यावेळेला आम्ही खरोखर घाबरुन खाली पळालो (पहिल्यांदा). संपल्यावर वर आलो तर- पेपरवाला एवढ्या परिस्थितीत शांतपणे elevator नी वर येउन स्थितप्रज्ञाप्रमाणे पेपर टाकुन गेला होता.
अजुन एक भिती म्हणजे त्सुनामी ची. भुकंप झाल्याच्या २-या मिनिटाला टी.व्ही वर माहिती यायला सुरुवात होते. त्सुनामी नो शिंपाई वा अरीमासेन... म्हणजे त्सुनामी होण्याची शक्यता नाही. क्वचित कधीतरी गल्लीतुन ग़ाड्या कर्णे घेउन तीच त्सुनामी ची घोषणा करत असतात. आम्ही तर bay area त राहतो. ती त्सुनामी ची warning पाहील्याशिवाय जिवात जीव येत नाही.

मला भिडणारी गोष्ट म्हणजे- भौगोलिकद्ष्ट्या अस्थिर जमीन हा जपानला शाप असेल- तर त्यांची पूर्वतयारी म्हणजे खरोखर उशा:प आहे असे म्हणायला हरकत नाही. In Japan, in an earthquake, if you die- it will not be for lack of trying.

Tuesday, September 05, 2006

भावनेला येवू दे गा....

झोपेनी असहकार पुकारला होता. म्हणून ८ * २ फुटांच्या, खास जपानी घरांच्याच असू शकतील अशा छोट्याशा गॅलरीत आम्ही दोघं बसलो होतो. ती गॅलरी ईतकी अरुंद आहे, की मी थोडी जाड झाले तर मला तिरकं होऊन कपडे वाळत घालायला लागेल. असो. तर त्या एवंगुणविशीष्ट गॅलरीत आम्ही रात्रीच्या २ वाजता बसून होतो. कधी नव्हे ते, ऐन उन्हाळ्यातली ती एक थंड रात्र होती. कुठल्याही कंपन्यांचे वातानुकुलीत यंत्र झक मारेल अशी हवा सुटली होती. अशा वेळेला, बालपणी रात्री गच्चीत झोपण्याच्या कार्यक्रमाची आठवण येणे अपरिहार्यच. नवरा विदर्भातला असल्यामुळे त्यांच्याकडे दर उन्हाळ्यात हा कार्यक्रम असायचा. आम्ही पुण्यात फार क्वचित कधीतरी गच्चीवर झोपलो असू- पण नागपूरला मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत गच्चीवर झोपल्याच्या आठवणी माझ्यादेखील आहेत. असो.
तर इथले आकाश काही आपल्यासारखे नाही, आणि इथला कावळा मेला कावळ्याच्या जातीला शोभेलसा ओरडत नाही ही माझी लाडकी तक्रार... आता, इथले आकाश आपल्याईथल्यासारखे नाही- हे मला प्रामाणिकपणे वाटायचे- कारण (औषधाला ही) चांदणे दिसत नाही. तर हे नेहमीचे पेटंट वाक्य मी टाकले- तेव्हा नवरा म्हणाला- तुझे डोळे खराब आहेत- चष्मा लाउन ये जा.. अगं चांदण्या आहेत- पण अस्पष्ट दिसतात. नीट पाहिल्यास की दिसतील..

खरं आहे- आयुष्यात ब-याच गोष्टींना हे तत्व लागू पडते. त्यांच अस्तित्व असतंच, आपलेच डोळे खराब, किंवा पुर्वग्रहांची झापडं जबरदस्त- जे आहे आणि जसं आहे तसं पाहता येईल असा चष्मा हवाच. कधी स्पष्ट दिसावं म्हणून चष्मा लावावा आणि कधी चष्म्याचे झापड झालेलं असलं, तर तो उतरवून पहावा- चांदणे जरुर दिसेल !

कधी फार पराकोटिचा वैताग आला- आणि विशेषत: आपण इथे कुठे येऊन पडलो असे वाटायला लागले- की परत एकदा आपल्या irritants कडे डोळसपणे पहायला शिकायला हवे. हे शहाणपण सहजी येत नाहीच.. स्वत:ला अतोनात त्रास करुन घेतल्यानंतरच ही सदबुद्धी लाभते. कधी आपलंच मडकं कच्च असावं आणि धग लागल्याशिवाय त्त्यातून पक्क मडकं तयार होऊच नये हे विधीलिखीत असू शकतं.परदेशात राहताना विशेषत: हे तत्व आचरणात आणावे. त्यानी सगळे प्रश्न सुटतात असे नाही- पण ब-याचदा Kalidioscope फिरवला की जसे नवीन design दिसते, तसे होते. आपल्याला त्रास देणा-या गोष्टींकडे पाहण्याचा द्ष्टीकोण बदलत जातो- वादळ शमतेच असे नाही, पण काही प्रमाणात निश्चीत निवळते.
"भावनेला येवू दे गा
शास्त्रकाट्याची कसोटी "